*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*
*”सांग गजानना…”*
गणपती गजानन
ज्ञान बुद्धीची देवता..
करिशी तू दूर विघ्न
मुखी नाव तुझे घेता..
तू सकल जनांचा तारक..तूची संकट निवारक..तूच विघ्न विनाशक..गौरीनंदन तू विनायक..
हे गजानना..
तू म्हणजेच ज्ञानाचा सागर अन् बुद्धीचा अधिष्ठाता म्हणून तर तुला ज्ञान बुद्धीची देवता म्हटले जाते..
शिव पिता नि पार्वती माता अन् रिद्धी सिद्धी पत्नी…
लाडू मोदक तुझ्या आवडीचे..
पण, हे गणराया, तुझी नावे तरी किती रे..?
श्रीगणेश, मोरेश्वर, हेरंब, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, शुर्पकर्ण, विघ्नहर, एकदंत, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र..
अरे हो हो…
सांग गजानना, किती नि कोणत्या नावाने तुला हाक मारायची..?
गणपती, श्रीगणेश म्हणजे गणांचा स्वामी तू.. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी तुझे आगमन होते अन् तुझे आगमन म्हणजे आनंदाला उधाण, जणू आनंदाचा महापूरच..तुझी नावे अनेक असली तरी तू मात्र एकच.. आमचा गणेश..! प्रत्येक घरात तुझी निरनिराळी मूर्ती अन् सर्व मूर्तींमध्ये तुझं विलक्षण तेजाने भारलेलं तेजस्वी सुंदर अलौकिक रूप..! तुझे मोठे डोके अचाट बुद्धिमत्ता अन् स्मरणशक्तीचे दर्शन घडविते. तुझे पाय म्हणजे कमलपात्राप्रमाणे समचरण, नाभी खोल तर पोट मोठे सर्व अपराध क्षमा करून पोटात घाला असे सांगते…तुझी छाती विशालकाय तर चार हस्त म्हणजेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष..! चार हात क्रियाशील रहा अशी शिकवण देतात. एकदंता तुझा एक दात आणि सोंड सर्व पापांचे हरण करतात..सोंड दूरवरचा वास घेते अन् पुढे घडणाऱ्या गोष्टींचा विचार करा असेच सुचविते. तुझ्या मुखकमलावरील सुंदर तेजस्वी बारीक डोळे सूक्ष्म निरीक्षण करण्याचे सूचित करतात, सुपासारखे भलेमोठे कान सर्व ऐकून घ्या आणि अनावश्यक सोडून द्या असच जणू सांगत असतात.. अन् तुझे शीर्ष सौंदर्याने नटलेले आहे.. इवलासा उंदीर तुझे वाहन तर पाश, अंकुश, परशु, दंत ही तुझी शस्त्रे अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रेरित करतात..
पण एक सांग एकदंता, खरंच तुझं गुणगान गायलं की अज्ञानी सुद्धा ज्ञानी होतो..? मग जे भाद्रपद चतुर्थीला एकत्र येऊन तुझी पूजा मांडतात, एक ना अनेक गाऱ्हाणी घालून मागणे मागतात.. सकाळ संध्याकाळ तुला भजतात, आरती, मंत्रोपचाराने तुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात, तुझी वेडीवाकडी सेवा चाकरी करतात.. ते गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर पुन्हा वेगवेगळे का रे होतात..? त्यांना तू एकजूट राहण्यासाठीचे ज्ञान देत नाहीस का..? त्यांची बुद्धी अशी का भ्रष्ट होते..?
हे विनायक, कितीक जणांना तू नैतिकता शिकवलीस..मग मनुष्याला माणुसकी, आपली नाती जपायला कधी रे शिकविणार..?
हे हेरंब, तुला आठवतंय का..?, एकदा भगवान विष्णूचा शंख चोरून तू कैलासावर वाजवीत होतास.. भगवान विष्णू शंख शोधत असताना त्यांना कैलासावरून शंखाचा ध्वनी येत असल्याचे ऐकू आले. पण भगवान विष्णूंना हे माहीत होतं की तू सहजासहजी त्यांना शंख देणार नाहीस, म्हणून त्यांनी भगवान शंकरांना आपला शंख तुझ्याकडून परत मिळवून देण्याची विनंती केली. भगवान शंकरांनी ती शक्ती आपल्यात नसून तुला संतुष्ट करण्यासाठी भगवान विष्णूंना तुझी पूजा करण्याचा उपाय सुचविला. भगवान विष्णूंनी तसे केल्यावर प्रसन्न होऊन तू त्यांचा शंख त्यांना परत दिलास..
खरंच देवा, तुझा खोडकरपणा जरी यातून दिसला तरी भगवान विष्णू एवढे महान असूनही तुझी पूजा करण्यास कचरत नाहीत यावरून नम्रपणा हा गुण अंगी असावा हे तू शिकवलस…
हे गजमुखा, भगवान शिवशंकरांनी जेव्हा गजाचे शीर लाऊन तुला जिवंत केले तेव्हा क्रोधित झालेल्या माता पार्वतीला त्यांनी “कोणतेही काम करण्यापूर्वी सर्वप्रथम पूजेचा मान गणेशाला असेल” असे वचन दिले होते. परंतु, आपल्यालाही हाच नियम लागू असेल हे मात्र शिवशंकर विसरून गेले. राक्षसांशी युद्ध करण्यासाठी जाताना शिव तुझी पूजा करण्यास विसरले आणि युद्धावर जातानाच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. युद्ध सुरू करण्यापूर्वीच त्यांच्या गाडीच्या चाकाचे नुकसान झाले. भगवान शिवाला हा दैवी चमत्कार असल्याचे लक्षात आले आणि हे कशामुळे घडते याचा शोध घेत असताना आपण युद्धावर निघण्यापूर्वी गणपतीची पूजा न केल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यांनी सर्व सैन्याला तिथेच थांबवून ज्या ठिकाणी ते होते तेथेच श्रीगणेशाची पूजा केली आणि त्यानंतर युद्धात राक्षसांचा पराभव झाला. यावरून तुम्ही असे सुचविला आहे की, तुम्ही कितीही मोठे कोणीही असो परंतु एकदा नियम तयार केला की त्याला तुम्ही सुद्धा बांधील असता.
हे भालचंद्रा, तुझे बंधू कार्तिकेय आणि तुझ्यात तुम्हा दोघांनाही जंगलात सापडलेल्या एका फळावरून ते कोणी खायचे असा वाद निर्माण झालेला. कार्तिकेयनी ते वाटून खाण्यास नकार दिला. जेव्हा पिता शंकर अन् माता पार्वतीकडे हा प्रश्न घेऊन तुम्ही गेलात तेव्हा पिता शंकरांनी सांगितले की, ते फळ अमतत्व आणि व्यापक ज्ञान प्रदान करण्यासाठी ओळखले जाते. ते योग्य धारकाने खाल्ले पाहिजे. ते फळ कोणी खावे यासाठी पिताश्रीनी एक आव्हान दोघांनाही दिले होते. जो कोणी संपूर्ण जगाच्या तीन प्रदक्षिणा मारून कैलासावर प्रथम येईल त्यालाच हे फळ खायला मिळेल.
क्षणाचाही विलंब न करता कार्तिकेय आपले वाहन मयुरावर स्वार होऊन जग प्रदक्षिणेसाठी हवेवर स्वार झाला. पण…,
हे शुर्पकर्ण, तू तुझ्या असामान्य, अलौकिक, असीम बुद्धीचा प्रत्यय तिथेच दिलास…
तुझे वाहन म्हणजे मूषक… तो उडू शकत नव्हता.. पण आपल्या पित्याचा प्रस्ताव नीट ऐकून घेत तू मात्र स्वतःच्या मातापित्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा मारून पूर्ण केल्यास..
भगवान शिवाने जेव्हा “तू असं का केलंस?” हे विचारल्यावर तू उत्तर दिलेस..”मला माझ्यासाठी माझे माता पिता हेच विश्व आहे, जगापेक्षा श्रेष्ठ आहेत.”
गणेशा तुझ्या असामान्य अन् कल्पक बुद्धीने शिवाच्या मनाला स्पर्श केला नि तू ते फळ खाण्यास योग्य ठरला होतास. यातून परिस्थिती कोणतीही असो, आपली बुद्धी वापरून तुम्ही ती समस्या कशी सोडवता याचे सुरेख उदाहरण तू दाखवलेस परंतु… त्याहुनी श्रेष्ठ म्हणजे आपल्या माता पित्यांना किती आदर आणि प्रेम दिले पाहिजे हे तू शिकवलेस..
एक सांग गजानना…, हे कसं काय सुचतं तुला..??
हे विघ्नराजेंद्र, तू कुबेराचा अभिमान कसा तोडलेलास आठवतंय ना..!
कुबेरास संपत्तीचा फार अभिमान.. त्याने शिव पार्वती सहित सर्वांना एकेदिवशी जेवायला बोलावले. शिव पार्वती जाऊ शकले नाहीत, त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून तुला पाठविले होते. तू मात्र कुबेराचा स्वभाव ज्ञात होता. कुबेराचे पतन करायचे ठरवून तू पटापट जेवणावर ताव मारून इतर पाहुणे येण्यापूर्वीच सर्व जेवण संपवून कुबेराच्या संपत्ती संग्रहातील सोने, किंमती वस्तू खाऊनही तुझी भूक भागली नव्हती तेव्हा अतृप्त असलेला तू कुबेराला खाण्यास धावला होतास. कुबेर स्वसंरक्षणासाठी तेव्हा कैलासावर भगवान शिवजींच्या आश्रयास गेला…अन् तू तिथे पोहचताच शिवांनी तुझ्या कृती मागील कारण ओळखले आणि तुला एक वाटी धान्य अर्पण केले अन् तुझी भूक तृप्त झाली होती.
लोभीपणाने संपत्ती, माया गोळा करू नये याची शिकवण कुबेराला मिळाली अन् लोभ आणि अभिमान आयुष्यात किती हानी पोचवतात हे सुद्धा दिसून आले.
तुझे भरलेले पोट अन् तोल जाऊन पडलेला तुला पाहताच हसणाऱ्या चंद्राला तर तू अदृश्य करून टाकले होते..चंद्राने क्षमायाचना केल्यावर त्याला १५ दिवस दिसण्याच्या आणि अदृष्य होण्याच्या चक्रात बसविलेस..
कोणाच्याही समस्येवर, विकृतीवर हसू नये हे तू यातून साऱ्या जगाला शिकविलेस..
हे लंबोदरा,
तू जेव्हा घरातील चौरंगावर बसतोस ना..तेव्हा एक मातीची मूर्ती असतोस…पण, तुझ्या चरणांवर गंधोदक सुगंधी लाल जास्वंद, गुलाब पुष्प, वस्त्र अन् अक्षता वाहिल्या की, तुझ्या मूर्ती मध्ये नवं चैतन्य येते.. अंगी जानवे परिधान केले आणिक चंदन गंध मिश्रित पाणी, दुधाचा चरणांवर अभिषेक होताच माझ्या नजरेला तुझ्या नजरेत देवत्व दिसू लागते.. तुझ्या चेहऱ्यावरील शीतलता, प्रसन्नता आपसूकच माझ्या चेहऱ्यावर येते.. मग नाजूक कोवळ्या दुर्वांच्या जुड्या जणू गुदगुल्या केल्या गत हसत हसत तुझ्या चरणांवर समर्पित होतात..तीन पाने समतल असलेलं बेलाचे पान मागे राहील कसे..? शमी, आघाडा, कनेर अशा नानाविध औषधी गुणधर्म असलेल्या २१ पत्री तुझ्या चरणकमलांवर अलगद विसावतात अन् तुझ्या सेवेत रुजू होतात.. तुझ्या उजवीकडे हळदीचे रोप, आम्रतरूची फांदी, हरने आदी स्वरूपात गौरी अन् बाजूलाच अमृताचे भरलेले फळ महादेव स्वरूप म्हणून पुजले जाते.. तुझी पूजा म्हणजे चराचर सृष्टीतील चैतन्याची पूजा.. मातीपासून बनविलेल्या तुझ्या पार्थिव मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते.. पार्थिव म्हणजे पृथिवी म्हणजे माती – जमीन. तुझी मातीपासून बनविलेली मूर्ती विसर्जनानंतर पुन्हा मातीत मिसळते. मातीतून येऊन मातीतच जायचे हे तूच शिकविलेस.. मातीत निर्मिती करण्याची शक्ती असते..म्हणून तर बी मातीत रुजते अन् धनधान्य निर्मिती होते.
हे गजानना, तू येतोस, चैतन्याचा झरा वहावा तसा आनंद पसरवितोस.. भक्तांकडून सेवा करून घेतोस अन् पुन्हा विसर्जित होतोस…
पण, तू कुठे जातोस..?
तू तर हास्य बनून आमच्या हृदयात निरंतर राहतोस रे..
म्हणून तुला विचारतो…
एकच सांग गजानना, तू मातीतून येऊन मातीतच जातोस मग घराघरात पूजन करणाऱ्या प्रत्येकाला तू मातीचे महत्त्व पटवून देशील का रे..?
तुझ्या चरणांवर फुले वाहतात, नैवेद्य दाखवून तुला सुग्रास जेवण दिल्याचा आनंद साजरा करतात पण, तुझी प्लास्टरची मूर्ती बनवून विसर्जन पश्चात जल प्रदूषणाला जबाबदार बनणाऱ्या तुझ्याच लेकरांना बुद्धी देवता, थोडीशी तरी बुद्धी देशील का रे..?
तूच निर्माण केलेल्या चराचर सृष्टीमध्ये तुझ्या मूर्तीची विसर्जन पश्चात होणारी विटंबना थांबवशील ना रे..?कोणताही चमत्कार नको आहे रे मला…
फक्त…
ज्याच्याकडून घेतलंय त्याचं त्याला देण्याची वृत्ती वाढीस लागू देत..!
गणपती बाप्पा मोरया…पुढल्या वर्षी लवकर या..!
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६