*सावंतवाडी नगरपालिकेने तातडीने हटविले अनधिकृत बॅनर*
*”सावंतवाडी” की “बॅनरवाडी..??”*
*सावंतवाडीतील बॅनरबाजीमुळे उभा राहिला प्रश्न*
*संवाद मीडिया इफेक्ट*
सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे हृदय म्हणजे सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलाव आणि या हृदयाची धडकन थांबविण्याचे कार्य आज जर कोणी केले असेल तर ते सावंतवाडीतील छोट्या मोठ्या सर्वच राजकीय नेत्यांनी.. सावंतवाडी शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाच्या सभोवतालच्या काठावर मतदार संघातील अनेक लोकप्रतिनिधींनी आपले प्रसिद्धीचे बॅनर उभे केले होते. या बॅनर बाजीची कोणीही दखल घेतली नसताना *”संवाद मीडियाने”* परखडपणे या बॅनरबाजी वर भाष्य केल्याने सावंतवाडी नगरपालिका प्रशासन हडबडले आणि सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.साळुंखे यांनी पालिकेची बैठक बोलावत तातडीने शहरात अनधिकृत रित्या लागलेले गणेशोत्सव शुभेच्छांचे बॅनर हटविले. संवाद मीडियाने सावंतवाडी शहरवासीयांनाही आवाहन केले आहे की अशा प्रकारची बॅनरबाजी सावंतवाडीत होत असेल तर त्याबद्दल नागरिकांनी आवाज उठवावा व शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांना धडा शिकवावा.
सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि सावंतवाडी शहराच्या अवर्णनीय सौंदर्यामुळे “सावंतवाडी म्हणजे परमेश्वराला पडलेलं एक स्वप्न” असेही म्हटले गेले आहे. परंतु याच सावंतवाडी शहराच्या गाभ्यामध्ये असलेल्या मोती तलावावरील सुशोभित विजेच्या खांबांवर येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी गणेशोत्सव निमित्त ‘गणेश भक्तांचे स्वागत’ करणारे फलक एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागले आहेत की ज्या सावंतवाडीला सुंदरवाडी म्हटले जाते ती *सावंतवाडी आज *”बॅनरवाडी” म्हणून ओळखली जाईल की काय..?* असा प्रश्न सावंतवाडीवासियांना सतावू लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियासह विविध माध्यमांमधून सावंतवाडी शहरवासीयांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सावंतवाडी शहरात यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. सावंतवाडी शहरांमध्ये अनधिकृतरित्या तलावाच्या काठाने उभे असलेले स्टॉल, हातगाड्या देखील दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यकाळात कोणाची हयगय न करता हटवून सावंतवाडीतील मोती तलावाला मोकळा श्वास घेण्यासाठी वाव दिला होता. त्यानंतर ज्या काळात नगराध्यक्षपदी बबनराव साळगावकर असताना सावंतवाडी शहरात तलावाच्या काठाने बॅनरबाजी करण्यास मनाई करणारा ठराव सावंतवाडी नगरपालिकेने मंजूर केला होता. तसेच रीतसर परवानगी घेऊन योग्य ती फी भरून तलावाचा काठ वगळता बॅनर लावण्याची अनुमती दिली होती. सावंतवाडी नगरपालिका बैठकीत ठराव मंजूर केलेला असताना देखील आज शहर बॅनरमय झाले आहे. त्यामुळे नेतेमंडळींच्या शुभेच्छांशिवाय कोकणात गणेशोत्सव होणारच नाही की काय..? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.