कुडाळ (प्रतिनिधी) :
कुडाळ तालुक्यातील जांभवडे पंचक्रोशी येथील न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे, पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ,मुंबई (रजि.) आणि कुपवडे, जांभवडे, भरणी,घोटगे व सोनवडे या ग्राम पंचायतींच्या संयुक्त विद्यमाने, भारत सरकारच्या वन निती व पर्यावरण संतुलन धोरणाच्या अधीन राहून महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने, ७८ वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदनाबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पंचक्रोशीत ग्रामपंचायतच्या सहकार्याने प्रत्येक घरी वृक्षारोपण करून हा गौरवशाली राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पंचक्रोशीतील पाचही गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यालयीन कर्मचारी यांनी सामाजिक वनीकरण विभागा कडून रोपे मिळविण्यासाठी दाखविलेली तत्परता तसेच रोपांच्या वाटपाच्या नियोजना पर्यंत पार पाडलेली भुमिका महत्वपूर्ण ठरली. सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली. सर्वांची कार्यक्षमता आणि सहकार्य यामुळे वृक्षारोपण सोहळा प्रभावीपणे संपन्न झाला.
यावेळी पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक, संस्थेचे चेअरमन, हायस्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उत्साही योगदानामुळेच हा कार्यक्रम एक उत्सव रूपी यशस्वी झाला .
सद्या संपूर्ण विश्व हे वैश्विक तापमान वाढीच्या संकटात सापडले असताना विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजून घेतले. प्रत्येकाने झाडे लावणे व ती जगविणे ही काळाची गरज आहे अशी संकल्पना मनामनात रुजविली. त्यांनी केलेले वृक्ष दिंडीचे नियोजन कार्यक्रमाचे एक खास आकर्षण ठरले.
डॅा.श्री. दिपक बांदेकर आणि श्री. भास्कर काजरेकर यांनी वृक्षारोपण महोत्सवासाठी मुबलक अशी रोपे उपलब्ध करुन दिली. श्री. अरुण सावंत यांनी त्या रोपांची पहाणी, ने आण व नियोजन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी सर्व गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे सहकार्य लाभले.
तसेच दहावी बॅच २००३ च्या माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण महोत्सवा साठी आर्थिक सहयोग दिला. विद्यार्थी संघाचे संघटक श्री.संतोष परब यांनी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी कंपास बॉक्स चे वाटपही केले.
अत्यंत यशस्वी रित्या पार पडलेल्या सदर वृक्षरोपण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाचे समस्त पदाधिकारी सर्व ग्राम पंचायत प्रशासन, न्यू शिवाजी हायस्कूल व ज्यू.कॉलेज चे सन्माननीय चेअरमन, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व प्राथमिक शाळा शिक्षक, आंगणवाड्या कर्मचारी, आरोग्य सेवक व ग्रामस्थांच्या सर्व स्तरांवरून व खासकरून सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विभाग, सिंधुदुर्ग तसेच सामाजिक वनीकरण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या कडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
भविष्यात पंचक्रोशीच्या प्रगतीच्या सर्व आघाड्यांवर परस्पर विश्वास, सहयोग, सामंजस्य व सुसंवाद व बंधू भाव जोपासून जांभवडे पंचक्रोशीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा सर्वांनी निर्धार केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण सोहळ्याची भूमिका आणि प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. किरण सावंत यांनी केले. शेवटी आभार सचिव श्री. विजय पतियाने यांनी मानले.