*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आचरे येथे पुरस्कार वितरण सोहळा*
मालवण :
ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरा पंचक्रोशीचा २०२४ चा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव भिवा आचरेकर आचरे बौद्धवाडी यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करून आचरे रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे कार्याध्यक्ष माननीय प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि शुभहस्ते १ ऑक्टोबर २०२४ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती माननीय अशोक धोंडू कांबळी (अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशी) यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. लक्ष्मणराव आचरेकर हे ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून गेली दीड तप संघाची सेवा तन मन धन अर्पण करून करीत आहेत. जवळ जवळ एक तप संघाचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवून संघाची सेवा केलेली आहे. गेली ६ वर्षे ते ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरेच्या सल्लागार समितीवर असून संघाला सदैव मार्गदर्शन करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरेचा ‘स्वरयात्रा’ हा उपक्रम गेली १४ वर्षे राबवून त्यांनी संघाची ‘स्वरसेवा’ केलेली आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा सर्वांनाच आनंद देणार आहे. असे उद्गार माननीय बाबाजी गोपाळ भिसळे उर्फ तात्या भिसळे (अध्यक्ष, रामेश्वर वाचन मंदिर आचरे) यांनी त्यांचे अभिनंदन करताना काढले.
लक्ष्मणराव आचरेकर हे गेली २२ वर्षे वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा व श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड आचरा येथे दहा वर्षे सेवा देत आहेत. संगीत, नाट्य, गायन, वादन आदी विभागात वयाची ८५ वर्षे पार करूनही त्यांची सेवा अजूनही निरंतर चालू आहे. श्री देव रामेश्वर मंदिर आचरे येथे संपन्न होणाऱ्या १ ऑक्टोबर २०२४ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याचवेळी संघातील ४५ वर्षे पूर्ण केलेल्या दांपत्यांचा आणि ७० वर्षे पूर्ण केलेल्या मनोयुवांचा सत्कार आयोजित केला आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी ठीक ९.०० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन जकारीन फर्नांडिस (कार्यवाह,ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशी) यांनी केले आहे.
लक्ष्मणराव आचरेकर हे कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा मालवण आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, तालुका मालवण या उभय संस्थांचे क्रियाशील आजीव सभासद असून त्यांचा उत्साह तरुणांना लाजविणारा आहे.ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशीने योग्य मनोयुवाची निवड ज्येष्ठ सेवा पुरस्कार २०२४ साठी केली याचा आमच्या उभय संस्थांना अभिमान वाटत आहे. असे उद्गार माननीय सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष,को.म.सा.प. व कथामाला शाखा मालवण) यांनी काढले. लक्ष्मणराव आचरेकर यांचे ज्येष्ठ सेवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आचरा पंचक्रोशीतील सर्व विविध संस्था आणि मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.