You are currently viewing दातृत्व

दातृत्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*दातृत्व*

🕉️🕉️🕉️

 

मानवी जीवामध्ये सद्गुणांची मांदियाळी आहे. आणि हे सर्व सद्गुण संस्कार असून जीवितांसाठी सर्वार्थाने कल्याणकारी आहेत. देवत्वाची अनुभूती देणारे आहेत.

प्राचीन वाङ्मयात , धर्मग्रंथात आपल्याला सर्वप्रकारच्या सात्विक , विधायक सदगुणांची तसेच उपद्रवी दुर्गुणांची देखील ओळख होते.

*देव , दानव , राक्षस* या प्रवृत्ती आहेत. देवाचे देवत्व हे संरक्षक आहे तर राक्षसी प्रवृत्ती ही संहारक आहे असे दृष्टोपत्तीस येते.

सर्वच सद्गुण हे हितावह , सुखदायी, कल्याणप्रदी आनंद देणारे आहेत.

त्यात *दातृत्व* हा सद्गुण विलक्षण निर्मोही दात्याच प्रतिनिधित्व करतो.

दान हे सत्पात्री करावं असं म्हणतात. दान हे निरपेक्ष असतं ! त्या दान देण्याच्या प्रवृत्तीत कधी अभिलाषा नसते किंवा *मीत्व* , *अहंकार* नसतो. दिलेलं दान हे या हाताच त्या हातालाही कळू नये त्यात सात्विक गोपनियता असावी असं म्हटलं जात.

इतिहासातील अशी अनेक उदाहरणे आहेत मानवी मनाला सहज आत्ममुख करून जातात.

या छोटयाशा लेखांकात सारा परामर्श घेणे अवघड आहे. जे कोणी प्राचीन वाङमयाचे , साहित्याचे वाचक असतील त्यांना *दातृत्वाचे* अनेक दाखले परिचित असतील.

*दातृत्वाचे मूल्य हे निर्मोही ,निस्वार्थी , कृपाळू भावनेत आहे.*

दातृत्वात भक्तिभाव असतो. उच्चतम निरपेक्ष अशी कुठलीच आसक्ती नसणारी दैवी सद्गुणी , पूण्यशील भावनां असते. म्हणून *दातृत्व* हा मनाला सात्विक आनंद देणारा सद्गुण आहे.

मनात स्वार्थी भावनां , ईछया ठेवून केलेले दान व्यर्थ ठरते. ते कधीच पुण्यशील ठरत नाही.

म्हणून निर्हेतुक , अपेक्षाविरहित , निःस्पृह , स्वानंदाने केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे म्हटले जाते.

याची एक गोष्ट *महाभारतात* आहे.

 

*एकदा भगवंत श्रीकृष्ण आपला सखा धनुर्धर अर्जुनासोबत सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडतात तेंव्हा अर्जुन कृष्णाला म्हणतो ” हे कृष्णा अरे आम्ही पांडव सुद्धा सर्वाना मदत करत असतो. मुक्त हस्त्ये दानही देत असतो तरी देखील सर्वत्र फक्त *दानशूर कर्ण* *याचाच फक्त बोलबाला आहे. असे कां ?*

तेंव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतो की तुझे तुलाच उत्तर मिळेल……

*कृष्ण* आपल्या सामर्थ्याने समोर असलेला एक मोट्ठा डोंगर सोन्याचा करतो. आणि अर्जुनाला सांगतो ….

हे पार्था ” तुला जो हा सुवर्णाचा डोंगर दिसतो आहे , तो तू सर्व प्रजेला वाटून टाक , दान देवून टाक.!

तेंव्हा अर्जुन दूसरे दिवशी आपल्या दूतांकडून फावड़े आणि घमेली घेवून त्या पर्वतावर येतो , प्रजेला बोलावतो आणि प्रत्येकाला डोंगर खणुन एक एक घमेलं सोनं देत रहातो. तो त्याचे सारे दूत दमुन जातात. संध्याकाळ होते. पण तो सुवर्णाचा पर्वत तसुभर देखील कमी झाल्याचे दिसत नाही.

पण मी प्रत्येकाला *हे सोनं देत आहे*

हा अभिमान अर्जुनाला झालेला असतो.

 

दूसरे दिवशी जेंव्हा परत या कामासाठी जायचे असते तेंव्हा.

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तू आज *महारथी कर्णास* बोलव.

त्याप्रमाणे कर्ण येतो देखील ..

मग कर्णाला कृष्ण म्हणतो ” हे *अंगराज कर्ण* ” अरे हा सुवर्ण पर्वत तू सर्व प्रजेला दान करुन टाक .!

कर्ण कृष्णाला नमस्कार करतो आणि म्हणतो ” *प्रभु जशी आज्ञा*

कर्ण सर्व प्रजेला बोलावतो आणि सांगतो ” *हे बंधु भगीनींनो हा जो समोर सुवर्ण पर्वत दिसतो आहे. तो तुम्ही सर्व वाटून घ्या.*

सर्वजण वाटूनही घेतात.

तेंव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो तुझ्या दातृत्वात असलेला फरक आणि कर्णाच्या दातृत्वात असलेला फरक तुला जाणवला असेल पार्था.!

कर्णाने क्षणाचाही विलंब न लावता तो सर्व डोंगरच कुठलाही मोह न करता , मनात कुठलाही अभिमान न बाळगता प्रजेच्या स्वाधीन केला.

*तो स्वतः तिथे थांबला देखील नाही.*

म्हणून *दानशूर कर्ण* हा सर्वश्रेष्ठ आहे. *कारण त्याचे दातृत्व हे अत्यंत निर्मोही , निस्वार्थी कृपाळू असे आहे*

हे असे दातृत्व…! उच्चकोटिच्या भावनात्मकतेची राजहंसी प्रचिती आहे. एक निर्मली सात्विकता आहे.

 

*शतेषु जायते शुर: सहस्रेषु च पण्डितः*

*वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ।।*

( *हे सुभाषित सर्वश्रुत आहे* )

शुरवीर शंभरातून एखादा अवतरतो.

विद्वान हजारांतुन एखादा अवतरतो.

वक्ता दहा हजारांतुन एक जन्मतो.

*दातृत्व मात्र खूपच दुर्मिळ असते.*

म्हणून *दातृत्व हा सद्गुण सर्वात मोट्ठा आहे..!!!*

*इति लेखन सीमा* … …

*****************************

*©️वि.ग.सातपुते..( साहित्यिक )*

*दिनांक : 5 / 9 / 2024*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा