*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम लेख*
*उतरंड*
‘उतरंड’ ज्याला माहीत नाही, असा कोणी माणूस ग्रामीण भागात आढळणार नाही. खाली मोठे डेरेदार मडके आणि त्यावर मग आकाराने छोटेछोटे होत गेलेले मडके (मातीचे भांडे) अशी एकावर एक रचलेली गाडग्या-मडक्याची चळत म्हणजे उतरंड!
याच मातीच्या भांड्याच्या शृंखलेतील ‘येळणी’ हे एक आणखी मातीचे भांडे ज्याला आपण ‘प्लेट’ किंवा मडक्यावरील झाकणी म्हणू, आणि गाडगे म्हणजे या श्रेणीतील सर्वात छोटं आणि सर्वात वरचे भांडे अशी ही उतरंड म्हणजे ग्रामीण भागातील जणू ‘लॉकर’च!
हे आज मला आठवायचे कारण म्हणजे महालक्ष्म्या! श्रावणाच्या भुणभुणीत सगळीकडे चिखल-चिलट-माश्यांनी आपले साम्राज्य माजवलेले असते. श्रावण सरताच धामधुमीचा पोळा येतो… श्रावण संपल्याची आणि गौरी-गणपती येण्याची ती वर्दी असते. पावसाळी दमटाने जसे घराचे दरवाजे फुगतात तसेच कुडामातीच्या भिंतीवरील मातीचे आवरण फुलते, त्याचे पापुद्रे गळायला लागतात. ‘आला पोळा आणि पाऊस झाला भोळा’ म्हणतात… भाद्रपद येतो… तो गणपती आणि महालक्ष्म्यांना घेऊनच… आणि त्यांच्या स्वागताची तयारी म्हणून मग आजी, आई आणि बायकामंडळीची एकच धांदल उडते. घर स्वच्छ करणे, भिंती सारवणे, गोधडी-चादरा आणि तत्सम सर्व कपडे धुणे इ. करतांना बायकांना कधी दिवस उजाडला आणि कधी मावळला हे ही कळत नाही.
हल्ली शहरात ‘इन्व्हेंटरी’ शब्द कानावर पडतो. म्हणजे किती होते, किती वापरले आणि किती शिल्लक आहे याची चाचपणी म्हणजे इन्व्हेंटरी! खेड्यात उतरंडीची इन्व्हेंटरी सालात महालक्ष्मीचा सण आला की होते. नेमके घराचे सारवण काढले की मग या उतरंडीना हात लागतो. दोन उतरंडीच्या मध्ये तसेच भिंत आणि उतरंडीमध्ये झालेली जाळी- जळमटे काढण्यासाठी, उतरंडीच्या आधाराच्या भिंती सारवण्यासाठी ह्या उतरंडी उतरवल्या जातात. ही उतरंडीची उतरण म्हणजे लेकरांचा आनंद सोहळा… कशात काय आहे ते पाहण्याची उत्सुकता असतेच… ‘अरे हळू! फोडाल गाडगी-मडकी!’ …थोडा राग… लेकरं मदत करतात त्याचा आनंद… असे सरमिसळीचे हे नाट्य म्हणजे आनंदाची पर्वणीच! या उतरंडीत असलेले जिन्नस जसे भाजलेला हरभऱ्याचा हुळा, खाऊन शिलकी राहिलेल्या, नीट पाखडून-साफ करून ठेवलेल्या ओंब्या, कशात ज्वारीचा हुरडा तर कुठल्या मडक्यात ठेवलेले तीळ तर गाडग्यात ठेवलेल्या काकडी, कलिंगड, वाळूक,जवस, कऱ्हाळुच्या बिया… कशात खारोड्या-कुरडया तर कशात आणखी काहीबाही… पाहतांना, काढतांना… आईला मदत करतांना मजा येई.
काळ बदलला… खेड्यापाड्यातही या उतरंडी शेवटचा श्वास घेतांना दिसतात. सिमेंट काँक्रीटचे छत, भिंतीला टाईल्स, फ्लोअरही टाईल्सचे झाले. सडा-सारवणाची जागा वायपर-पोछाने घेतली. स्टील अलमारी, फर्निचर सारख्या जिन्नसांनी उतरंडीला पायउतार केलं. काळ बदलला… वस्तू बदलल्या… माणसेही बदलू लागली.
परंतु बदलला नाही आनंद, कमी झाला नाही उत्साह… मात्र माझ्या लेकरांना ‘उतरंड’ काय ते मला दाखवता नाही आली. मी उतरंडीच्या चित्राचा आधार घेतला त्यांना समजून सांगायला… समजून सांगितल्यावर त्यांना कळाले… जुन्या गोष्टीत रमले… अगदी तसेच, जसा मी रमायचो… हे ही नसे थोडके!
जयराम धोंगडे, नांदेड
९४२२५५३३६९