You are currently viewing आव्हानं

आव्हानं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*आव्हानं*

 

जन्माला आल्यापासून आयुष्य जगणं सुरू होतं आणि जगणं हेच एक मोठं आव्हान आहे. कुणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि जगताना प्रत्येकाची आव्हानं वेगळी असतात. व्यक्ती ज्या वातावरणात वाढते, जे संस्कार तिच्यावर/त्याच्यावर होतात, ज्या वैचारिकतेत त्याची/तिची मानसिक, सांस्कृतिक जडणघडण होते त्या अनुषंगाने तिच्यापुढे/त्याच्यापुढे विविध प्रकारची आव्हानं उभी राहतात.

 

आव्हान स्वीकारणं ही एक प्रवृत्ती आहे. तसेच “नको बाबा! हा आपला मार्ग नाही, कशाला जावे त्या वाटेने? आहे तेच बरं आहे.” अशी संथ बचावू वृत्ती आव्हानाला सामोरी जात नाही पण परिस्थितीमुळे प्राप्त झालेल्या आव्हानाला सामोरं जावंच लागतं आणि जे जात नाहीत किंवा जे जाऊ शकत नाहीत त्यांचं आयुष्य नैराश्यग्रस्त, भयग्रस्त होऊ शकतं. थोडक्यात आक्रमक वृत्तीची माणसं आव्हानं पेलतात, आव्हानं झेलतात.

 

*प्रयत्ने वाळूचे तेलही गळे* अथवा A *WILL WILL FIND A WAY* असा आव्हान स्वीकारणाऱ्याचा माईंडसेट असतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा कल असतो.

*स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच* या लोकमान्य टिळकांच्या घोषणेत आव्हानात्मक बाणा होता. शून्यातून काही रचनात्मक निर्माण करण्याचे वृत्ती म्हणजे आव्हान स्वीकारणे.

 

विद्यार्थीदशेत एक निश्चित ध्येय गाठण्याचं त्याचं स्वप्न असतं.

संसारी गृहस्थापुढे पारिवारिक आव्हानं असतात.

पालकत्व पेलताना आपल्या पाल्याला देशाचा एक सुजाण आणि जबाबदार नागरिक बनवण्याचं आव्हान असतं.

नोकरीत बढती मिळवण्याचं आव्हान असतं.

व्यवसायात, व्यापार, धंद्यात स्पर्धेत टिकण्याचं आव्हान असतं.

क्रीडा क्षेत्रात क्रीडापटुला अव्वल नामांकन मिळवण्याचं आव्हान असतं. कुणी *माउंट एव्हरेस्ट* चढण्याचं स्वप्न बघतो तर कुणी *नर्मदा परिक्रमा* करण्यासाठी बळ गोळा करत असतो. एखाद्या शल्यविशारदा समोर रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचं आव्हान असतं.

एखाद्या मातेसाठी आपलं दिव्यांग मूल मोठं करण्याचं आव्हान असतं.

 

ध्येय, इच्छा, आणि आव्हान हे हातात हात घालून प्रवास करतात.

आव्हानं स्वीकारण्यात साहस असतं, आत्मबल, जिद्द, चिकाटी असते. अशक्यप्राय, *असाध्य* ते शक्य करून दाखवण्याची धडपड असते. ध्यास असतो.

 

एक राजकैदी बंदीवासात निराश होऊन बसलेला असताना त्याला भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करणारा एक कोळी कीटक दिसतो. भिंतीवर चालताना तो कोळी शंभर वेळा खाली पडतो पण शेवटी एकदाचा चढतोच. वर चढणं हे कोळ्याने स्वीकारलेलं आव्हान होतं आणि त्याचं निरीक्षण करत असणाऱ्या बंदीवान राजाला गेलेलं राज्य परत मिळवण्याचं त्याच क्षणी स्फुरण चढतं आणि तो ते अशक्यप्राय आव्हान स्वीकारतो.

छत्रपती शिवाजीराजांनी *श्रींचे राज्य* स्थापन करण्याचा विडा उचलला आणि देशाला मुघलांच्या तावडीतून सोडवलं. कुठलंही परकीय आक्रमण परतवून लावणं म्हणजे व्यक्तीपुढचं, राष्ट्रापुढचं एक कठीण आव्हान असतं.

 

व्यक्ती, समाज, राष्ट्र, वैश्विकता यांचं विलगीकरण होऊ शकत नाही. वैयक्तिक जीवनात नानाविध आव्हानांना तोंड देत असताना ज्या समाजात आपण वावरतो, ज्या देशाचे आपण रहिवासी आहोत, या विश्वाचा आपण अंश आहोत— त्यांच्याशी आपण बांधील आहोत. जिथे समस्या, जिथे संकट, जिथे प्रतिकुलता तिथे दूरस्थ राहून बघणे म्हणजे मानसिक पलायनवाद आहे. “वादळ आपल्या पायरीवर नाही ना मग कशाला चिंता” पण कधीतरी ते आपल्या उंबरठ्यावर येऊ शकतं म्हणून त्यासाठी जागरूक राहणं, योजना आखणं, आत्मबल गोळा करणं म्हणजेच सामाजिक, राष्ट्रीय, आव्हान पत्करणं.

 

संपूर्ण देशाच्या बदलत्या सांस्कृतिक, राजकीय, भाषिक, जातीय, धार्मिक, नैतिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध स्तरांवरचा आढावा घेताना मनात नक्की काय येतं? जीवन पद्धतीतला बदल अपेक्षित असला तरी सर्वत्र माजलेला चंगळवाद, भोगवाद, भ्रष्टाचार, मतलबी राजकीय गणितं, आरक्षणवाद, सच्च्या नेतृत्वाचा अभाव आणि त्यातून निर्माण होणारी अराजकता आणि अशांती यांचा सामना कुणी आणि कसा करायचा? नुसतं बघतच राहायचं का?

 

मागच्या पिढीने म्हणावं,” आमच्या वेळी नव्हता बाबा इतका अनाचार, इतका खोटेपणा, इतकी चारित्र्यहीनता!” आणि पुढच्या पिढीने मात्र मागचं अव्हेरून गुर्मीत जगायचं, आभासी सुखाच्या पाठीमागे धावायचं, वाटेल ते मार्ग अवलंबायचे, नकळत अज्ञानाच्या काळोख्या दरीत ठेचकाळत विनाशाकडेच वाटचाल करायची का? भय नाही, लाज नाही, चाड नाही, कशाचीच पर्वा नाही, संवाद नाही असं म्हणत जे जे होईल ते ते फक्त पहात राहायचं का? नक्कीच नाही. काहीतरी तोडगा नको का काढायला मग तो कुणी काढायचा? इथे पिढ्यांची अंतरे, परस्परांतील युद्धं मिटलीच पाहिजेत. सावरणं आणि स्वीकारणं या सामंजस्याच्या सुवर्ण मध्यावर सान —थोरांनी काही काळ विसावून, थांबून विचार करायला पाहिजे.

*कोण होतास तू काय झालास तू* या आत्मशोधाची आज गरज आहे आणि हेच एक मोठं आव्हान आज मानवा पुढे आहे. *समाज को बदल डालो* हे आव्हान स्वीकारण्याची ही वेळ आहे.

 

आज मराठी माणूस मायबोलीलाच पारखा झाला आहे. मातृभाषेचा अभिमान बाळगायला विसरला आहे.

*जपू मराठी, रुजू पिढ्यांमध्ये मराठी* ही महाराष्ट्रीय माणसाची मानसिकता असायला हवी. मराठी भाषेचं संवर्धन, मूल्य,भाषेचा अभिजात दर्जा मिळवणं हे आज मराठी माणसापुढे एक फार मोठं आव्हान आहे. भाषेतली भेसळ आणि इंग्रजी मुसळ हा आजचा भाषा टिकविण्याच्या मार्गातला एक अडसर आहे आणि त्याच्याशी सामना झाला पाहिजे.

 

गुळगुळीत विकास खूप झालाय. वैश्विक व्यापकता, वैज्ञानिक प्रगती, डिजिटलायझेशन, या सगळ्यांमुळे जग लहान झालं, जवळ आलं पण मूळ समस्यांचं निवारण खरोखरच झालं आहे का? महागाई, बेकारी, वर्णद्वेष, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबी, पाणीटंचाई, प्रदूषण, वाढती गुन्हेगारी, शैक्षणिक पराङमुखता ही सारी समस्यांची टोकं आजही अधांतरित आहेत. आपल्या विधानसभा,लोकसभा म्हणजे बालवाड्या झाल्या आहेत आणि एक पारडं जड होत असताना दुसरं *पारडं* किती खाली चाललंय या विसंगतीचा सामना हे आजच्या काळातलं खरं आव्हान आहे आणि हे जागतिक आहे. त्याला टक्कर देण्यासाठी दमदार युवा पिढीची आज देशाला गरज आहे. भरकटत चाललेल्या युवा पिढीचं संघटन महत्त्वाचं आहे. आव्हान स्वीकारणं आणि त्या मार्गावरून अचल मनाने चालण्यासाठी एका भक्कम प्रशिक्षणाची गरज आहे. राज्य, देश आणि विश्व याकडे डोळसपणे पाहताना वैश्विक शांती, बंधुता, समता स्थापित करणे हे आजच्या मानवा पुढचं महान आव्हान आहे. त्यासाठी जगात ठिकठिकाणी चाललेली युद्धं मग ती सामरिक असोत, आकाशातली असोत, अथवा भूवरी असोत, शस्त्रांची असोत, जैविक असोत वा न्यूक्लीअर असोत पण शेवटी सारा हिंसाचारच ना? मानवी संहारच ना? माणुसकीचा कडेलोट झालाय. यासाठी सर्व विश्वच एक करणं, *वसुधैव कुटुंबकम* साधणं हेच एक मोठे आव्हान आज मानवापुढे आहे.हे शिवधनुष्य पेलायला हवं.

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा