शिक्षक पात्रता परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा..*
सावंतवाडी
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग आणि स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तसेच डिसेंबरमध्ये होऊ घातलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) या परीक्षांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हयाच्या मध्यभागी घेण्यात येईल. कुडाळ शहरामध्ये दर शनिवारी आणि रविवारी निमंत्रित तज्ज्ञ आणि परीक्षांमध्ये यश मिळविलेले अनुभवी मार्गदर्शक यांच्या मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्याचे योजिले आहे.
१० नोव्हेंबरला होणारी TET परीक्षा आणि डिसेंबरमध्ये होणारी CTET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि पुढील टप्प्याचा शिक्षक भरतीत जास्तीत जास्त सिंधुदुर्गातील उमेदवार पात्र व्हावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेत आहोत. या चांगल्या उपक्रमामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत हे जिल्हयातील उमेदवारांना शिक्षक भरतीत लाभ व्हावा, यासाठी पुढे येत या कार्यशाळांसाठी सहकार्य करणार आहेत.
ज्यांना-ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विनय गायकवाड यांच्याकडे संपर्क साधावा. संघटनेकडे नोंदणी झालेल्याच इच्छुक उमेदवारांना संख्या पाहून तशी पुढील बैठक व्यवस्था आणि वक्त्यांचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे कार्यशाळेत संघटनेत येऊ इच्छीणाऱ्या सदस्यांनी संपर्क साधून आणि नोंदणी नसणाऱ्या उमेदवारांनी लवकर संघटनेकडे नोंदणी करून कार्यशाळेतील आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन अध्यक्ष विनय गायकवाड यांनी केले आहे. स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती – सिंधुदुर्ग, संपर्क : ८४४६८२९८८९.