*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*वंदे मातरम्*
मी देशाला बांधिल आहे का? हा प्रश्न अंतर्मुख करणाराच आहे. जेव्हां मी माझं स्वतःचं जगणं तपासून पाहते तेव्हां या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच मला प्रश्न विचारते की देशासाठी मी नक्की काय करते? काय करू शकते आणि आतापर्यंत काय केलं?
सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन आपण देशाचे रक्षण तर करू शकत नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जगताना निदान एक चांगली नागरिक म्हणून तरी जगले का? नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या मी काटेकोरपणे पाळल्या का? अशा विविध प्रश्नांचं एक काहीसं अस्पष्ट पण सकारात्मक उत्तर मला नक्कीच मिळतं की आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सलोख्याचे वातावरण निदान आपल्यामुळे बिघडणार नाही याची मी काळजी घेतली. घेत असते.
देशाने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकते/ शकतो हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो आणि मग एका प्रातिनिधीक स्वरूपामध्ये *देश माझा मी देशाचा* या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाची देशाप्रतीची बांधिलकी काय असायला हवी आणि कशी याचं एक व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.
सर्वात प्रथम म्हणजे हा देश माझा आहे, मी या देशात जन्मलो आहे आणि या देशाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी विश्वाच्या नकाशावर एक परिपूर्ण, स्वावलंबी, लोकशाहीची खरी तत्त्वं बाळगणारा समृद्ध देश, म्हणून स्थान मिळावे ही भावना रुजली पाहिजे.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. का? याची अनेक कारणे आहेत. अगदी वैज्ञानिक, तांत्रिक, डिजिटल क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती जरी केली असली तरी देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निवारण किती परसेंट झालं आहे हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. भूकबळी, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमजुती, जातीयवाद, धर्मभेद, स्त्रियांचा अनादर, त्यांची असुरक्षितता, त्यातूनच होणारे बलात्कारासारखे गुन्हे, हुंडाबळी, केवळ मतांचे, सत्तेसाठीचे राजकारण, बेकारी, महागाई,कायदेपालनाच्या बाबतीतली उदासीनता, अशा अनेक भयानक भुजंग विळख्यात आजही आपला देश आवळलेला आहे. उंच आकाशातली एखादी भरारी आपण नवलाईने पाहतो त्याचवेळी आपल्या जमिनीवरच्या पायांना चावे घेणार्या विंचवांचे काय करायचे? हा विचार मनात नको का यायला?
ज्यावेळी आपण आपल्या देशाच्या बांधिलकीबद्दल भाष्य करतो तेव्हा जमिनीवरच्या समस्यांचे निराकरण प्रथम झाले पाहिजे असे मला वाटते. इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. शासनाचे नियम ते पाळतात. नियम मोडणाऱ्याला— मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा ही होतेच. स्थानिक प्रशासनाने नियमांची जी चौकट घातली आहे, ते बंधन न मानता कर्तव्य मानून त्याचे पालन केले जाते. आपल्याकडे मात्र *येथे शांतता राखा* असे लिहिले असेल तेथे हमखास कलकलाट असतो. *येथे थुंकू नका*—नेमके तिथेच पिचकार्यांची विचकट रांगोळी दिसते. *नो पार्किंग* पाटीच्या ठिकाणीच वेड्यावाकड्या गाड्या लावलेल्या दिसतात. *कृपया रांगेची शिस्त पाळा* या ठिकाणीच माणसांची झुंबड उडालेली दिसते. *स्वच्छता राखा* तिथेच कचऱ्यांचा डोंगर असतो. यातून एकच मानसिकता झिरपते की नियम हे मोडण्यासाठीच असतात जणूं . तेव्हा भारतीय घटनेने दिलेले अधिकार, स्वातंत्र्य आणि सुजाण नागरिक म्हणून जगतानाची कर्तव्ये या सगळ्यांचे संतुलन, एक जबाबदार नागरिक म्हणून ठेवणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.
राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. गरज फक्त कडक कायद्यांची नव्हे तर गरज सदसद्विवेक बुद्धीची आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिक म्हणून जगताना आपणही पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे.
पर्यावरणाचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी करणे, अन्नाची नासाडी न करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी बळीराजा, त्यांच्या समस्या जाणून, तळागाळातील लोकांशी संवाद साधून, एकसंध समाजाची वज्रमूठ— साखळी बांधणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हीच देशभक्ती आहे. देशा प्रतीची आपली बांधिलकी आहे.
निसर्गाचं वावर कसं मुक्त मोकळं असतं! त्यात पेरलेलं, उगवलेलं यावर जसा किडे, मुंग्या, कीटक, पक्षी यांचाही अधिकार असतो तसंच आपण कमावलेलं फक्त आपलंच नसतं. त्यातलं काही समाजाचं देणं म्हणून बाजूला ठेवावं लागतं, ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे. मी, माझे कुटुंब, माझा समाज आणि माझा देश या स्तरांवर आपलं शांततापूर्ण जीवन अवलंबून असतं.
रस्त्यांवरचे अपघात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भूकंप, वादळे, अवकाळी पाऊस, पिकांची नासाडी, शेतकऱ्यांची आत्महत्या, दहशतवाद, राजकीय आयाराम गयारामांच्या बातम्या आपण मीडियावर ऐकतो, पाहतो. आणि हळूहळू अलिप्त होतो कारण आपली वैयक्तिक गुंतवणूक त्यात नसते. कधी रंजकता, कधी बेचैनी अस्वस्थता जाणवते पण ते अल्पकालीन असते. सजगपणा, डोळसपणा आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता असणे म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी ठरते. कोणीतरी करेल पेक्षा *मी का नाही?* ही मानसिकता तयार झाली पाहिजे. मी माझ्या देश बांधवांसाठी, उपेक्षित, वंचित घटकांसाठी काय करू शकतो /शकते हे माणुसकीचं भान जपणं म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी जपणे आहे.
देशासाठी जगतानाच्या अनेक व्याख्या आता बदलत चालल्या आहेत. पूर्वी शाळेत तास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना होत असे. शाळा सुटताना *वंदे मातरम* म्हटले जायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर याची शिकवण असायची. या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात असं जरी नसलं तरी त्यातली भावनिक, राष्ट्रीय गुंतवणूक जाणवत नाही. १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन असण्यापेक्षा सुट्टी साजरी करण्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस ठरत आहेत याचं वाईट वाटतं. देशाचा इतिहास समजून घेणे, हुतात्म्यांचे बलिदान स्मरणं आणि त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शपथ पूर्वक आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचं धोरण मनाशी आखणं ही देशाशी आपली बांधिलकी आहे.
या देशात आपण राहतो तिथे फक्त स्वतःपुरता विचार करून जगण्यापेक्षा मी केलेलं कोणतही काम या देशाचं अखंडत्व भंग करणारं नसेल याचं भान जपणं म्हणजेच देशाशी बांधील राहणं ठरेल.
एक आठ नऊ वर्षाची भारतीय मुलगी दहा-बारा राष्ट्राच्या पंतप्रधानांना आमच्या पिढीसाठी *पाणी आणि प्राणवायू* ठेवा अशा मजकुराची पत्र पाठवते तेव्हा जाणवतं उगवत्या पिढीवर सामाजिक संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीने पेलणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.
मला हा लेख का लिहावासा वाटला?” याचे उत्तर हे असू शकतं की देशाशी बांधिल राहताना मी देशासाठी काय करू शकते याची पुनश्च उजळणी व्हावी म्हणूनच …
।वंदे मातरम् ।
राधिका भांडारकर पुणे