You are currently viewing लॉकडाऊनच्या काळातील माझी साधना..

लॉकडाऊनच्या काळातील माझी साधना..

*लेखक प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*लॉकडाऊनच्या काळातील माझी साधना…*

*(शिक्षक म्हणून घेतलेला असाही एक अनुभव)*

 

करी मनोरंजन जो मुलांचे

जडेल नाते प्रभूशी तयाचे.

या सानेगुरुजींच्या वचनाला अनुसरून शिक्षकी पेशा स्वीकारला अन गेली 25 वर्षे हिंदी विषयाच्या अध्यापनापासून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभाषेचा अभिमान, राष्ट्रभाषेची गोडी निर्माण करतो आहे. तर विद्यार्थ्यांच्या नसानसात इतिहास रुजावा, आपल्या वैभवशाली इतिहासाची परंपरा या पिढीने जतन करावी यासाठी इतिहासाच्या अध्यापनातूनही प्रयत्नशील आहे. याचा परिपाक म्हणजे माझ्या हाताखालून गुणवंत विद्यार्थी घडत आहेत. आताच साजरी झालेल्या व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे आलेले दूरध्वनी मला माझ्या शिक्षकी पेशाचे सार्थक झाल्याचे समाधान देऊन गेले. असा हा शालेय जीवन प्रवास मार्च 2020 पर्यंत सुरू होता याच काळात जगाला हादरवणारी कोरोना संकटाची बातमी येऊन धडकली. हे संकट भारताच्याही उंबरठ्यावर येऊन ठेपलं आणि साम्यवादी चळवळीत एखाद्या कंपनीच्या टाळेबंदीबद्दल माहिती देणारा मी प्रत्यक्षात टाळेबंदी अनुभवू लागलो. 23 मार्चला टाळेबंदीच्या निमित्ताने घरी बसलो मनात आलं ‘ ये वक्त भी कितना अजीब है, पहले मिलता नहीं था’ आता मिळाला तर मस्त जगून घेऊ… आणि शुभारंभ झाला लॉकडाऊन मधील साधनेला…

विद्यार्थी मित्रांनो मला आठवते, मार्च महिना होता त्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षा सुरू होत्या. भारतात कोरोनाने आपले हातपाय पसरायला नुकतीच सुरुवात केली होती व त्याच्या प्रसाराच्या वेगाची सर्वांना कल्पना होती. सर्वत्र कोरोनाच्या भीतीयुक्त दहशतीचे राज्य होते. शेवटी महाराष्ट्र व भारत सरकारने लॉकडाऊनला सुरुवात केली पण दहावीचे पेपर सुरू होते. कोरोनाचा वेगाने प्रसार होत होता. शेवटी नाईलाजास्तव दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. इतर सर्वच परीक्षा कोरोनामुळे यथावकाश रद्द झाल्या.

याच कालखंडात कोरोनावर घडत असलेल्या घडामोडींसंदर्भात माझे लिखाण सुरू होते. त्या कालखंडात सोलापूर स्काऊट गाईड विभागाने डॉ. शंकर चामे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ‘मी कोरोना फायटर’ आयोजित केली होती. माझ्या लेखनाचा उपयोग माझ्या सुविद्य पत्नीने करून घेतला व कोरोना संदर्भात आयोजित निबंध स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात तिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व योग्य लस अजूनही न मिळाल्याने लॉकडाऊन प्रक्रिया सुरूच होती. भरपूर वेळ होता. इतर सर्व परीक्षा रद्द झाल्या, विद्यार्थ्यांचा सरासरी वर आधारित निकालाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्यात आला व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यातही आला. अर्थात हे सर्व ऑनलाईन कारण बाहेर लॉकडाऊन.

यासोबत दहावीचे पेपर तपासण्याचे कामही सुरू होते. मी मॉडरेटर असल्याने बोर्डाने ठरवून दिलेल्या ठिकाणी मॉडरेट केलेले पेपर पोहोचविण्याचे काम पूर्ण केले. तरीही या कालखंडात एक शिक्षक म्हणून सतत शाळेसंबंधी व विद्यार्थ्यांसंबंधी विविध प्रकारचे प्रश्न होतेच. दरवर्षी माझी मे महिन्याची सुट्टी आमच्याच संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या B. A. B. Com अभ्यास केंद्राचा केंद्रसंयोजक या नात्याने परीक्षा घेण्यात जात होती. पण या वर्षी तसे काहीच काम नव्हते. बाहेर ही जाता येत नव्हते. तसे मला बाहेर सहज म्हणून फिरायला आवडतच नाही. तरी कधी कुटुंबाच्या आग्रहामुळे दरवर्षी चार-पाच दिवस मे-जून च्या सुट्टीत कुठेतरी जावेच लागत असे. यावर्षी तेही शक्य नव्हते.

अनेक वर्षापासून मनात काही सुप्त इच्छा होत्या. योगायोगाने त्या माझ्या शिक्षकी पेशा किंवा व्यवसायाशी साधर्म्य साधणार्‍या होत्या. पण त्या पूर्ण करण्यासाठी कधी वेळ मिळाला नाही किंवा असा योग जुळून आला नाही. आपण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे असे सतत वाटत होतेच. वेळ जात नव्हता एकदा लॅपटॉप मधील Data पाहत होतो. तेव्हा त्यात 2017 मध्ये माझ्याच वर्गातील मुलांनी माझ्या मोबाईलवर माझे वर्गात शिकवितानाचे व्हिडिओ बनविलेले होते. मोबाईलमधील Data लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करण्याची सवय असल्याने ते दृष्टीस पडले. आता प्रश्न होता ते व्हिडीओ मुलांपर्यंत पोहोचवायचे कसे. कारण व्हाट्सअप हे एकमेव तंत्र माध्यम मला माहित होते. त्या माध्यमातून 30 ते 40 मिनिटांचे माझे वर्गातील व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचवणे शक्य नव्हते.

मग या संदर्भात आपल्याला कोण मदत करू शकेल त्याचा शोध सुरू केला व YouTube वर आपण मोठे व्हिडीओ सहज पाठवू शकतो हे लक्षात आले. मग YouTube ला व्हिडिओ कसे टाकायचे याचा शोध सुरू केला. एका स्नेहीच्या सहाय्याने स्वतःचे चॅनल सुरू केले ते करताना मनात अनेक प्रश्नांचे काहूर निर्माण झाले होते. म्हणून या संदर्भात काम करणाऱ्या अनेक शिक्षकांचा आधी शोध घेतला व त्यांच्याशी चर्चा केली. मनातील प्रश्नांना शांतता मिळाली. पुढे YouTube ला चॅनल सुरू झाल्यावर आधी आहेत ते व्हिडिओ Unlisted म्हणून upload केले. आता आपल्याला योग्य साधन मिळाले आहे. आपण नवीन व्हिडीओ बनवू शकतो व YouTube ला टाकू शकतो हे लक्षात आले. त्यानुसार Smartphone संदर्भातील मला माहिती असलेल्या features चा उपयोग करून मी इ.10 साठी अजून दोन व्हिडिओ बनविले ते ही YouTube वर टाकले. अजून मी कोणालाही YouTube ची लिंक पाठवलेली नव्हती. पण आपण व्हिडिओ बनवू शकतो व ते YouTube ला टाकू शकतो याचा मला या वयात सुद्धा फार आनंद झाला होता. हे सर्व घडले ते संपूर्ण लॉकडाऊनमुळे. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तोच एक ध्यास लागला होता. आता हे व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधी शाळेची परवानगी हवी. म्हणून आधी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय संगीता पाखले मॅडम यांच्याशी संवाद साधला व आधी दोन व्हिडिओ त्यांना पाठविले. आतापर्यंत माझ्या मनात जे सारे विचार सुरु होते ते त्याच्याही आधीपासून त्यांच्या मनात सुरूच होते. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्या व्हिडिओ मध्ये काही दोष होते, त्या संदर्भात त्यांनी मला मार्गदर्शन केले. माझ्या जीवनात जी प्रेरणा देणारी माणसे आली, त्यात आमच्या मुख्याध्यापिकांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे मी अधिकाधिक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

माझ्या काही शिक्षक मित्रांना ही व्हिडिओ पाठविले त्यांचेही अभिप्राय घेतले. त्यांनीही आवश्यक ते बदल सुचविले व तयार व्हिडिओत विविध प्रकारे तांत्रिक बदल करून ते अधिकाधिक आकर्षक बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगले यश मिळाले. या कामी मला काही जिवलग स्नेहींचे तांत्रिक सहकार्य मिळाले. व्हिडिओ जसजसे बनत होते तसतसे ते माननीय मुख्याध्यापिकांच्या मंजुरीनंतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होते व विद्यार्थ्यांचे त्यांबद्दल चे अभिप्राय समाधान देणारे वाटत होते. हळूहळू एकेक करत आता 50 पेक्षा जास्त व्हिडीओ पूर्ण झाले आहेत. अजून काम सुरूच होते.

पुढे 15 जूनला शाळा सुरू होणार की नाही या संभ्रमावस्थेत होतो. त्यावेळी आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका पाखले मॅडम यांनी zoom वर ऑनलाइन लेक्चर सुरू केले व तोही एक खूप नवीन अनुभव होता. त्याही प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळाले.

ही साधना परिपूर्ण होण्यासाठी माझी पत्नी, मुलं, तंत्रज्ञान स्नेही, शिक्षक मित्र, माझे प्रेरणास्थान माझी संस्था व माननीय मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले मॅडम ही सगळी मंडळी साधने झाली या साधनांच्या सहाय्याने माझी ही लॉकडाऊन मधील साधना सुफळ संपूर्ण झाली.

पण आता थांबायचं नाही. शेवटात एक नवीन सुरुवात असते तंत्रज्ञान क्षेत्रात नवं काही शिकायची !

आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मागे वळून पाहताना अनेक शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयावर वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून प्रासंगिक लेखन सुरू झाले त्याचे, व youtube च्या माध्यमातून सततचा होणारा विद्यार्थी व समाजाशी संवाद समाधान देऊन जात असतो.

धन्यवाद.

 

शिक्षक लेखकाचे नाव –

प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे

शाळेचे नाव – उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली

मोबाईल – 9967817876

prashantshirude1674@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा