नाडण पुजारेवाडीतील युवकाची आत्महत्या
देवगड
तालुक्यातील नाडण वरची पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (२२) याने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरावरील माळ्याच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वा. च्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग हा आई- वडील, बहिणीसोबत सामाईक घरात राहत होता. बहीण आजारी असल्याने उपचारासाठी ती आईसमवेत मुंबईला गेली होती. त्यामुळे पराग व त्याचे वडील हे दोघेच घरात होते. पराग हा मंगळवारी रात्री ८ वा. च्या आपल्या काकांकडे जेवणासाठी गेला. तेथून तो रात्री १० वा. च्या सुमारास आपल्या घरात झोपण्यासाठी गेला. झोपण्यापूर्वी त्याने आपल्या आईला कॉल करून तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर तो झोपण्यासाठी घरातील स्वयंपाकघरावरील माळ्याच्या खोलीत गेला. बुधवारी सकाळी नियमित वेळेत खोलीतून खाली न आल्याने त्याचे वडील त्याला पराग पुजारे घटनेची माहिती मिळताच पाहण्यासाठी माळ्याच्या खोलीकडे गेले. यावेळी त्यांना पराग हा नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. या देवगडचे पोलीस हवालदार महाडिकं व आशिष कदम घटनास्थळी जात पंचनामा महेंद्र यांनी केला. देवगड ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची खबर परागचे काका महेश मधुकर पुजारे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. या घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.
पराग हा वेल्डिंगचे काम करायचा. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. त्याने जीवन संपविण्यापूर्वी आईशी फोनद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्याने आईशी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत, कामांबाबतही चर्चा केली होती. आईसोबतच्या एका कॉलनंतर तो झोपण्यास गेला. मात्र, त्याची आई त्याला पुन्हा कॉल करत होती. परंतु, त्याने ते कॉल रिसिव्ह केले नाहीत. अन् दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.