You are currently viewing हे जगणे… सुंदर आहे

हे जगणे… सुंदर आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*हे जगणे… सुंदर आहे* 

 

जगणे सुंदर आहे….

सौंदर्याचा अभिषेक हो कोण न त्यास पाहे..

हे जगणे सुंदर आहे..

 

वेलीवरती फुल उमलते खुदूखुदू ते हसते

कधी देवाच्या, कधी कुंतली जाऊन पहा ते बसते

निर्माल्याची खंत न त्याला वारा सुगंधी वाहे…

हे जगणे सुंदर आहे….

 

वाऱ्यावरती लहरत जाती,गाती, ज्वारी बाजऱ्या

हिरवाईने नटलेल्या त्या दिसती सुंदर पऱ्या

पवन खेळतो अंगाशी तो डुलवित त्यांना जाये

हे जगणे सुंदर आहे…

 

चाहूल लागता बाळाची ती स्वर्गच बोटे दोन

बदलून जाई साऱ्यांचा मग बघण्याचा तो कोन

बाळाभोवती दुनिया सारी गरगर फिरत राहे..

हे जगणे सुंदर आहे….

 

होय, नक्कीच जगणे सुंदर आहे. बाळाची चाहूल लागताच प्रत्येक स्त्रीला आपण स्वर्गातच आहोत असे वाटते. ते नऊ महिने

ती जमिनीवर असतेच कुठे? ती तर हवेतच

असते ना? ती “मर्ज” होते. आता ती फक्त आई

होण्यापूर्वीची आई असते. तिचे स्वत:साठी जगणे संपलेले असते. तिचे जग म्हणजे फक्त

पोटातले बाळ… बस्स! तेच तिचे विश्व असते.

बाळ काय सांगतो तेच ती खाते, तसे डोहाळे

तिला लागतात, इच्छा निर्माण होतात. तसे तसे

ती वागते. आणि सदैव बाळाच्याच स्वप्नात

गुंग असते. आणि तो जन्मदेतांनाचा तो असह्य

त्रास ती त्याचे मुखकमल पाहताच पूर्ण विसरून जाते क्षणार्धात!

 

आता तर काय? तिची दुनियाच बदलून जाते.

क्षणभरही नजरेआड करणे तिला शक्य नसते.

कलेकलेने तो वाढतो तसतशी ती बदलत जाते.

त्याची सुखदु:खे, आजारपणे,शैक्षणिक प्रगती

त्याचा चढ उताराचा आलेख यात ती सामावून

जाते. तिची स्वत:ची अशी सुखदु:खे तिला उरतच नाही.कितीही संकटे आली तरी ती ढाल

बनून उभी राहते ते आनंद खेचून आणण्यासाठीच. सुख निर्माण करण्यासाठीच

ती झगडते. झोपडी सारवून सुद्धा सुंदर करते.

त्यासाठी महालाची तिची अपेक्षा नसते. प्रत्येक क्षणी प्रत्येकाचा जीवन सुंदर करण्याचाच प्रयत्न असतो याचा अर्थ जीवन

सुंदर आहेच.

 

सूर्य, चंद्र, तारे, वारे, नद्या,पर्वत, झाडे,नक्षत्रे, शेते, पक्षी, जनावरे किती नावे घ्यावीत. हे सारे घटक जीवन सुंदर करतात. दसऱ्या आधी सिन्नरच्या रस्त्यावर झेंडूची ती लाल पिवळी फुले पाहून माझे मन हरखून गेले नि विक्रीला ठेवलेले ते फुलांनी गच्च भरलेले अख्खे कॅरेटच खरेदी करून मी घरी घेऊन आले. पण त्या रस्त्यावरच्या ठराविक हॅाटेलमधील पाववडा खायलाही मी विसरले नाही. बघा.. फुले घेण्यात आनंद आहे नि पाववडा खाण्यात

त्याहून जास्त आनंद आहे.जीवनाच्या प्रत्येकच

कृतीत आनंद आहे हो. फक्त तुम्हाला तो उपभोगता आला पाहिजे.

 

नाही तर मग भांडा.. हे नाही.. ते नाही..

अहो, मनगट दिले आहे ना? वापरा नि निर्माण

करा ते सुख.. खेचूनच आणा ना? रडायचे

कशाला? स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य खेचून

आणलेच ना? की ते रडत बसले? घरातल्या प्रत्येकच कृतीत आनंद आहे हो! जेव्हा परिस्थिती नव्हती व पैसे ही नव्हते तेव्हा १०/-

रूपये महिना भि सी लावून १००/- रूपयांचा

एक टी पॅाय मी रविवार कारंज्यावरून हमालाच्या मागे मागे ६ किलोमिटर पायी चालत घेऊन आले त्यानंतर महिनाभर मी हवेत

होते जणू कुबेराचे राज्यच घेऊन आले.आज ही

इतर ढिगभर फर्निचर घरात असले तरी तो टी पॅाय मला तेवढाच आनंद देतो व मी त्याला जीवापाड जपते, ती माझी अत्यंत सुखद आठवण आहे, अत्तराच्या कुपी सारखी,नेहमी

माझ्या मनात दरवळणारी.जीवन सुगंधित

करणारी. बघा किती छोट्या छोट्या गोष्टीत

आनंद आहे हो. ९० साली मी लुना चालवायला

शिकले, ९४ ला कायनॅटिक होंडा नि ९७ ला फोर्ड आयकॅान चालवायला शिकले तेव्हाही

तेवढाच आनंद झाला. आता दारात तीन तीन

गाड्या असल्या तरी मी छोटीशी आवडीची

“अल्टो”च चालवते व खुश होते, अर्रे..! या

वयातही मी कार चालवते की…!

 

मंडळी.. यादी फार मोठी आहे हो. अहो, संकटे

कुणाच्या बापाला चुकलीत हो?

मग.. ? चला आनंद शोधायला शिका कारण “ जीवन सुंदर आहे.. त्याला अधिक सुंदर

बनवा”

 

राम राम मंडळी…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा