You are currently viewing कात्रज तलावाजवळ स्नेहसंमेलन निमित्ताने जुन्या एस एस सी अकरावीच्या मित्रांची बावन्न वर्षांनी भेट

कात्रज तलावाजवळ स्नेहसंमेलन निमित्ताने जुन्या एस एस सी अकरावीच्या मित्रांची बावन्न वर्षांनी भेट

कात्रज – (प्रतिनिधी)

दौंड येथील भीमथडी शिक्षण संस्थेच्या शेठ जोती प्रसाद विद्यालयाचे १९७२ सालचे अ तुकडी चे विद्यार्थी दौंड केंद्रातून उत्तीर्ण झाले होते. कात्रज तलावाजवळ स्नेहसंमेलन निमित्ताने जुन्या एस एस सी अकरावीच्या मित्रांची भेट बावन्न वर्षांनी झाली. पुढील शिक्षणासाठी ते वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये आवडीच्या शाखा शिक्षणासाठी गेले. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कृषी, पॉलिटेक्निक, मध्ये प्रवेश घेतला. नोकरी, व्यवसाय, यामुळे ते भेटू शकले नव्हते. किशोर गायकैवारी याने सर्वांशी संपर्क, समन्वय साधला.

मा.नरेश तारे यांनी जुन्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून देणे, उत्तम भोजन व्यवस्था करण्यात त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती, मुलगा श्री.निखिल, सूनबाई सौ. धनश्री यांनी अगत्याने स्वागत केले. कवी बाबू डिसोजा हे तब्येत बरी नसतानाही आले, कळवळीपोटी भेटले. त्यांनी त्यांच्या एका “बालमित्र” कवितेचे वाचन केले.

प्रत्येकजण मनमोकळेपणाने बोलला. जीवनात आलेल्या अडचणी, केलेली मात, जीवनातील चढ उतार, सुख दुःखे, आपल्यांचे घडलेले वियोग, बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न, आलेल्या आजारांवर केलेली मात यावर प्रत्येक जण व्यक्त झाला.

प्रत्येक जण भारावला. भावूक, हळवा झाला. मा. शब्बीर शेख, अनिल वैद्य, बच्चू परमार, डॉ. धीरेंद्र मोहन, सिद्धार्थ कामाठी, नामदेव गाडीलकर, नरेश तारे, सुधीर देशपांडे, सुनील लोणकर, उदय शहा, प्रदीप देशपांडे, बाबू डिसोजा, विजय जगदाळे यांनी आपले अनुभव सर्वांपुढे मांडले. काही काळ सर्व निःशब्द झाले होते.

मा. नामदेव गाडीलकर, बच्चु परमार आणि निलीमा शिकारखाने यांनी मित्रांसाठी आणलेल्या भेटी अप्रतिम होत्या. त्या त्यांनी वितरित केल्या.

सौ. किशोर, सौ. प्रदिप आणि सौ. नरेश यांनी सर्व मित्रांच्या वटवटीला शांत चित्ताने खंबीरपणे ४-५ तास सहन केले. आपल्या मोहन डाॅक्टरचा मिश्किलपणा, बाकीच्यांचा वात्रटपणा संमेलनात अनुभवायला मिळाला.

या स्नेह संमेलनाविषयी काही प्रतिष्ठीतांच्या प्रातिनिधिक बोलक्या प्रतिक्रिया –

सुधीर देशपांडे – आपल्या पहिल्या वहिल्या गेट टुगेदर मध्ये सामील होता आले याचं खूप अप्रूप वाटले. जमलेल्या आपण सर्वांनीच आपल्या अडचणी बाजुला ठेवत सामिल झालात खूप छान वाटले. सर्वांची प्रगति ऐकून मन तृप्त झालं. जे कोणी येवू शकले नाहीत त्यांना आम्ही सगळ्यांनीच मिस् केलंय. पुढच्यावेळी मात्र सगळे नक्कीच भेटू या.

किशोर गायकैवारी  सगळेचजण अगदी उत्साहाने आले आणि सर्वांनी आपापले मनोगत मनमोकळेपणे व्यक्त केले. छान वाटले. आणि ५० / ५२ वर्षानंतरही आपल्या सगळ्यांची मैत्री शालेय जीवनाइतकीच घट्ट आहे हे पाहून खूप छान वाटले. आजचा संपूर्ण दिवस खरोखरच खूप आनंदात गेला. आणि आपण सर्वच रिफ्रेश झालो.

डॉ. धीरेंद्र मोहन (मोहन हॉस्पिटल,केडगाव, दौंड) – सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. कधीही, कोठेही, कोणाला कोणतीही मेडिकल इमर्जन्सी वाटली तर माझ्याशी संपर्क करा. माझ्या कडून नक्की मदत करेन.

इंजिनीअर, सिद्धार्थ कामाठी (सोलापूर) – आज चा हा उपक्रम नक्की मोठा संस्मरणीय आहे. आपण पुन्हा नक्की भेटू या.

(व्यवसायिक, दौंड) अनिल वैद्य – आपले पहिलेच गेट टुगेदर खूपच छान झाले. सर्वजण खुप आनंदाने एकत्र आलो सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामुळे मन प्रसन्न झाले.

असेच पुन्हा भेटण्याचे, आज हजर नसलेल्या, अधिक मित्रांना घेऊन भेटण्याचे ठरवून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा