You are currently viewing मालवणमध्ये शिवसृष्टी उभारावी

मालवणमध्ये शिवसृष्टी उभारावी

*मंत्री दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती*

 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्री श्री.केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील विनंतीपत्र तसेच ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केला.

मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्याने १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर सध्या ३३ गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करुन तेथे भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी विनंती श्री.केसरकर यांनी केली आहे.

मालवण नगर परिषदेच्या मंजूर सुधारित विकास योजनेनुसार सध्याच्या स्मारकास लागून वाहनतळ, बगिचा आणि पर्यटन सुविधा या करिता आरक्षित आहेत. या जागा एकत्रितरित्या विकसित करुन येथे शिवसृष्टी उभारण्यात यावी. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली आरमाराच्या इतिहासाचा उलगडा होईल तसेच येथे जेट्टी निर्माण केल्यास शिवसृष्टीस भेट देणाऱ्या शिवप्रेमींना वर्षानुवर्षे स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या मालवण किल्ल्यावर जाण्याची सुविधा निर्माण होईल. ज्यामुळे शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली इतिहासाची नव्याने ओळख होऊन ही प्रेरणा राष्ट्र निर्मितीस उपयोगी ठरेल, असेही श्री.केसरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा