मोल स्वातंत्र्याचे जाणूया !

*प्रख्यात लेखक प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*मोल स्वातंत्र्याचे जाणूया !*

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर तितक्याच उत्साहाने स्वातंत्र्याच्या शतकाकडे आपली वाटचाल सुरू आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन. नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारताला मिळालेले यश. त्याआधी देशामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार, आपल्या देशात लोकशाही दिवसागणिक प्रगल्भ होत आहे याचीच साक्ष देत आहे.

पण मुळात आपण पारतंत्र्यात का गेलो? हा खूप मोठा प्रश्न आहे. हजारो मैलांवरून आलेल्या मुठभर इंग्रजांना कोट्यावधीची लोकसंख्या असलेला हा देश कसा जिंकता आला? आम्ही आपापसात फुटलेलो-तुटलेलो, विविध जाती-धर्मांमध्ये गुरफटलेले होतो.

त्यानंतर मात्र वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे विचार करणाऱ्या विचारवंतांनी, समाज सुधारणेची चळवळ सुरू केली. लोकहितवादी, राजाराम मोहन राय, बाळकृष्ण जांभेकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांनी आपल्या सामाजिक समस्या लक्षात घेऊन त्यावर काम सुरू केले. पुढे यातूनच 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना व लोकमान्य‌ टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या अनेक महान विभूतींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा उभा राहून भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले.

यानंतर घटना समितीच्या माध्यमातून आपली राज्यघटना तयार झाली. राज्यघटना तयार झाल्यानंतर ती किती उपयुक्त? या प्रश्नावर उत्तर देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्या राज्यघटनेचा वापर करणारी माणसे ज्या प्रकारे तिचा वापर करतील त्यानुसार ती आपले यश-अपयश दाखवेल. याचा अर्थ केंद्रात पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ किंवा राज्यात मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांच्यासाठी केवळ राज्यघटना नाही. तुम्ही आम्ही सर्वसामान्य नागरिक घटनेचा वापर कशाप्रकारे करतो, त्यावर घटनेचे यश-अपयश अवलंबून आहे. आपल्याला जर वाईट सवयी जडलेल्या असतील तर त्यात संविधान काय करणार उदा. सार्वजनिक ठिकाणी पचा-पचा थुंकणे. घरातील कचरा रस्त्यावर टाकने. प्लास्टिकच्या वापराचा अतिरेक करणे. मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून मतदान न करता फिरायला जाणे. ट्रॅफिकचे नियम न पाळणे. अधिकाऱ्यांनी अडवल्यास पैसे समोर करणे. आपले स्वतःचे निवडलेले किंवा नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे न करणे. आपले बरेच कायदे ब्रिटिशकालीन न्याय व्यवस्थे प्रमाणे आजही आहेत. पण ब्रिटिशांच्या कालखंडात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यासाठी ज्या तात्परतेने कारवाई होत होती. तितक्या तात्परतेने आज होताना दिसत नाही. वर्षानुवर्षे कोर्ट केस सुरू राहतात. त्यालाच आपण तारीख पे तारीख असे म्हणतो. स्वतःचे काम स्वतः न करता वेळ मारून नेणे. कामाची टाळाटाळ करणे. विविध ठिकाणी होत असलेल्या भेसळीवर दुर्लक्ष करणे. टॅक्स प्रामाणिकपणे न भरणे. मी, माझे कुटुंब व माझा स्वार्थ या पलीकडे विचार न करणे. जातिवाद, जमातवाद, प्रदेशवाद यांना तिलांजली न देणे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार समजणे. सजग व जागरूक न राहणे. आजच्या युगात वावरतानाही विज्ञानाची कास न धरता, सहिष्णुतेचा स्वीकार न करता, अंधश्रद्धांचा आवडंबर माजविणे. प्रेरणास्थानां मधून योग्य ती प्रेरणा न घेता विविध मार्गांनी प्रेरणास्थानांचे विभाजन करून समाजात दुही निर्माण करणे किंवा त्याचा उपयोग स्वार्थासाठी करणे. आजही आम्ही आमची जात किंवा आमचाच धर्म श्रेष्ठ यापुढे जात नाही. काळाची पावलं ओळखायची नाही असे ठरवून घेतल्याप्रमाणे वागतो. ज्या देशात छत्रपती शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. इतके मोठे प्रेरणास्थान युवकांसमोर असतानाही देशातील युवकांना शून्यातून स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा न होता ते नोकरीच्या मागे धावताना दिसतात. अशा सवयी नागरिकांना असतील तर आकाशातून ब्रह्मदेव खाली आले तरी आपल्या समस्या सुटणार नाहीत.

गेल्याच महिन्यात 26 जुलैला आपण कारगिल युद्धाच्या विजयाचा दिवस साजरा केला. पण कारगिल युद्ध का घडले? आपल्या हद्दीत 3 ते 13 किलोमीटर पर्यंतच्या प्रदेशात पाकिस्तानने बंकर्स बांधेपर्यंत आपल्याला कळू शकले नाही. तेव्हा मला इतिहासातील तो एक प्रसंग आठवतो. इ. स. 1308 च्या सुमारास अल्लाउद्दीन खिलजी ने देवगिरीच्या यादवांवर स्वारी केली होती. आमच्या राजांना शत्रू आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी आला तरी कळले नव्हते. प्राचीन व मध्ययुगा पासूनचा आमचा इतिहास बघितला तर या घटना सातत्याने घडतांना दिसतात. त्यात अजूनही काही बदल झाला आहे असे दिसत नाही. इतिहासापासून आम्ही काहीच बोध घेत नाही, हे दुर्दैव अजून किती काळ चालू ठेवायचं? हा आपल्यासमोर असलेला खूप मोठा प्रश्न आहे. याशिवाय ज्या वर्षी हे कारगिल युद्ध झाले, त्याच वर्षी आपल्या तात्कालीन पंतप्रधानांनी भारतातून पाकिस्तानात बस सेवा सुरू केली होती. पुढील 5-6 महिन्यातच कारगिल युद्ध सुरू झाले. तेही तेथील डोंगराळ भागातील एका मेंढपाळ मुलाला काही अनोळखी माणसे दिसली. त्याने ती बातमी येऊन आपल्या द्रासमधील भारतीय लष्कराच्या छावणीत सांगितली.

मिळालेले स्वातंत्र्य वापरण्यास व ते टिकवण्यास खरच आम्ही सक्षम आहोत का? हा या निमित्ताने पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे. इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल भारताच्या स्वातंत्र्याबद्दल असे जाहीरपणे सांगत, या देशातील लोकांची स्वातंत्र्य स्वीकारण्याची क्षमताच नाही. आपण स्वातंत्र्य दिल्यानंतर थोड्याच दिवसात हा देश पुन्हा तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला जाईल. काही प्रमाणात भ्रष्ट, लफंगे, दारुडे, गुन्हेगार, विविध फौजदारी गुन्ह्यांसाठी जेलमध्ये जाऊन आलेले, जनतेत दहशत पसरवणारे, भ्रष्टाचारी माणसे सत्तासूत्र हातात घेतील व ठिकठिकाणचे वतनदार, जहागीरदार आपली वतने व जहागिरी लोकशाहीच्या नावाखाली सांभाळली जावीत म्हणून त्या भ्रष्ट लोकांना पाठिंबा देतील किंवा पाठीशी घालतील. आज काही वेळेला देशासमोर निर्माण झालेल्या समस्यां संदर्भात, समोर घडणाऱ्या घटना संदर्भात, निवडणुकींच्या निकालांसंदर्भात, सामाजिक व राजकीय घडामोडी संदर्भात, विविध आंदोलने व संप संदर्भात प्रश्न निर्माण होतो की आपण चर्चिलला द्रष्टा वक्ताच बनवले आहे. असे एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून सतत वाटत राहते.

याशिवाय खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, या देशातील सर्व नागरिकांना खरंच स्वातंत्र्याचे मोल समजले आहे का? स्वातंत्र्य मिळाल्याचे मोल कळणे म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत मग ते सशस्त्र क्रांतीकारक असतील किंवा सनदशीर मार्गाने स्वातंत्र्यलढा देणारे त्या सर्वांच्या समर्पण व केलेल्या त्यागाबद्दल आम्ही कृतज्ञ असले पाहिजे, ज्या वीरांनी आपला संसार सोडून देशाच्या संसारासाठी, कल्याणसाठी, विकासासाठी, स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग व बलिदान केले त्यांना विसरता कामा नये. देशासाठी कलंक ठरेल असे कोणतेही वर्तन मी करणार नाही. स्वातंत्र्य ही काही काल्पनिक किंवा चमत्कारिक गोष्ट नाही. आपले कर्तव्य नीट व प्रामाणिकपणे करणे हीच देशभक्ती आहे, देवभक्ती आहे, देशसेवा आहे, देशप्रेम आहे, साधना आहे, चिंतन आहे, मनन आहे. अशा कर्तव्यदक्ष माणसां मधूनच राष्ट्र घडत असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत देशाच्या विकासासाठी जो बदल व्हावा असे तुम्हांला वाटते, तो बदल आधी स्वतःमध्ये करा, तर आणि तरच आपलं राष्ट्र, आपला देश, आपली राज्यघटना म्हणजेच आपलं संविधान, आपली लोकशाही, आपले प्रजासत्ताक चिरायू राहील. त्यातूनच आपण सर्व खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी व आनंदी होऊ.

आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण ती स्वातंत्र्याची पहाट रक्ताळलेली होती. 16 ऑगस्ट 1946 ‘प्रत्यक्ष कृती दिन’ या दिवशी झालेला नरसंहार म्हणजे प्रत्यक्ष लष्कराचा वापर न करता झालेला तो जगातील सर्वात मोठा नरसंहार होता. या धर्मांधतेचा परिणाम म्हणजेच पाकिस्तानचा जन्म. या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आपण हे विसरता कामा नये.

दुर्दैव तर या पुढे आहे की आज 75 वर्षांनंतरही देशात अशा प्रवृत्तीची कमतरता नाही. पुन्हा हे कधी होईल सांगता येत नाही. पण होणारच नाही, असेही सांगता येत नाही. याला अनेक परकीय शक्तींचाही पाठिंबा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा हे काय मोठे संकट उभे आहे? याची जाणीव व जागृती व्हावी. यासाठी सुद्धा आज प्रयत्नांची आवश्यकता आहे.

आपल्याला याची जाणीव आहे का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असंच आहे. आम्हीं आजही मी, माझे घर किंवा माझी जहागिरी यात इतके मग्न आहोत की संकटाच्या वास्तविकतेचे भान नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी जवळ पडघा गावात दहशतवादाचे मोठे केंद्र निर्माण झाले. हे अगदी अलीकडच्या काळात N I A च्या छाप्यात उघड झाले आहे.

केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि राष्ट्रीय सणांना देशभक्तीपर गाणी, भाषणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. ते आतून आले पाहिजे म्हणजे मनापासून आले तर या एक अब्जाच्या पुढे लोकसंख्या असलेल्या देशाकडे कुणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने हा देश घडविण्यासाठी, विकसित करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी, “मी माझा खारीचा वाटा उचलणारच” अशी शपथ घेतली पाहिजे. हा खारीचा वाटा उचलणे म्हणजे काय तर फक्त आपण स्वीकारलेले काम प्रामाणिकपणे करणे.

त्यासोबतच स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत आम्ही आमचे दारिद्र्य दूर करण्यास यशस्वी झालो नाही. आजही जनता शंभर टक्के साक्षर नाही. बेरोजगारी आहे. आपल्या शेजारी असलेला चीन ज्याची अर्थव्यवस्था २१ ट्रिलियन डॉलर असताना आम्हांला तीन ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचायला कष्ट पडत आहेत.

याचा अर्थ असाही नाही की आम्ही स्वातंत्र्य मिळविल्यापासून आजपर्यंत काहीच प्रगती केली नाही. या कालखंडात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले राष्ट्रीयत्व बळकट झाले. तरी देशात आजही काही शक्ती आहेत. ते या भारताला राष्ट्र मानत नाहीत. काहींच्या मते 15 ऑगस्ट 1947 पासून आपले राष्ट्र निर्माण झाले. तर काहींच्या मते ब्रिटिशांच्या साम्राज्यामुळे आपले राष्ट्र तयार झाले. माझ्या मते आपल्या विविधतेतच एकता आहे. अगदी प्राचीन रामायण-महाभारता पासून आज पर्यंत इथे नांदलेली संस्कृती एक होती व तिच्या मुळाशी सहिष्णुता आणि सर्व समावेशकताही होती. म्हणूनच आधुनिक समाज व्यवस्थेचा अंगीकार करतांना आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.

याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण केलेली प्रगती ही अभिमानास्पद अशीच आहे. अर्थात याचा पाया स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जमशेदजी टाटा, जगदीश चंद्र बोस, डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन तर स्वातंत्र्यानंतर अनुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, अवकाश शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. जयंत नारळीकर, इस्रोचे अध्यक्ष डॉ. सतीश धवन, हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन, धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन, डॉ. हरगोविंद खुराना, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या वैज्ञानिकांनी प्रगतीची नवी नवी शिखरे देशाला पदक्रांत करून दिली. आधी मंगळयान व आता सूर्ययान कडे वाटचाल सुरूच आहे. याशिवाय आज बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्येही आपण प्रगती केली आहे. ती भारतीय शास्त्रज्ञांच्या व त्यांनी शोधलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावरच. याशिवाय आपण कोविड कालखंडात केलेल्या कामगिरीचे जगाने कौतुक केले.

आपण आत्मनिर्भर होऊ शकतो याची जाण आपल्याला आहेच. आज भारतातील 66% जनता वय वर्ष 35 च्या खाली आहे. हा लोकसंख्येचा लाभांश आहे. या लोकसंख्येला रोजगार मिळाला तर, सर्वांगीण आर्थिक प्रगती होऊ शकेल. असे मत जागतिक अनेक विचारवंतांचे, उद्योजकांचे व गुंतवणूकदारांचे आहे.

आज आपल्या शेजारी असलेला देश चीन हे एक प्रगत राष्ट्र आहे. पण त्यांचे एक अपत्याचे धोरण त्यांच्या अंगाशी येत आहे. आज चीनमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे व त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या ही वर्षागणिक वाढत चाललेली आहे. ही फार भयंकर गोष्ट आहे.

आपण आत्मनिर्भरतेच्या वाटेवर आहोत. हा प्रवास करताना त्यात अनेक धोके आहेत त्यातील सर्वात मोठा धोका पर्यावरणाचा तो दिवसागणिक वाढत जाणार आहे. कारण कार्बनचे प्रमाण वाढत आहे आणि वाढणारे कार्बनचे प्रमाण या पृथ्वीला विनाशाकडे घेऊन जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास औद्योगिक क्रांती पासून आजतागायत सतत होत आहे आणि आज तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त झालेला आहे. वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे हिमालयासहित दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते याची सुरुवात झाली आहे व भविष्यात ही प्रक्रिया वेगाने घडणार आहे. पर्यायाने पाण्याची पातळी वाढेल. साधारणता शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सध्या असलेल्या भूभागाचा 40% भूभाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. हे चित्र आता दिसायला लागले आहे. यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्या बर्फ वितळल्याने नंतर कोरड्या पडतील. यातून वाळवंट निर्माण होईल. या वाळवंटाने स्थिती अत्याधिक भयान आणि भकास होईल. तेव्हा आपण फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी कमविलेल्या संपत्तीचा आपल्या पुढच्या पिढ्यांना नक्की किती उपयोग होईल? याचा विचार कधीतरी करणार की नाही? जेव्हा पाण्यासाठी जग संघर्षाच्या खाईत जाणार तेव्हा आज तुम्ही आम्ही ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत त्याचे काय होणार? यावरही विचार नको का करायला? भारताने तोही केला आहे.

याचाच विचार करत आपण पॅरिस पर्यावरण परिषदेत पर्यावरण संतुलन राखण्यासंदर्भात जगासमोर एक योजना ठेवली. त्यानुसार जगाने अवलंब केल्यास या शतका अखेरपर्यंत 2 अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान वाढणार नाही. असे होणे सर्वांच्याच हिताचे आहे.

याशिवाय दुसरी मोठी समस्या म्हणजे भविष्यात भारताला अनेक आघाड्यांवर लढावे लागू शकते दहशतवाद, आतंकवाद, नक्षलवाद यांना बाह्यशक्तींचे असलेले पाठबळ. याशिवाय जमातवाद व प्रदेशवादाचे दिवसागणिक वाढत जाणारे प्रश्न. पाकिस्तान व चीन या प्रश्ना सोबतच भारतीय उपखंडातील अस्थिरता अशांतता या आपल्यासमोर खऱ्या समस्या आहेत. आपण जागृत राहून यावर मात करत प्रगती घडवून आणली पाहिजे.

आपण काय करू शकतो? तर कमी प्रदूषण करणारी जीवनशैली स्वीकारणे. प्लास्टिकचा वापर नियंत्रित करणे. साधी राहणी व उच्च विचारसरणीसोबतच वृक्षारोपण, नियमित योग साधना केली तर अनेक समस्या नियंत्रणात ठेवू शकतो.

शालेय जीवनात वर्गात किंवा खेळांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी जी निकोप स्पर्धा असते अगदी तशीच स्पर्धा सर्व विभागामध्ये, राज्या राज्यात, जिल्ह्या जिल्ह्यात, तालुका तालुक्यात, खेड्या खेड्यांमध्ये प्रगती संदर्भात, विकासासंदर्भात, स्वच्छते संदर्भात, वन्यजीवन, वृक्षारोपण व जंगल संवर्धना संदर्भात सुरू करता येईल. यामुळे माझी मुलं, माझे नागरिक, माझे खेडे, माझे गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझे राज्य हे सर्व संपन्न होण्यास मदत होईल. त्यामुळे देश विकसित होईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगाराचा प्रश्न मिटेल. अशी निकोप स्पर्धा विकासासाठी पूरक ठरेल. प्रत्येकाच्या उपक्रमांना प्रसिद्धी देणे. यातून चांगल्या गोष्टी पुढे येतील. उत्तम कामगिरी करणाऱ्यांना उत्तम पारितोषिकेही देता येतील. पण या स्पर्धा निकोप ठराव्यात. एकमेकांविषयी सहकार्य आपुलकी व प्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून गरज वाटल्यास एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करावी लागेल.

शेवटी ‘ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या सर्व ठिकाणी आपल्या उत्तमतेचा व प्रतिभेचा ठसा उमटवणारे काम करणे’ अशी या 15 ऑगस्ट ला या राष्ट्रध्वजाला सलाम करताना आपण सर्वांनी शपथ घेऊ या.

 

धन्यवाद.

प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे के.रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली

prashantshirude1674@gmail.com

9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा