कवी सुरेश बिले यांच्या काव्यसंग्रहाचे १२ सप्टेंबरला कणकवलीत प्रकाशन…
कवी मधुकर मातोंडकर, कवयित्री प्रमिता तांबे यांची प्रमुख उपस्थिती…
कणकवली
येथील कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सुरेश बिले यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नामवंत कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सप्टेंबरला सकाळी १०.३० येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.
कवी सुरेश बिले मित्र मंडळ कणकवलीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर आणि प्रसिद्ध कवयित्री प्रमिता तांबे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सुरेश बिले हे तळकोकणातील निष्ठावंत सांस्कृतिक कार्यकर्ते. कविता हा त्यांच्या लेखनाचा मूळपिंड. आता तब्बल ४० वर्षांनी त्यांचा ‘बोल अंतरीचे ‘ हा कवितासंग्रह प्रसिद्ध होत आहे. मानवी नात्यांचा आग्रह धरणारी ही कविता मानवी संवेदनशिलतेचे गहिरे भावविश्व जपते. ‘श्वास माझा देईन तुम्हाला, हिंमतीने लढूया ‘ कठोर परिस्थितीला सामोरे जात उभ्या राहणाऱ्या माणसाला अस आपलं सर्वस्व देवू पाहणारा हा कवी, ‘माणुसकीचे दर्शन घडवू, आपुलकीने सर्वत्र वावरू ‘ अशी वैश्विक प्रार्थनाही या कवितेतून गातो. हेच या कवितेचे मोठे मोल आहे. समाज कोरडा होत जाणाऱ्या या काळात एकमेकांची मने जपूया, असा संदेशही या कवितेतून दिला जात असून या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुरेश बिले मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.