*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*”नैतिकतेने पळ काढलाय”*
सध्या प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव चालू आहे.
गावा गावात पक्क्या सडका, एस.टी, हव्या तेवढ्या रिक्षा सुमो ऊबेर गाड्या यांची रेलचेल आहे.
नवनविन शोध लागुन टिव्ही पासुन लॅपटाॅपपर्यंत हवं ते काम जगाच्या कोणत्याही टोकाला केलं जातं.कोणत्याही वेळी.
नविन औषधे रसायने खते जंतुनाशके प्रसाधने अगदी सगळा खोटा बाजार चालू आहे.
परवाच आपण चंद्रावर स्वारी यशस्वी केली. आमचा लहानपणचा चांदण्यांबरोबर खेळणारा , मामाचे घर बघणारा तो चांदोबा फक्त दगडगोट्यांसारखाच झाला. त्याच्या मांडीवरचे हरण हरवुन टाकलं.
ऊद्योगधंदे सोयीनुसार वाढले शहरी करण होऊन हिरव्या देखण्या वसुंधरेवर आघात … वारंवार आघात केले गेले.
ह्या सगळ्याच प्रकारच्या प्रगती, विकास यामधे वेगवान स्पर्धेत व्यक्तीला ऊतरावे लागले.
वेग .. प्रगती.. यश. पैसा या चौकटीत तो अडकला.
हे साध्य होण्यासाठी पहिल्यांदा त्याला आपली नैतिकता बळी द्यावी लागली.
लहानपणी घरात झालेले संस्कार विसरावे लागले, निर्लज्जपणा, कोडगेपणा भ्रष्टाचार, लबाडी व्यसने हे आदर्श झाले.
स्त्री शिकली… अर्थार्जन करू लागली आणि स्वातंत्र्य स्त्री पुरूष समानता भोगू लागली.
पण काही झाले. तरी स्त्री ही “आई”च्या भुमिकेतच हवी असते.
यातच संघर्ष सुरू झाला आणि मग हे सगळं म्हणजे स्वैराचार नव्हे .. हे त्या विसरून गेल्या.
शर्ट पॅंट घालुन त्यांनी जरी स्त्रीपुरूष समानता वागवली तरी समाजात पुरषांची स्त्रीकडे बघायच्या वृत्तीत मानसिकेत किंचितही फरक पडला नाही.
परस्त्रीविषयीचे शिवरायांचे धोरण आता अडगळीत पडले.
नैतिकता विकाऊ झाली म्हणुनच पळाली.
समाजात ४०ते ५०वर्षापुर्वी अंगावर सोने घालुन देवळात बाजारात जायची… आमच्यासारख्या तरूण मुली कॉलेज शाळा गाण्याचे क्लास करायच्या ,
लांबवर चालतच जायला लागत असे. पण असे अश्लाघ्य वर्तन कुठेही दिसत नसे.
घरी स्त्रिया एकट्याच असत कधीच काही लुटमार अश्लील गोष्टी ऐकू येत नसत.
मुले एकटीच घरापासुन दुरवर खेळत कोणीही पळवत नसे का अवयवासाठी मारत नसे.
डॉक्टर हा कुटूंबाचाच एक भाग समजला जाई त्यामुळे या आपुलकीतून लूटमार फसवाफसवी होत नसे. बारा बलुतेदार दारी येत त्यांना थोडे पैसे धान्य देऊन माल मिळे.
आम्ही एकट्या गिरणीत दळण आणत असू, देवळात जायचो पण कोणी आमच्याशी बोलत पण नसे.
समाजभान प्रत्येकाला असे. आपण काही वाईट वागलो तर अब्रु जाईल जीची भरपाई परत होणार नाही या भावनेला घाबरून असत. पोलीस, घरची मोठी माणसं समाजमनव नातलग यांचा धाक होता , आणि यालाच “नैतिकता”म्हणतात.
पण व्यक्ती पैशाने नको इतकी श्रीमंत होते…. सहज सुलभपणे यश प्राप्त होतंय. जे हवं ते … मग ते काहीही असो…. विकत घेता येते.. भ्रष्टाचार अनाचार पैशाच्या जोरावर लपवला जातो.
व्यसनांपोटी मन निर्लज्ज झाले.
त्यात स्त्रीयांची यात चुक नसली तरी पूर्वी घरात असणारी स्त्री जागोजागी आणि तिही एकटी दिसु लागली . तिची रहाणी कपडे भावना भडकाऊ लागल्या. यात स्त्रीची चुक नसुनही पुरूषांची मानसिकता बदलली न गेल्याने विकृतपणा ऊलट वाढलाच.
पैशामुळे हे सहज साध्य झाले.
धाक कोणाचाच नाही मग कोडगे पणा वाढला.
प्रसार माध्यमांनी स्वार्था पोटी नको ते नको त्या वयात असा बाजारच मांडला.
या सगळ्याला घाबरून नैतिकता पळुन गेली व स्त्री सुरक्षित होती ती कमालीची असुरक्षित झाली.
मोबाईल टिव्ही यामुळे मुलांवर संस्कार करायला वेळ कमी पडतो.
मुलेही फारशी त्याची किंमत करत नाहीत.
या सगळ्यांमुळे गुन्हे वाढत आहेत.
हवा तसा पैसा मिळवायचा. फक्त चंगळवाद करायचा.
हवे ते शरीराचे मनाचे, जिभेचे चोचले पुरवायचे.
मग्रुरी अहंकार व स्वार्थ यात बाकी सारे विसरायचे.
खोटा आनंद, खोटी प्रतिष्ठाच चांगली वाटली आणि मनं बेरड बनली.
शेवटी स्त्री ही “भोग्य”वस्तू आहे… हवं तेव्हा तो भोग मिळवायचा आणि पुरावा नको म्हणुन तिला मारूनही टाकायची इतक्या टोकाची भूमिका घेतली गेली आहे.
मग आता कायदेही तितकेच टोकाचे व्हायला हवेत.
सांगायचा आदर्श शिवरायांचा पण शिवराय जन्माला घालणारी जिजाऊ मात्र क्रुरपणे मारून टाकायची.
कसे शिवबा जन्म घेणार घराघरात?
शिवबा हवा असेल तर आधी प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यायला हवी आणि ती जगायला हवी.
कठोर कायदे.. पोलीसी धाक.. संस्कार व समाजाप्रती आदर स्त्रीबद्दल आदराची मानसिकता हेच यावरचे ऊपाय आहेत.
अनुराधा जोशी
अंधेरी ६९
9820023605