एक गाव एक गणपती प्रथा असलेला कोईल गाव जपतोय शेकडो वर्षांची परंपरा
मालवण / प्रतिनिधी :-
‘एक गाव एक गणपती’ ही सुमारे सहाशे वर्षांची प्रथा जोपासणाऱ्या मालवण तालुक्यातील कोईल गावात गणपती विसर्जनाचीही अनोखी परंपरा आहे. गणपती मूर्ती विसर्जनाने नव्हे तर मंदिरातील फुलपत्री विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता होते.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या कोईल गावात कोणत्याही घरात गणपतीच्या वेगळ्या मूर्तीची स्थापना केली जात नाही. गणेश मंदिरात उत्सव साजरा होतो. अकरा दिवसाच्या या गणेशोत्सवात यावर्षी गणेश पूजे व्यतिरिक्त अन्य कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले. अकराव्या दिवशी स्वयंभू गणेश मूर्तीवरील माटवीच्या फुलपत्रीचे नजीकच असलेल्या कालावल खाडी पात्रात विसर्जन करून या गणेशोत्सवाची सांगता झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर येथील गणेश मंदिरात शासकीय नियमाला अधीन राहून यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाविकांना फक्त गणेश दर्शन आणि पूजनाचा लाभ घेता आला. गावातील लोक आपल्या घरात गणेश चतुर्थीलाच नव्हे तर इतर कधीही गणपतीची पूजा करीत नाहीत. दुसऱ्याच्या गणपतीला हात सुद्धा लावत नाहीत. अनंत चतुर्थी दिवशी सायंकाळी गावातील ग्रामस्थ देवालयात जमल्या नंतर गणपतीच्या स्वयंभू मूर्तीवरील फुल पत्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली व खाडी पात्रातील पाण्यात विसर्जन करण्यात आले.