You are currently viewing राजकोटच्या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करा.!

राजकोटच्या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करा.!

सकल मराठा समाज सावंतवाडीने प्रांताधिकारी यांच्याकडे केली मागणी..

 

सीताराम गावडे यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज शिष्टमंडळाने दिले निवेदन..

 

सावंतवाडी :

अखंड विश्वाचं दैवत असणाऱ्या आणि तमाम भारतीयांच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवण राजकोट येथे पुतळा कोसळून झालेली विटंबना ही तमाम मराठी मुलखासाठी शरमेची बाब आहे. या घटनेचा निषेध करावा तो कमीच आहे. मात्र घाईगडबडीने या पुतळ्याचे काम करण्यात आले आणि ज्या तरुण शिल्पकाराला काम देण्यात आले, त्याचा अत्यंत अल्प अनुभव लक्षात का घेतला गेला नाही? परिणामी या दुर्दैवी घटनेला जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी सकल मराठा समाज सावंतवाडीतर्फे आज सावंतवाडीचे प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक, सचिव आकाश मिसाळ, ज्येष्ठ पदाधिकारी कृष्णाजी रामचंद्र कोठावळे, सचिन सावंत, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, राजेश नाईक, रुपेश पाटील, भिकाजी नारायण धोंड, नितीन सुरेश गावडे, जगदीश धोंड, सीताराम सावंत, लवू साटम, राघोजी सावंत, आनंद सावंत, पंढरी राऊळ, विलास जाधव, रुपेश परब, त्रिविक्रम सावंत,  प्रशांत रामचंद्र मोरजकर, लक्ष्मण पावसकर, रुपेश देसाई, प्रसाद राऊळ, महादेव राऊळ, राजन राऊळ, संजय लाड, यांसह अनेक  सकल मराठा समाजाचे बांधव यावेळी उपस्थित होते.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन स्वीकारत प्रांताधिकारी यांनी आपण शासनाकडे नक्कीच या निवेदनाचा पाठपुरावा करू व छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना योग्य ते शासन व्हावे, यासाठी योग्य ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान निवेदन देण्यापूर्वी सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल येथे संपन्न झाली. यावेळी सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते सीताराम गावडे यांनी मार्गदर्शन केले. श्री. गावडे म्हणाले आपल्या सर्वांचे दैवत असलेले छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपले रक्त सांडले. त्या महान विभूतीचा पुतळा केवळ साडेआठ महिन्यात कसा कोसळतो?, या मागे जे जे गुन्हेगार आहेत, त्यांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. यासाठी सकल मराठा समाजाने विविध पक्ष, पद किंवा आपली संस्था यांची पादत्राणे बाजूला ठेवत एकत्र येण्याची गरज आहे. आता खूप झाले. अन्याय सहन करण्याची विशिष्ट क्षमता असते. आपला मराठा समाज खूप संयमी, शांत अजूनही आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र याचा कोणी गैरफायदा घेतला आणि आमच्या भावनांशी खेळ करीत राहिलात तर मग आम्ही आमचा रौद्र अवतार नक्कीच दाखवू, असा इशारा देखील यावेळी सीताराम गावडे यांनी दिला.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी कृष्णाजी कोठावळे यांनीही सकल मराठा समाजाने आता एकत्र येण्याची गरज असून प्रत्येक गावात उठाव करून आपले नेते मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेश नाईक यांनीही मार्गदर्शन करत सकल मराठा समाज हा शहरापेक्षा वाड्यावस्तीत जास्त वास्तव्य करत असल्यामुळे प्रत्येक गावात जाऊन समाजाची बैठक घेत चांगले कार्यकर्ते निर्माण करून शासन दरबारी आपल्या न्याय हक्कासाठी भांडण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा