*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*आनंद..*
किती छान विषय आहे, आनंद..
“आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे”
नुसत्या ओळी ऐकल्यातरी मन कसे आनंदाने
भरून येते. कुठे कुठे भेटतो हो हा आनंद आपल्याला..? डोळसपणे पाहिला तर घडोघडी भेटतो.इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत
तो आहे की विचारू नका.मी सकाळी उठताच
खिडकीतून बाहेर माझे लक्ष जाते. बघते तर काय? माझ्या दारातील आंब्याची पाने एखाद्या
लहान मुलाने पटापटा अंगावर पाणी घेऊन निथळावे तशी ही पाने पावसाच्या सरी मनसोक्त अंगावर घेत मस्त निथळत असतात नि वरून वरूणराज त्यांना झोके देत गदागदा
हलवत असतात. पाने मस्त वाऱ्यावर झोके घेत
हसत हसत पाण्याच्या गळणाऱ्या थेंबांकडे पहात पुन्हा वरून येणारे तुषार झेलत नाचत
सचैल आंघोळ करत मी बघताच मला सांगतात, बघ ना ग किती हिरवेगार स्वच्छ
दिसतोय बघ आम्ही. एरव्ही धुळीने माखतो म्हणून तू हात लावत नाहीस ना! आता बघ कसे सुंदर दिसतोय आम्ही. मी प्रसन्न नजरेने
पहात मनानेच त्यांना खुणावत( टेलिपथी हो)
त्यांना म्हणते, खरच रे बाबांनो, किती सुंदर दिसताय तुम्ही आंघोळ करतांना, एखाद्या खट्याळ मुलासारखे. तेवढ्यात तो बुलबुल,
मी पानांशी बोलतेय पाहून लगेच मध्ये तोंड
घालून गोड शिटी वाजवत माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. बघ ना ग.. मी पण
आंघोळ केलीय् बघ. किती छान दिसतोय ना मी पण, असे म्हणत शिट्या वाजवतो तोवर
शिंपीदादा आलेच बारीक आवाजात गोड साद
घालत. अग, आम्ही साऱ्यांनीच छान आंघोळ
केलीय् बघ. म्हणत ते फांदीवर उड्या मारू लागतात. नि मी क्षणभर हरवूनच जाते त्यांच्या
जगात. किती मस्त मजेत असतात ना ही सगळी मंडळी नि माझी सकाळ ही प्रसन्न व
आनंदी करतात.
तेवढ्यात किरणांना हेवा वाटून ते खिडकीतून
चक्क मला स्पर्शच करतात नि म्हणतात, बघ
ना, आम्हीपण आलोय ग सोनेरी झगा घालून तुला भेटायला. तुझ्या अंगाला हा सोनेरी स्पर्श
कसा वाटतो सांग ना जरा.अशी मी नुकतीच
उठलेली असतांना खिडकीतून बाहेर पहाताच
अशा आनंदाच्या अनुभूतीने माझे मन काठोकाठ भरून जात दिवसाची सुरूवातच मुळी आनंदाने होते. व मी चक्क गुणगुणू लागते, तेवढ्यात रेडिओ साद घालतो..
“ कुहू कुहू बोले कोयलीया..
कुंज- कुंज मे भंवरे डोले
गुन-गुन बोले…ऽऽऽऽऽऽ
कुहू कुहू बोले कोयलीया…”
वाह वा.. रेडिओ सारख्या निर्जिव वस्तूनेही पहा कशी ऐनवेळी गाणे ऐकवून माझ्या आनंदात आणखी आनंदाचे घडे ओतले नि माझी सकाळ जणू आनंदाने डोलू लागली. मंडळी,
तुम्ही म्हणाल तर, आनंद प्रत्येक पाऊलावर आहे हो. फक्त तो तुम्हाला शोधता आला पाहिजे. पण आपलं कसं आहे ना..” काखेत
कळसा नि गावाला वळसा”. असा हा आनंद
आपल्या आसपास रेंगाळत असतांना आपण
त्याला शोधायला निघतो. पण त्याला शोधण्याची गरजच नाही इतका तो तुमच्या आंत भरलेला आहे. माझी नात सव्वासातला
शाळेत जातांना तिच्या ममाला म्हणत असते,
“ बाऽऽऽऽय ममा” तेव्हा माझ्या मिटल्या डोळ्यांसमोर मी तिला पाहते नि माझ्या चेहऱ्या वर तिला न बघताच हसू पसरते व माझी सकाळ
आणखी लाखमोलाची होते. बघा, न बघताच ती मला दिसते व मी प्रसन्न हसते. हा आनंद कुठे बाहेर असतो काय विकायला ठेवलेला?
त्यातला पावशेर घ्यायचा नि घरी घेऊन यायचा? आपले घर आनंदाने तुडुंब भरले आहे
हो, फक्त तुम्हाला तो सापडला पाहिजे. आणि
असा आनंद वेचायला लागते ते रसिक मन बस्स. ते तुमच्या जवळ असेल तर आनंदही मग
तुमच्यापासून लांब कुठेही जात नाही.
क्षणाक्षणाला घरात बाहेर आनंद नि फक्त
आनंद असतो. मुखमार्जन होत नाही तेवढ्यात
खालून वर चहाचा वाफाळलेला कप हातात
येतो नि मग तो तसा वाफाळलेला चहा बाहेर
पाऊस पडत असतांना पिण्यात काय मज्जा
आहे हे तुम्हा चहाबाजांना चांगलेच माहित आहे. झोपाळ्यावर झुलत तो चहा पितांना स्वर्गीय की काय कसला म्हणत्तात त्या आनंदाची अनुभूती मला येते नि चहा संपला
तरी त्या कपाकडे मी पुन्हा पुन्हा बघत राहते.
अरे! संपला कसा एवढ्यात चहा?
माझी नात लहान असतांना मीच वरच्या मजल्यावर तिला आंघोळ घालून तिची थोडी
तयारी करून मी तिला खाली शाळेत जायला पाठवत
असे. तिची नि माझी आंघोळीच्या वेळी चाललेली गडबड, डोळे मिटून चेहरा धुणे, पाणी अर्धी बादली उरले की ती त्या बादलीत
बसत असे. मी वरून मगने पाणी टाकायचे नि
तिने पाणी खेळायचे. उठायलाच तयार नसे
पठ्ठी! मग लाडीगोडी लावून तिचे मोजे. कपडे
करतांनाच केस विंचरायचे नि मग पपी घेऊन
तिने खाली ममाकडे पळायचे. किती किती किलो आनंद असेल हो हा. गणतीच नाही हो.
आनंदाची फार किरकोळ पण मनमोहविणारी
उदा. मी तुम्हाला दिली. अणखी मोठे क्षण म्हणजे त्यांचा अभ्यास. प्रगती, त्यांना मिळणारे
गुण असे कितीतरी. तिच्याशी मी तासंतास
सापशिडी कॅरम सारखे खेळ खेळत असे. तेव्हा
तिच्या इतकाच मला जिंकण्या- हारण्यात मजा व आनंद मिळत असे. तिच्या दृष्टीने मी लहानच असे. मी मला विसरलेली असे. किती
निकट आहे आनंद अपल्या घरातच. का शोधतो आपण त्याला बाहेर? मुलांचे जेवण,
त्यांना भरवणे, पदराने त्यांचे तोंड पुसणे…
अबबबबबबबब.. केवढी मोठी यादी होईल हो
केली तर. अजून तर फार प्रसंग मी तुम्हाला सांगितलेही नाही तरी तुम्ही इतके खुश झलात
ना? मंडळी, तुमच्याजवळही भली मोठी यादी
आहे. चला.. लागा मग कामाला…
हो… आनंद शोधायच्या हो …
बाय बाय …
जयहिंद.. जय महाराष्ट्र…
आपलीच,
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)