विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २५ ऑगस्टला हिंदू एकता मेळाव्याचे आयोजन…
मालवण
विश्व हिंदू परिषदेला येत्या गोकुळाष्टमीला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण देशभरात २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत हिंदू एकता मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मालवण येथे २५ ऑगस्ट रोजी कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे सकाळी साडेदहा वाजता हिंदू एकता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे मालवण अध्यक्ष भाऊ सामंत यांनी दिली आहे.
प्राचीन गौरवशाली परंपरा आणि इतिहास असलेल्या भारतावर जवळजवळ बाराशे वर्षे परकीय आक्रमणे होत राहिली व काही शतके परकीयांचे साम्राज्य राहिले. त्याचा परिणाम म्हणून येथील हिंदू समाजामध्ये अनेक प्रकारची कमजोरी उत्पन्न झाली. अशी कमजोरी आधीपासूनच हळूहळू बळावत गेल्यामुळे परकीय राज्य शतकानुशतके टिकून राहिली. परक्यांचे शासन हे आपल्या कमजोरीचे कारण नसून तो आपल्या कमजोरीचा परिणाम होता असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे विश्लेषण होते. अशी सर्व प्रकारची कमजोरी व सामाजिक असंघटित अवस्था दूर करणे हाच शाश्वत व भरीव उपाय आहे असे हेगडेवार यांचे म्हणणे होते. हेगडेवार यांचे मूलभूत चिंतन हेच विश्व हिंदू परिषद या संस्थेच्या स्थापने मागील भूमिकेची पार्श्वभूमी होती याच परिपाकातून निर्माण झालेल्या विश्व हिंदू परिषदेला येत्या गोकुळाष्टमीला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हिंदू एकता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण येथे होणाऱ्या मेळाव्यात कोकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते ‘हिंदू समाज व त्यासमोरील आव्हाने’ या विषयावर आपले ज्वलंत विचार प्रकट करणार आहेत. आताचे एकंदरीत देशातील हिंदूंची परिस्थिती पाहता लव्ह जिहाद, त्याच्यातून हिंदू महिलांची हत्या, लँड जिहाद, वक्फ बोर्ड विधेयकाला होणारा विरोध आणि बांगलादेशातील असंघटित हिंदूंवर हिंदू म्हणून झालेले अत्याचार या घटनांचा विचार करता हिंदू समाजाने संघटित होऊ शक्ती दाखविण्याची गरज आहे. तरी सर्व हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी या हिंदू एकता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले आहे.