*वाऱ्याच्या वेगाने की….???*
सावंतवाडीतील मोती तलावाचा काठ आज गणेशोत्सव निमित्त गणेश भक्तांचे स्वागत करणाऱ्या मोठमोठ्या फलकांनी गजबजला आहे. याच सर्व बॅनरबाजी मध्ये सावंतवाडीचे ना.दीपक केसरकर यांचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे पाठीशी असल्याचे चित्र असणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. संपूर्ण तलावाच्या कडेने विद्युत खांबांवर लावण्यात आलेले बॅनर जसेच्या तसे असताना सावंतवाडीतील भाजपा कार्यालयासमोरील काही बॅनर मात्र दुपारच्या सुमारास खाली कोसळलेले दिसले. त्यामुळे दीपक केसरकर यांचे गणेशोत्सव स्वागताचे बॅनर भाजपा कार्यालयासमोरच वाऱ्याच्या वेगाने कोसळले की त्यात अजून काही विशेष आहे…? हे मात्र समजू शकले नसल्याने पाहणाऱ्या अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिले.
सावंतवाडीचे दिपक केसरकर आणि स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यामध्ये प्रत्येकाच्या आशा अपेक्षा वाढल्याने म्हणा किंवा केसरकरांनी गेली पंधरा वर्षे मतदारसंघ आपल्याकडे राखल्याने केसरकर आणि भाजपा लोक्रतिनिधी यांच्यात वैयक्तिक पातळीवर मतभेद आहेत. खास.नारायण राणे यांच्यासोबत असलेले मतभेद मिटल्यानंतर देखील स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधी आणि केसरकर यांच्यात दिलजमाई झालेली नाही. त्यामुळे शहराच्या इतर भागातील किंवा तलावाच्या काठावरील इतर सर्व बॅनर उभे असताना भाजपा कार्यालयासमोरील बॅनर कसे काय पडले असा प्रश्न उभा राहिला आहे.