You are currently viewing महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा. सदस्य व अमरावतीचे माजी विभागीय आयुक्त – डॉ.दिलीप पांढरपट्टे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा. सदस्य व अमरावतीचे माजी विभागीय आयुक्त – डॉ.दिलीप पांढरपट्टे

*एक कुशल प्रशासक*

 

(दिनांक एक ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महसूल पंधरवाडा संपन्न होत आहे त्यानिमित्त काही सनदी अधिकाऱ्यांचा हा परिचय)

 

कविवर्य स्व.सुरेश भटांमुळे अनेक चांगल्या लोकांच्या भेटी झाल्यात. त्यांच्यामुळे काही सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पण भेटी झाल्यात. ती यादी फार मोठी आहे .अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत राहून व सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मा.सदस्य म्हणून कार्यरत श्री दिलीप पांढरपट्टे यांचा माझा परिचय कविवर्य सुरेश भट व गझल सम्राट श्री भीमराव पांचाळे यांच्यामुळे झाला. आमच्या अमरावती विभागाला स्व. सुरेश भटांवर नितांत प्रेम करणारे विभागीय आयुक्त अमरावती विभागाला लाभले होते . हे खरंच खरोखरच आमच्या साहित्यिक मित्रमंडळीला आनंदाची पर्वणी होती .प्रत्येकाला एक छंद असतो आणि तो छंद नकळत विकसित होत असतो. आय.ए.एस.अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे हे उत्कृष्ट सनदी अधिकारी आहेतच. पण गझलेच्या क्षेत्रात त्यांचा चांगला नावलौकिक आहे .कविवर्य सुरेश भट भीमराव पांचाळे आणि दिलीप पांढरपट्टे हे गझलेशी जुळलेले समीकरण आहे .खरं म्हणजे सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागे कामांचा खूप व्याप असतो . पण या शासकीय व्यापातून स्वतःच्या आवडीसाठी स्वतःच्या छंदासाठी प्रत्येक जण जसा जमेल तसा वेळ काढीत असतो.पांढररपट्टे साहेबांनी आपला आवडीचा भाग म्हणून गझलेला स्वतःचे जीवन समर्पित केले आहे .कविवर्य स्व.सुरेश भटांच्या तोंडून अनेक वेळा पांढरपट्टे साहेबांचे नाव निघायचे .परवा अमरावती जिल्ह्यातील गझल नवाज श्री भीमराव पांचाळे यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या गावाला अखिल भारतीय गझल संमेलन आयोजित केले होते . आमचे मित्र व त्या भागाचे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याबरोबर मी या कार्यक्रमाला गेलो होतो . पांढरपट्टेसाहेब तेव्हा मुंबईला कार्यरत होते .खरं म्हणजे मुंबईला रमलेली माणसं अमरावतीला यायला उत्सुक नसतात.किमान बदली झालीच तर ती नागपूर मिळावे अशी प्रत्येक सनदी अधिका-याची इच्छा असते . मोर्शी तालुक्यातील गझलनवाज भीमराव पांचाळ यांचे आष्टगाव हे छोटेसे गाव . अमरावती जिल्ह्यातील मोर्शीजवळ असलेले.त्या गावांमध्ये गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी आपले सगळे साहित्यिक गणगोत गोळा केलेले होते .भीमरावांचे गणगोत म्हणजे गझल लिहिणारे .गझलेवर प्रेम करणारे सर्वजण त्यात आले .या कार्यक्रमाला दिलीप पांढरपट्टे साहेब मुंबईवरून स्वतःच्या वाहनाने येऊन आवर्जून उपस्थित राहिले होते. गझलेचा कार्यक्रम आणि पांढरपट्टे साहेबांची उपस्थिती हे समीकरण चांगले जुळून आलेले आहे. मागे भीमरावांनी नवी मुंबईच्या परिसरामध्ये गझल संमेलन घेतले होते. त्यावेळेस साहेब धुळ्याला जिल्हाधिकारी होते. जिल्हाधिकाऱ्याच्या मागे कामाचा किती व्याप असतो .पण ते सांभाळूनही त्यांनी नवी मुंबईच्या गझल संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली होती.तेव्हा मी त्यांना भेटलो.मी कवीश्रेष्ठ स्व.सुरेश भटांवर कॉफी टेबल बुक तयार करीत आहे .त्याची प्रत मी तेव्हा त्यांना दाखविली आणि त्यांनी तोंड भरून माझ्या या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि हे कॉफी टेबल बुक चांगले तयार केले याबद्दल माझे अभिनंदनही केले .मागे एकदा असेच मी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे गेलो होतो .सटाण्यावरून धुळे फारच जवळ होते . पांढरपट्टे साहेब तेव्हा धुळ्याला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. माझा सटाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मुद्दाम धुळ्याला गेलो .साहित्यिक विश्वातील माणसं जेव्हा सनदी अधिकारी होतात तेव्हा प्रशासनाला भावनेची आत्मियतेची जिव्हाळ्याची चांगली जोड मिळते. मी धुळ्याला गेल्यानंतर साहेब नेहमीप्रमाणे व्यस्तच होते .परंतु आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी माझ्यासाठी आपल्या साहित्यिक मित्रासाठी वेळ काढला. मनापासून चांगले आदरतिथ्यही केले . त्यांची अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या निमित्ताने अमरावती विभागाला कुशल प्रशासक मिळालेला होता.साहेब अमरावती येथे विभागीय आयुक्त म्हणून रुजू होताच त्यांनी अनेक चांगले कार्यक्रम अमरावतीमध्ये घडवून आणले आणि ते हाउसफुल करून दाखविले . ते अमरावतीला असताना आमच्या साहित्यिकांमध्ये खूप उत्साह होता .आपला एक मित्र सुरेश भटांच्या गजलेवर प्रेम करणारा स्वतः गजल लिहिणारा आणि गझल संमेलनाला जाणारा माणूस आपलला विभागीय आयुक्त आहे हे आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. अमरावतीला असताना साहेबांनी अमरावतीचे वातावरण गझलमय व्हावे इथल्या गझल लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सातत्याने अनुकूल प्रयत्न केले. हे त्यांची साहित्यिकांच्या बाबतीत सामाजिक बांधिलकी म्हणावी लागेल. साहेब अमरावतीला विभागीय आयुक्त होते ही आमच्या सारख्या गजलेवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक व साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साहित्यिकांसाठी व रसिकांसाठी तसेच जनतेसाठी अतिशय आनंदाची बाब होती .अमरावती विभागात अनेक विभागीय आयुक्त आलेत आणि गेलेत. पण श्री ह रा कुलकर्णी नंतर साहित्यावर प्रेम करणारा साहित्य लिहिणारा व ते साहित्य अमलात आणणारा विभागीय आयुक्त आम्हाला लाभला होता. आज साहेब विभागीय आयुक्तापेक्षाही मोठ्या असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवेत आहेत. ते कुठे जरी असले तरी सुरेश भटांवर गझल वर व साहित्यिकांवर त्यांचे प्रेम तसुभरही कमी होणार नाही याची शाश्वती आहे .कारण साहित्याचे रूपाने त्यांना जीवनाचे खरे रूप गवसले आहे. ही सुवर्णसंधी फार कमी लोकांना मिळते. प्रशासनात राहून साहित्यिकांवर साहित्यावर प्रेम करणाऱ्या या माणसाला एक ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान संपन्न होणाऱ्या महसूल पंधरवाडा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

 

डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा