You are currently viewing उडता पंजाब की उडता महाराष्ट्र !

उडता पंजाब की उडता महाराष्ट्र !

*पारिजात साहित्य समूहाचे प्रशासक लेखक कवी प्रा. एस. यू. मुल्ला लिखित अप्रतिम लेख*

 

*उडता पंजाब की उडता महाराष्ट्र !*

 

उडता पंजाब या हिंदी चित्रपटांमध्ये ड्रग्स या सदरामध्ये येणाऱ्या पदार्थांच्या गैरवापरामुळे पंजाब या राज्यातील परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवण्यात आले आहे. अफगाणिस्तान तसेच पाकिस्तान इत्यादी देशांमधून सहजपणे उपलब्ध होणाऱ्या अफीम आणि तत्सम पदार्थांच्या अतिवापरामुळे तेथील संपूर्ण पिढी बरबाद झालेली आढळते. नुकत्याच पुणे, नाशिक शहरामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या धाडींमध्ये करोडो रुपयांची ड्रग्स जप्त करण्यात आली आणि संत परंपरा लाभलेला महाराष्ट्र हादरून गेला.

हेरोइन, गांजा , एल एस डी, एमडीएमए (ecstasy) इत्यादी पदार्थ (drug substances) मेंदू आणि मज्जास्तंतू संस्थेवर परिणाम करतात आणि या पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्यांचे व्यसनही जडते (addiction). तरुणांमध्ये विशेषतः कॉलेज मध्ये जाणाऱ्या युवकांमध्ये या पदार्थाविषयी विशेषत: आकर्षण आढळून येते. एकदा का या पदार्थांच्या विळख्यामध्ये जर का एखादी व्यक्ती अडकली तर त्यातून बाहेर पडणे किती कठीण आहे, हे संजू चित्रपट पाहिलेल्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ज्ञात आहे. बरेचसे हिंदी चित्रपट वरील उल्लेख केलेल्या पदार्थांचा तरुण पिढीमध्ये असलेला वापर दाखवतात आणि त्यामुळे बाधित तरुणांचे आयुष्य कसे बरबाद होते हे सर्व सामान्यांना माहिती पडते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर त्यांनी दिलेल्या अंधश्रद्धा विरोधी लढ्यामुळे परिचित आहेत. या त्यांच्या महान कार्यांबरोबरच ते व्यसनमुक्ती संस्था देखील चालवीत असत. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनतेमुळे डॉ. दाभोळकर विचलित झाले होते आणि त्यांनी व्यसनाधीन तरुणांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या संस्थेमार्फत खूप प्रयत्न केले. त्यांच्या मते ग्रामीण युवकांमध्ये दारूपेक्षा तंबाखूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आढळून येते. आपल्या देशामध्ये तंबाखूचे ( tobacco) सिगारेट, बिडी या स्वरूपामध्ये धूम्रपान केले जाते तर ग्रामीण लोकांमध्ये सर्रासपणे चुना मिश्रित तंबाखू चघळली जाते. तंबाखूचे अति सेवन मानवी आरोग्यास अत्यंत घातक असते . डॉ. दाभोळकरांनी त्यांच्या लेखनामध्ये उल्लेख केला आहे की त्यांच्या दवाखान्यामध्ये अपत्य प्राप्तीसाठी भेट देणाऱ्या रुग्णांमध्ये‌ जवळजवळ ८०% रुग्ण तंबाखूच्या अति सेवनामुळे बाधित होते. अशाप्रकारे शहरांमध्ये आढळणारी व्यसनाधीनता आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आढळून येणारी व्यसनाधीनता वेगवेगळ्या प्रकारामध्ये पहावयास मिळते . सुशिक्षित तरुणांमध्ये खरे तर व्यसनाधीनता कमी प्रमाणात असावयास हवी परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास असे आढळून येते की सुशिक्षित शहरी जनतेमध्ये सुद्धा व्यसनाधीनतेचे प्रमाण ग्रामीण जनतेपेक्षा घातक स्वरूपामध्ये पहावयास मिळते.

माझ्या लहानपणी शेजारी राहणारी एक व्यक्ती गांजा ( marijuana) या पदार्थाच्या व्यसनाने ग्रस्त होती. दिवसातून एक दोन वेळा ती चिलम मध्ये गांजा भरून त्यावर विस्तव ठेवून त्याचे धूम्रपान करीत असे. गांजा हा पदार्थ मेंदवर परिणाम करत असतो. गांजा किंवा Marijuana(cannabis, weed) is a mind altering substance that comes from the cannabis sativa plant. याचे अति सेवन व्यसनामध्ये परावर्तित होते. याच्या अमला खाली असलेली व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी सुद्धा करू शकते. या पदार्थांच्या व्यसना मुळे ती व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब बरबाद होऊ शकते. ग्रामीण क्षेत्रांमध्ये उपलब्ध नसलेली drug rehabilitation centre किंवा पुनर्वसन केंद्रे या पदार्थाच्या अतिवापरासाठी किंबहुना जबाबदार ठरतील. माझ्या घराशेजारील व्यक्ती देखील या पदार्थाच्या संपूर्ण अमला खाली गेली होती. दिवस-रात्र नशेमध्ये असणारी ही व्यक्ती एक दिवस चक्कर येऊन पडते आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला या पदार्थाच्या गंभीर परिणामाची जाणीव होते आणि तो या पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडतो. असे मात्र क्वचितच घडते. Drug addiction अति गंभीर मामला असून त्यासाठी प्रशासनातर्फे शास्त्रीय पद्धतीने इलाज होणे जरुरी आहे.

अशाप्रकारे वर उल्लेख केलेल्या पदार्थांव्यतिरिक्त असे अनेक पदार्थ आहेत की ज्यांच्यामुळे व्यसनाधीनता षहावयास मिळते. देशामध्ये घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा जर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला तर त्यातील बरेचसे गुन्हे अशा पदार्थांच्या( drug substances) अंमलाखाली घडलेले आढळून येतील. आणि त्यामुळेच व्यसने, व्यसन घडवणारे पदार्थ आणि त्यांचा गैरवापर (drug abuse) याकडे सर्वांनी गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. अशा पदार्थांची उपलब्धता आणि त्यांचा कोवळ्या वयात होणारा वापर, त्यामधून प्राप्त होणारी मोठी रक्कम, हे सर्व अत्यंत भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली पब संस्कृती व्यसनाधीनतेला खतपाणी तर घालत नाही ना याचा सुद्धा विचार होणे खूप आवश्यक आहे. नाहीतर उडता पंजाब सारखाच उडता महाराष्ट्र लवकरच आपणा सर्वांना पाहावयास मिळेल.

.

प्रा एस यू मुल्ला

एम.फार्म. एलएलबी.

9821419833

प्रतिक्रिया व्यक्त करा