You are currently viewing किनारा…

किनारा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*किनारा…*

विषय समोर आल्याबरोबर कोलंबसचे
गर्वगीत समोर आले व…
“ किनारा तुला पामराला” अर्थात या ओळी
देखील डोळ्यांसमोर आल्याच.. माणसाच्या
तुफान ध्येयासक्तीचे वर्णन या कवितेत आहे.
कवी म्हणतात, हे सागरा, किती ही तुफान आले तरी तू आम्हाला अडवू, थोपवू शकत
नाही, तुझा किनारा तुलाच ठेव. हा किनाराही
आम्हाला थोपवू शकत नाही, कारण आमच्या
आशा आकांक्षांना सीमा नाही.

खरंच, मी विचार करायला लागले, स्वातंत्र्य
वीरांच्या आशा आकांक्षांना सीमा नव्हती ही
गोष्ट खरीच आहे. म्हणून तर त्यांनी देशासाठी
घरादारावर निखारा ठेवला. बलिदानासाठी हे वीर सदैव तयार राहिले, बळी गेले. स्वातंत्र्या
नंतरही आपल्या समोर अनेक आव्हाने आली,
येत आहेत, येणारच आहेत, पण कुणीही आपल्याला बांध घालू शकत नाही. कुणीही अडवू शकत नाही, कारण आम्हाला आमच्या प्रगती आड कुठलीही बंधने नको आहेत.आडकाठी नको आहे.

खरे म्हणजे किनारा असेल तर नदी किंवा समुद्र
मर्यादा ओलांडत नाही.त्यांनी मर्यादा ओलांडली तर विध्वंस ठरलेलाच असतो हे
आपण पूर येतो तेव्हा बघतोच. नदी किनारा सोडते, स्वैर फुफाट धावू लागते व आपल्या प्रवाहात सारे गिळंकृत करते. उध्वस्त करते. हा हा कार माजतो. किनारे उजाड होतात. सीमा रेषा पुसल्या जातात. किनारा नावाची गोष्टच उरत नाही. मग प्रश्न येतो, किनारा असावा की नसावा?

मला वाटते, किनारा म्हणजे मर्यादा. आणि ती
कुणीही सोडता कामा नये. नाही तर सर्वत्रच अनर्थ माजेल. किनारा, काठ असेल तर प्रत्येकाला आपली सीमारेषा कळते व ही आपण ओलांडली तर अनर्थ होईल हे ही कळते. म्हणजे किनारा एकूणच तुम्हाला जगण्याचे भान देतो. धोके ही दाखवतो. ही
मर्यादा सोडली तर काय काय होऊ शकते
याची जाणीव नसेल तर कसे चालेल? समुद्र
मर्यादा सोडत नाही, नद्या मर्यादा सोडत नाहीत
व क्वचित सुटली तर कशी त्सुनामी येते नि
विध्वंस करून जाते याचा अनुभव आपण घेतला आहे व तो फारच भयंकर व भयभीत करणारा आहे.सारे ग्रह तारे मर्यादा सांभाळतात
म्हणून बरे, नाहीतर काय होईल हो?

रोजच्या जगण्यातही आपण किनारा सोडून
भरकटलो तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. म्हणून किनारा हवाच. किनाऱ्या
वरूनच आपण जमिनीवर पाय टाकू शकतो.
एखादे ध्येय गाठायचे तर आपण म्हणतो, शेवटी मी किनारा गाठलाच! मी पैलतीरावर
पोहोचलोच. किनारा हे ध्येय ही आहे व मर्यादाही आहे. पुरात सापडलेल्यांविषयी
आपण म्हणतो, पोहोचले का ते किनाऱ्यावर?
म्हणजे सुरक्षित स्थळी गेले का?.

किनारा म्हणजे संस्कारांची किनार किंवा काठच आहे म्हणा ना? हे संस्कारच माणसाची जगण्याची दिशा ठरवतात. कुठलेच आईवडील वाईट संस्कार करत नाहीत तरी किनारा सोडून माणसे भरकटतातच. कारण त्यांच्या अहं च्या गर्तेत, आपण भरकटलो हेच त्यांना कळत नाही
इतके ते स्वार्थाने अंध झालेले असतात.त्यांची
चुकलेली दिशाच त्यांना कळत नाही व त्याच
भ्रमात ते जगत राहतात, कारण डोळे उघडे ठेवून त्यांना सत्य स्वीकारायचेच नसते. किनारा
सोडला तर काय काय अनर्थ घडतात हे रोजच्या जीवनात आपण अनुभवत असतोच. अशा लोकांना, काही अनुत्तरीत प्रश्न(जे सुटत नाहीत) ते सोडून द्यायचे असतात असे शहाणे
लोक सांगतात तसे सोडून द्यायचे असते,तेच बरोबर आहे.

तर काही लोकांना किनाराच सापडत नाही व आयुष्याचे गणितही सुटत नाही..ते आपण
काठावर पोहोचलो, गंगेत न्हालो या भ्रमात
जगत राहतात, हे ही एका दृष्टीने चांगलेच
आहे नाही का? कारण कुणाला कशात सुख
तर कुणाला कशात सुख ! किनारा न सापडलेली, भरकटलेली किती आयुष्ये आपण
पहात असतो पण आपण काहीही करू शकत
नाही.. बघण्यापलीकडे व हळहळण्या पलीकडे. शेवटी बहुरत्ना वसुंधरा… किनाऱ्या
किनाऱ्याने लोक नर्मदा परिक्रमा करतात व धन्य होतात. तो ही एक महान अनुभव आहे.या
परिक्रमेचे गो.नि. दांडेकरांनी फार विस्तृत वर्णन
केले आहे ते मी वाचले आहे, थरारक असेच आहे ते! नर्मदेने अजून कधीच मर्यादा, किनारा
सोडला नाही असे म्हणतात.

जीवन जगत असतांना इतक्या प्रकारची माणसे भेटतात की त्यांचे वागणे पाहून नवल
वाटते. काही दोन्ही किनाऱ्यावरून चालत
राहतात, व वेळ पाहून दोन्हीकडे उडी मारतात,
(सध्याचे राजकारण आपण बघतो आहोतच.) कधी इकडे, कधी तिकडे. प्रवाहात झोकून देणे
यांना माहित नसते. ते फक्त काठाकाठाने चालत राहतात, कपडे भिजू न देता.मेरी भी
जय जय.. तेरी भी जय जय असे त्यांचे धोरण
असते. माझ्या मते जीवनाला एक निश्चित ध्येय असावे.दिशा असावी व ती आपण स्वत:
ठरवलेली असावी. तेच आपले स्वत्व व स्वाभिमानत्व असते व त्यावरूनच लोकांनी
आपल्याला ओळखावे. नाही तर शीड नसलेल्या नौके सारखी आपली अवस्था होऊन
आपली नाव कुठल्या खडकावर जाऊन आदळेल याचा भरवसा नसतो. मी म्हटले ना?
बहुरत्ना वसुंधरा.. तिथे फक्त “ त्याची” सत्ता
चालते. चला, किनाऱ्यावरून भरपूर फिरून आलो आपण, आता थांबते…
॥ही फक्त माझी मते आहेत..धन्यवाद ॥

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा