– परशुराम उपरकर
कणकवली
सिंधुदुर्गात आजवर संचयनी, पॅनकार्ड, पर्ल्स ग्रीन, पॅगोडा फायनान्स, आदित्य फायनान्स आदी अनेकविध कंपन्यांनी हजारो ग्राहकांना चुना लावला. यात शेकडो एजंट भरडले गेले. तरीही साखळी पद्धतीने चालणार्या अनेक कंपन्या जिल्ह्यात येत आहेत. त्यामध्ये तरूणांची तसेच ग्राहकांचीही मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये तरूणांसह ग्राहकांनी गुंतवणूक करू नये असे आवाहन मनसेचे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केले.
श्री.उपरकर म्हणाले, जिल्ह्यात सध्या हजार ते बाराशे रूपये गुंतवणूक करून प्रतिदिनी परतावा मिळण्याच्या योजनेत अनेक तरूण अडकत आहेत. याखेरीज काही किराणा साहित्य विक्रीच्या कंपनीकडून ३३ टक्के कमी दराने साहित्य देण्याची योजना सुरू आहे. मात्र हे साहित्य देताना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. कंपनीची कागदपत्रे दाखवली जात नाहीत. कणकवली, देवगड, येथे हा प्रकार प्रामुख्याने सुरू आहे. याखेरीज केंद्रीय आयुष विभागाची परवानगी नसताना वेदिका नामक कंपनी आपली उत्पादने विकत आहे.
श्री.उपरकर म्हणाले, अलीकडेच गोल्ड कॉइन कपंनीने सिंधुदुर्गातील ग्राहकांना ३० ते ४० कोटींचा गंडा घातला आहे. त्यानंतर अशा अनेक कंपन्या येत आहेत. सध्या कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा तरूणांना शोधून पुन्हा फसवणुकीच्या योजनांमध्ये सामील करून घेतले जात आहे. त्यामुळे अशा बोगस कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.