*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*माझे गाव कापडणे (झडीचे दिवस)*
मला आठवते कापडण्याची पावसाची झडी.
या झडी विषयीच कापडण्याचे आमच्या घरा
जवळच राहणारे अनंतराव पाटील यांनी लिहिलेला”झडीचे दिवस नावाचा “पाठ” शालेय पाठ्यपुस्तकात होता.पाठ्यपुस्तकात पाठ असणारे अनंतराव व्यंकटराव पाटील हे
कापडण्यातील पहिले लेखक. त्यांचे आम्हाला
फार कौतुक. आमच्या गावाच्या लेखकाचा धडा पाठ्यपुस्तकात आहे याचा आम्हाला फार
अभिमान. अनंतराव, भीमराव व भानुदास असे हे तीन भाऊ. भीमराव शेतीत रमला.व भानुदास
प्रोफेसर झाला. भानुदास व मी सातवी ते दहावी कापडण्यात शिकलो. तो पुढे जळगांवला व मी धुळ्याला शिकले. गंमत
म्हणजे अनंतरावांपाठोपाठ मी पण पाठ्यपुस्तकातील लेखिका(कवयित्री ) झाले.
माझ्या दोन कविता शालेय पाठ्यपुस्तकात
आहेत.इ. ६ वी साठी.”सुलभ भारती व वसुंधरा”
नावाच्या पुस्तकात आहेत.मी कधी कल्पनाही केली
नव्हती याची. किती छान योगायोग आहे पहा.
अनंतरावांची आई कमखेडे म्हणजे माझ्या सासरची. ह्या ताईंवरून व झडीवरून मला हे
सारे आठवले. आमच्या घराजवळच थोड्या अंतरावरच अनंतरावांचे घर आहे. मी त्यावेळी
बरीच लहान असल्यामुळे अनंतराव मला फारसे आठवत नाहीत.पण लहानपणी ते नोकरीत बाहेरगावी असले तरी त्यांच्या घरी माझे काही कामानिमित्त बरेच येणे जाणे असे.
आई मला पाठवायची.
एकदा भर पावसाळ्याचे दिवस होते. सारखी
आठ-दहा दिवस झडी लागलेली होती. इतकी
की शेते ढाराढूर होती. पाण्याने गच्च. पाय ठेवला तर गुडघ्याइतका पाय काळ्या मातीत
जाई.जून मध्ये पेरणी झालेली असे. निसर्ग तेव्हा असा इतका लहरी नव्हता. मृगात पेरणी
होत असे. पांभरी बाहेर पडून बी बियाणे घेऊन
पुजाबिजा करून आनंदाने, कधी कधी वाजत
गाजत पेरणी होई.लोक आळीपाळीने पेरणीला व पावसाळ्याच्या सुरूवातीला
धाब्यावर खारी टाकायला एकमेकांना मदत करत असत. बैलजोडी नाही त्याची पेरणी करून देत असत. पाऊस सुरू असतांना मध्ये थोडी उघडीप मिळताच अधून मधून निंदणी कोळपणी अशी शेतकऱ्यांची कामे चालत. पाऊस असतांना शेतात कामच नसते. पिके
डोलतात, वाऱ्यावर फडफडतात, झगडतात,
पाऊस अधून मधून पडतंच असतो. फक्त फेरफटका मारून घरात बसायचे. सालदारालाही काम नसते.
मला जे दृश्य आजही डोळ्यांसमोर दिसते ते
सांगण्यासाठी हे घडाभर तेल मी ओतले. तर अशा
या झडीच्या दिवसात राहून राहून सारखे पावसाचे शेरे येतात. आकाश ढगाळ, कुंद वातावरण, व सारे शेतकरी घरात बसलेले.
एकदा आईने काही कामासाठी अनंतरावांच्या घरी मला पाठवले तर मी काय
दृश्य पाहिले ते मी कधीच विसरले नाही. मी सातआठ वर्षांची अशी त्यांच्या घरात पायऱ्या
चढून गेले तर.. (त्यांची घरे लांबलचक आहेत.)
एका भल्यामोठ्या लोखंडी पाटीत धगधगत्या
गोवऱ्या पेटलेल्या, लालबुंद निखारे व त्याच्या
भोवती पाच ते सहा जण अंगावर पांढरेशुभ्र जोट डोक्यावरून पांघरून गुंडाळून त्या पाटी भोवती माजघरात गोलाकार बसलेले. आताही मी बघते आहे. तुम्ही दृश्य डोळ्यांसमोर आणा. अंगाला डोक्यावरून घट्ट जोट पांघरलेली ती मंडळी गोलाकार बसलेली व मध्ये पाटीत धगधगते
निखारे. वाटली ना भुताटकी. मला तेव्हाही वाटली नाही कारण मी लहान होते. नंतरही
वाटली नाही कारण मी मोठी होते. पण आता मात्र ते दृश्य समोर येऊन गंमत वाटते.
अहो, झडीच्या त्या दिवसात एवढा पाऊस होता की थंडीने हुडहुडीच भरत होती. आणि
तेव्हा काही असे स्वेटर्स नि ब्लॅंकेट्स होते का?
खेड्यातले लोक बिचारे.. पांढरेशुभ्र जाड जोट
डोक्यावरून पांघरून पाटी भोवती बसत असत. थंडी घालवण्यासाठी पर्याय हाच.मस्त गुळाचा गरमागरम चहा ढोसायचा व गप्पा करत बसायचे.. करणार काय शेतात जाऊन? बांधावर सुद्धा पाय फसतात. गल्लीत कुठे
दुकानात जायचे असेल तर मोठ्या गोणपाटाचे दोन कोन आत ढकलून इरल्या सारखं घोंगडं
करायचं नि ते डोक्यावर घेत पाऊस चुकवत
फिरायचं. गल्लीत इतका चिखल की विचारूच
नका. चप्पलबिप्पल नाही बरं, चिखलात पाय
फसवत फिरायचं नि जिथे खड्यात पाणी साचलं असेल तिथे पाय धुवायचे, नाही तर,
वरच्या पन्हाळाचे पाणी अंगणात एका मोठ्या
टिपाडात साठवलेले असे, ते धुसर गढूळ पाणी
अंगणात पाय धुवायला, कपडे धुवायला वापरायचे. नदीला गढूळ पाणी, पूर, कुठे धुणार
कपडे? मग भांड्यांना धुण्याला हेच पाणी वापरायचे.मोठे चिडचिडे चिखलमय दिवस असत ते. पन्हाळ ओसांडतो आहे, धो धो धो व
त्या खाली पोट्टे उघड्या अंगाने नाचत आहेत,
अंगावर पन्हाळ घेत मजा करत नाचतांना व आयांचे ओरडणे ऐकतांना फार मजा यायची.
“मर जायजो.. बस ना रे.. आजारी पडशी ना रांडम्या.. गंज झाये आते, चाल ना घरम्हा” अशा लाडीक शिव्या देत खोटे खोटे रागवत
आया मग पोरांना पन्हाळा खालून ओढून काढत व घरात जाऊन अंग केस कोरडे करत.
घरोघर अंगणात हाच तमाशा असे.
संध्याकाळी झडीमुळे घरोघर ओली लाकडे असत ती पेटता पेटेनात. जिकडे तिकडे धूरच
धूर बाहेर पडतांना दिसे. सान्यातून धुराचे लोट
दिसत व फू फू करत डोळे लाल होत कशाबशा
चुली पेटून तव्यावर एकवटीवर मातीच्या पाळ्यात थपाथपा भाकरी थापल्या जाऊन गरमागरम भाकरीचा
पोपडा काढून वर तिळाचे तिखट व लोणच्याचा खार व शेंगदाण्याचे धुवट तेल टाकून पोरे ती गरमागरम भाकरी ताटलीत घेऊन ओट्यावर येऊन बसत मोठ्या मजेत खात तृप्त होत असत.संध्याकाळी जास्त करून पाट्यावर वाटलेलं लाल मिरची व लसूण घालून वाटलेलं वल्लं तिखं व भाकरी
असाच मेनू असे.” काकू, काय रांध व माय?”
“कायनी माय वल्लं तिखं वाटी लिधं जरासं”
असे डायलॅाग ऐकायला मिळत असत.मला आताही सारे दृश्य डोळ्यांसमोर दिसते आहे.
माझ्या वडीलांना मात्र साग्रसंगीत स्वयंपाक लागे.धुळ्याहून रोज आणलेल्या ताज्या भाज्या,एक पालेभाजी दोन फळभाज्या, जोडीला कडेला वाळवणाच्या खारवलेल्या शेंदोड्या गवार तेलात परतून, शिवाय चिंच किंवा कैरीचे पन्हे, भरून ढोबळी मिरची किंवा
त्या चुलीत भाजून केलेला ठेचा असे व्यवस्थित
दोन पाटांवर, एक पाट ताट ठेवायला,असे जेवण लागे. मी तर त्यांच्या समोर बसून त्यांच्याच ताटात जेवत असे. आणि हो, पापड
तर हवेतंच.म्हणून मलाही लहानपणापासून साऱ्या भाज्या खायची सवय लागली.धुळ्याहून घरी येताच गरम पाण्याने हातपाय धुवून सहाच्या सुमारास ते जेवायला बसत. आई
आम्हाला बाजूला बसून वाढत असे. व मग ती
जेवत असे.तेव्हा मोलकरीण हा प्रकारच नव्हता.आई मग सारे आवरून भांडी घासत असे. मी क्वचित तिला भांडी धुवायला मदत
केल्याचे आठवते. तिने मला कधीच भांडी घासू
दिली नाहीत. कशा असतात ना ह्या आया?
पण, स्वयंपाकाला चुलीसमोर मात्र तिने मला
फार लवकर बसवले. ती म्हणायची, धुणे भांडी
करायला काही डोकं लागत नाही. स्वयंपाक मात्र आलाच पाहिजे. कशी ही कर पण भाजी कर. भाकरी कर. चहा कर. बघा इतक्या लहानपणी चुलीवर तिने मला सारे शिकवले म्हणून कुकिंग ते टिचिंग माझे कधीच अडले नाही. आजही मी उत्तम स्वयंपाक करते.पाटवड्यांपासून पुरणपोळी पर्यंत माझे
गणित कधीच माप न घेता, कधीच चुकत नाही.तिने
मला मसाले दळण्यापासून शेवया करेपर्यंत सारे शिकवले म्हणून लग्नकरून आल्यानंतर
अवघ्या १८/१९ साव्या वर्षीही माझे कधीच
काही अडले नाही व चुकलेही नाही. आडसणे,
पाखडणे, रवा वैचणे( तेव्हा रेडिमेड रवा मिळत नसे, गहू ओले करून घरीच काढावा लागे).
सारे मला येते. माझ्या सासरी मी ही सारी कामे
केली. मी त्याकाळी शिकलेली मुलगी म्हणून मला काही येत नसावे असा सगळ्यांचा समज
होता तो खोटा ठरला. मी सासरी पाट्यावर मसाला वाटत असे, सारेच वाटत, तेव्हा थोडेच
मिक्सर होते. एकदा माझ्या सासरी शेजारी
पाटावरच्या शेवया चालू होत्या. त्यांना वाटले मला कशाला शेवया करता येतील?
जा, सुमतीला बोलवून आणा. गेले नि खाटेवर डायरेक्ट पाटावरच बसले की! साऱ्या बायका थक्क झाल्या.मी नाशिकला आल्यावर खूप वर्षांनी मिक्सर घेतला, पाटा वरवंटाच वापरत
होतो. असो.. असे आमचे दिवस होते एकूण..
आता तर काय? हातपाय हलवावेच लागत नाहीत. आम्ही शेंगदाणे खलबत्यात कुटायचो.
आता बटन दाबले की, भर्रकन सेकंदात कुट
होते. यंत्रावर पुरण होते. आम्ही मात्र दिवसभर
राबत असू.नवी पिढी नशिबवान आहे. सारी यंत्रे हाताशी आहेत. अंगमेहनत गेली नि कष्टाची सवयही गेली. सारे काही आयते नि क्षणात मिळते आता. “पैसा फेको और तमाशा देखो”! आमच्याकडे फेकायला पैसाही नव्हता हो! मैलोनमैल चाललो आम्ही. “पैसा नाही रिक्षा नाही, चलो पायी पायी, एव्हरी व्हेअर”
असा आमचा जमाना होता. भरपूर कष्ट केले
म्हणून हे दिवस दिसले. स्वत: बरोबर इतरांच्याही मुलांना,शेकडो विद्यार्थ्यांना घडवले जे आजही विसरले नाहीत.
सांगेन पुढच्या भागात तुम्हाला.
छान वाटतं ना गप्पा मारायला.. नि तुम्हाला ऐकायला…
राम राम मंडळी…
जयहिंद… जय महाराष्ट्र…
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
(९७६३६०५६४२)