You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करा…

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करा…

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करा…

बांदा मराठा समाजाची मागणी: बांदा पोलिसांना निवेदन सादर..

बांदा

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवस्मारक पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा, तसेच यातील जे अपराधी असतील त्यांना पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकार यांनी तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी बांदा मराठा समाजाच्यावतीने बांदा पोलिसांना निवेदन देण्यात आले.

सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा आपल्या दैवताचा व महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची तमाम शिवप्रेमींची संतप्त भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाराजांचा पुतळा पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा अशी मागणी यावेळी बांदा मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्यें, महिला अध्यक्षा स्वाती सावंत, सचिव माधवी गाड, बांदा मुख्य समन्वयक लक्ष्मी सावंत, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, महेश सावंत-मोर्ये, राखी कळंगुटकर, लव रेडकर, राकेश परब, स्वप्नील सावंत, अरुणा सावंत, हेमंत दाभोलकर, लता रेडकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.
कोट :-
शिवरायांच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञान विकसित नसताना सुद्धा जावळीच्या खोऱ्यात पार गावाजवळ शिवरायांनी बांधून घेतलेला शिवकालीन पूल आजही जसाच्या तसा असल्याचे पाहायला मिळते आणि सध्याच्या विज्ञान युगात काही महिन्यापूर्वीच बांधलेला व पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा मात्र कोसळतो. आमच सरकार असेल तेव्हा तुम्ही आम्हाला दोष द्यायचा आणि तुमचं सरकार असेल तेव्हा आम्ही तुम्हाला दोष देऊ, एवढ्याच राजकारणापुरतं या विषयाचा विचार न करता त्याच्या खोलात जायला हवं. किमान आमच्या अस्मितेच्या प्रतीक असलेल्या शिवरायांच्या बाबतीत सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून अभ्यास, तज्ञता, कौशल्य, निष्ठा ,अस्मिता, प्रेम या गुणांनीच शिवरायांच्या बाबतीतील कोणतही काम करायला हवं. राजे हे आम्हा सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या पुतळ्या बाबत घडलेल्या घटनेचे राजकरण करू नये ही विनंती विराज परब, मराठा समाज अध्यक्ष बांदा ‌ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा