पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वास्तूचे लोकार्पण..
वेंगुर्ला :
बॅ. नाथ पै यांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट शासनातर्फे वेंगुर्ले कॅम्प येथे साकारण्यात आलेल्या बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेच्या माध्यामातून बांधण्यात आलेल्या या बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात नाथांच्या विविध स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. २५ सप्टेंबर १९२२ रोजी वेंगुर्त्यात जन्मलेल्या बॅ. नाथ पै यांचे कोकणासाठी आणि कोकणवासीयांसाठी लक्षणीय योगदान आहे. लढवय्या स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त आणि उत्कृष्ट संसदपटू हिच त्यांची ओळख. नाथ पै हैं १९५७ ते ७१ या काळात लोकसभेत कोकणचे प्रतिनिधी राहिले. खासदारकीच्या काळात त्यांनी सातत्याने कोकणवासीयांच्या हिताचे प्रश्न मांडले. कोकण विकासाच्या दृष्टीने बॅ. नाथ पै यांनी कोकण विकास परिषदेचे अधिवेशन भरविले आणि त्याचे अध्यक्षपदही भूषविले होते. अध्यक्ष या नात्याने त्यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडा सादर केला. कोण रेल्वे हेही नाथांचचं स्वप्न. तेथूनच कोकण रेल्वेची खरी सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती, गोवामुक्ती आणि बेळगाव
सीमाप्रश्न या तीन मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले होते. त्यांच्या स्मरणार्थ वेंगुर्ले कॅम्प येथील डॉन्टस कॉलनीलगत या बॅ. नाथ पै समुदाय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा वास्तूचे लोकार्पण होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याला नाथ पै प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले आहे.