*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सण राखीचा..*
अष्टाक्षरी रचना..
चिंब श्रावण सरित
झुला खेळली गौराई
सण येता तो राखीचा
माहेराला येई बाई
धागा रेशीम बंधाचा
भाऊ बहीण प्रीतीचा
ओढ माहेराची लागे
सण येता गं राखीचा
चंद्र दुधाळ हसरा
राखी सणाला दारात
बंधू प्रेमाचा सुगंध
दरवळे तबकात
ओवाळता भाऊराया
मना केवढा हुरूप
चंद्र सूर्यासम तेज
मज भासे कृष्णरूप
नाते अपुले रक्ताचे
त्याला प्रेमाचं कोंदण
प्राण बहिणीचा त्यात
करी भावाचे औक्षण
राखी बांधता खुलतो
किती वाटे अपूर्वाई
इडा पिडा टळो याची
सुखी ठेव अंबाबाई
धागा रेशीम बंधाचा
सदा रक्षितो जीवनी
दिल्या वचना जागतो
हीच खरी ओवाळणी…
रचयिती ✍️🌹
सौ.पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे 90 11 65 97 47.