You are currently viewing शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे बॅनर चर्चेचा विषय

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे बॅनर चर्चेचा विषय

*खासदार नारायण राणे पाठीशी असल्याचे चित्र लक्ष्यवेधी*

 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हाभरात विविध नेतेमंडळींचे गणेश भक्तांचे स्वागत करणारे फलक जागोजागी लागलेले दिसत आहेत. सावंतवाडी शहरात मतदारसंघाचे लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याचे शिक्षण तथा मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत…आणि याचे कारण म्हणजे दीपक केसरकर यांचे “शिवसेना सिंधुदुर्ग” या नावाने धनुष्यबाण निशाणी असलेल्या बॅनरवर केसरकरांच्या पाठीशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा फोटो आहे..आणि नारायण राणे यांच्या छातीवर कमळ ही निशाणी लक्ष्यवेधी ठरली असल्याने केसरकरांचे लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे भाजपा मधील डझनभर इच्छुकांची बत्ती गुल झाल्याची चर्चा आहे.

सावंतवाडी मतदारसंघ हा गेली १५ वर्षे दीपक केसरकर यांच्या अधिपत्याखाली आहे. पुढील दोन महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असून दीपक केसरकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असून यावेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपा मधील अनेक इच्छुकांचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत केसरकर यांच्या समोर डाळ न शिजलेले आणि सपाटून हार मिळालेले माजी विधानपरिषद सदस्य राजन तेली तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. परंतु प्रत्येकवेळी पक्षातून एकालाच का संधी मिळावी..? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा पक्षाचे तरुण तडफदार नेतृत्व मानले जाणारे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब आणि भाजपा राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष विशाल परब दोघेही काही झालं तरी यावेळी माघार नाही असा विचार करून मैदानात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराची आघाडी उघडली असून यात राजन तेली हे शब्दांचे प्रहार करून प्रचार करत आहेत तर विशाल परब गावागावात विविध मार्गांनी मदतकार्य करून आपण “लंबी रेस का घोडा” असल्याचे दाखवून देत आहेत. संजू परब जरी गावोगावी प्रचार करत नसले तरी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या तिघांपेक्षा आणखी देखील काही जण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वार सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यात खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडीत डझनभर इच्छुक असल्याचे सांगत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना तराजुच (राणे यांच्या शब्दात तागडी) घ्यावा लागेल, ज्यांचं वजन जास्त त्याला उमेदवारी मिळेल…असे मिश्किल विधान केले होते. त्याप्रसंगी व्यासपीठावर इच्छुक असलेले राजन तेली, संजू परब, विशाल परब हे आघाडीवर असलेले उमेदवार उपस्थित होते. त्यामुळे राणेंच्या विधानावर हशा पिकला होता.

दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बॅनर लावून त्यावर आपल्या पाठीशी कमळ निशाणी असलेली खासदार नारायण राणे यांची छबी लावत भाजपाच्या इच्छुकांची बत्ती गुल केल्याचे बोलले जात आहे. केसरकरांनी खासदारकीच्या निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केसरकर यांना आपल्या वडिलांच्या विजयात मॅन ऑफ दी मॅच असे विधान केलं होत,याच अधिकाराने केसरकर यांनी नारायण राणेंची छबी वापरली असल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून दीपक केसरकर यांच्यावर संधी मिळेल तेव्हा तोंडसुख घेणाऱ्या राजन तेली यांचे बॅनर कुठेही दृष्टीस पडत नसल्याने…”राजन तेली का..?” असा उपस्थित केलेला प्रश्न मिटला की काय अशी चर्चा आहे. विशाल परब यांच्यासोबत अलीकडे सतत सावलीप्रमाणे फिरणारे आणि ज्यांचे वाढदिवस देखील विशाल परब यांच्या कार्यालयात धुमधडाक्यात साजरे झाले,त्यांची छबी मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संजू परब यांच्या बॅनर वर दिसत आहेत त्यामुळे विशाल परब आणि संजू परब या मित्रांच्या मैत्रीमध्ये देखील मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा