मालवण देऊळवाडा स्मशानभूमीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी…
मालवण
मालवण शहरातील देऊळवाडा स्मशानभूमीचे काम गेले अनेक महिने सुरू असल्याने मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात सुरू असलेले काम पावसाळ्यातही पूर्ण न झाल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर ठेकेदारामुळे आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत ठाकरे शिवसेनेचे युवासेना उपशहर अधिकारी उमेश चव्हाण यांनी याबाबत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधत हे काम तात्काळ पूर्ण व्हावे अशी मागणी केली आहे.
देऊळवाडा स्मशानभूमी च्या संथ गतीने चाललेल्या कामाबाबत ठाकरे शिवसेने यापूर्वी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. या कामाच्या कंत्राटाची मुदत संपूनही काम अपूर्ण असून कंत्राटदाराच्या कामगारांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून उद्धट उत्तरे दिली जात असल्याचा आरोप युवासेनेच्या उमेश चव्हाण यांनी केला आहे. हे काम तात्काळ पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. किरण चव्हाण, बाबू गावकर, संतोष चव्हाण, शेखर आंब्रडकर, प्रकाश माणगावकर, सत्यवान चव्हाण, राजू गावकर, संतोष चव्हाण, गणेश गावकर, पांडू फणसेकर आदी नागरिकांनीही हे काम तात्काळ पूर्ण व्हावे, अशी मागणी केली आहे.