दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या सारिका काळेने मिळविला अर्जुन पुरस्कार
“व्यक्तिविशेष”
उद्याचा वेळ कसा घालवायचा?, शेअर्स चे भाव वाढतील का घटतील?, उद्याच्या भागात तो तिला सांगेल का?, ट्रम्प जिकंतील का? ते सुशांत सिंग च्या केसचा निकाल काय लागेल? असा विचार करून रोज झोपणाऱ्या भारतात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारे लोक आहेत हे अनेकांच्या ध्यानीमनी नसते. स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षानंतर ही माणसाच्या मुलभूत गरजा ह्या भारतात पुर्ण होत नाहीत हे वास्तव चटका लावणारं आहे. खेळामध्ये योग्य मार्गदर्शन, योग्य साधन न मिळाल्यामुळे आजवर अनेक तारे काळाच्या ओघात आपलं असित्व दाखवू शकले नाहीत. क्रिकेट सारख्या खेळाच्या तेजोवलयात आजवर अनेक खेळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळेच म्हणावं तसं ह्या खेळांना आणि खेळांमध्ये जाण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहन मिळालं नाही.
ह्यामुळेच क्रिकेट शिवाय आजही इतर भारतीय खेळांना कमी दर्जाच समजलं जाते.
कोणताही खेळ देशासाठी, प्रांतासाठी खेळणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूच स्वप्न असते ते म्हणजे अर्जुन पुरस्कार मिळवणं. १९६१ पासुन भारत सरकार खेळात देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देते आहे. १५ लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्रकासह सन्मानचिन्ह हे ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. खेळाडूंच्या खेळातील प्रावीण्या पलीकडे त्या खेळाडूंनी खेळाडूवृत्ती, लिडरशिप तसेच त्यांच वर्तन कसं देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे ह्या गोष्टींचा ही हा पुरस्कार देताना विचार केला जातो. ह्या वर्षी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या खेळाने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकत ठेवणाऱ्या रुईभर उस्मानाबाद, महाराष्ट्र इथल्या सारीका काळे ची निवड ह्या पुरस्कारासाठी झालेली आहे. गेलं पुर्ण एक दशक एक वेळच जेवण करून खो- खो सारख्या दुर्लक्षित झालेल्या खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील सारीका काळे चा प्रवास थक्क करणारा आणि प्रोत्साहन देणारा असाच आहे.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद इकडे एका गरीब कुटुंबात सारीका चा जन्म झाला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या घरात घराची जबाबदारी तिच्या आईवर होती. वडील दिव्यांग असल्यामुळे घर चालवण्यासाठी सारीका च्या आईला शिवणकाम ते दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करावी लागत. आई बाहेर काम करत असताना तिच्या आजीने घराची जबाबदारी घेतली होती. अश्या खडतर परिस्थितीचे चटके सोसताना आपण घरासाठी काय करू शकतो? हा विचार तिच्या मनात कुठेतरी सतत चालू होता. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी आपल्या शाळेत तिने खो- खो मध्ये भाग घेतला. त्या दिवसानंतर सुरु झाला एक खडतर प्रवास. खो- खो खेळताना त्या काळात तिला फक्त एक वेळच जेवण मिळत असे. आपली भूक भागवण्यासाठी तिची भिस्त टोमॅटो आणि मॅगी वर असायची. कधीतरी एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी अथवा कॅम्प ला गेल्यावर तिला दोन वेळच जेवण नशिबाने मिळत असे.
ह्याच काळात तिची ओळख आपले कोच डॉ. चंद्रजीत जाधव ह्यांच्याशी झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात खो- खो हा खेळ शालेय स्तरावर खूप आवडीने खेळला जातो. ह्यामुळे ह्या खेळात राज्य स्तरावर निवड होण्यासाठी खूप मोठी रांग होती. पण सारीकाने आपल्या खेळाची चुणूक दाखवताना दोन वर्षात राज्य स्तरावर आपल नाव नोंदवलं. २०१४-१५ ला कॉलेजमध्ये शिकत असताना घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून तिने खो- खो ला सन्यास घ्यायचा निर्णय घेतला. स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं पण तिचे कोच डॉ. चंद्रजीत जाधव ह्यांनी तिची खुप समजुत घातली. तिचा हा निर्णय तिच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला. २०१६ ला तिची निवड राष्ट्रीय संघात झाली आणि त्या संघाच प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ही तिच्यावर आली. १२ व्या साऊथ एशियन गेम मध्ये गुवाहाटी इकडे तिने आपल्या खेळाने संघाला गोल्ड मेडल मिळवून दिलं. तर २०१६ साली आशिया पातळीवर इंदोर इकडे झालेल्या खो- खो स्पर्धेत तिच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने गोल्ड मेडल जिंकताना बांग्लादेश ला धुळ चारली. विशेष म्हणजे ह्या संपुर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. सारीका काळे चा सर्वोत्तम खेळ आणि सांघिक नेतृत्वाची ह्या विजयामागे निर्णायक भुमिका होती. ह्याच स्पर्धेत तिची निवड सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून झाली. तिला रुपये ५१ हजार रोख बक्षिसाने गौरवण्यात आलं. तिच्या यशाचा आलेख असाच चढता राहिला आणि २०१७ साली इंग्लंड मध्ये सर्वोत्तम खो- खो खेळाडू म्हणून तिला गौरवण्यात आलं.
सारीका काळेचा रुईभर, उस्मानाबाद इथून सुरु होऊन इंग्लंड पर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, घरी हलाखीची परिस्थिती. मुलगी म्हणून घरच्यांचा दबाव पण ह्या सगळ्याला तिने मात दिली ती आपल्या जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्ती च्या जोरावर. ह्यात तिच्यामागे उभ्या राहिल्या त्या दोन स्त्रियाच. तिच्या आई आणि आजीने कोणालाही न जुमानता सारीका ला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कोच डॉ. चंद्रजीत जाधव ह्यांनी सारीका ला घडवण्यात घेतलेल्या मेहनतीमुळे आज महाराष्ट्राच्या एका छोट्या गावात असणाऱ्या सारीका काळे ला तब्बल २२ वर्षांनी खो- खो ह्या खेळात राष्ट्रीय स्तरावर अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तिच्या ह्या प्रवासाची दखल जशी केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन घेतली तशीच महाराष्ट्र सरकारने तिला खेळ अधिकारी म्हणून तुळजापुर इकडे सरकारी नोकरीवर नियुक्ती करताना गेल्या कित्येक वर्षांचा तिच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.
खो- खो सारख्या भारताच्या मातीतील खेळाला २२ वर्षांनी अर्जुन पुरस्कार मिळतो ह्यावरून क्रिकेट ने किती खेळाची गळचेपी केली आहे हे लक्षात येईल. आशिया स्तरावर सर्वोत्तम ठरलेल्या खेळाडुला नाममात्र ५१ हजार रुपये मिळतात पण कोणत्यातरी क्लब मध्ये खेळणारा फालतू खेळाडू सुद्धा २०-२० मध्ये रातोरात कोटी रुपयांचे मानधन घेतो. ज्या २०-२० स्पर्धेत कोणताच खेळाडू देशाच अथवा एखाद्या राज्याच प्रतिनिधित्व करत नाही त्याची बोली लावायला सुरवात कोटीच्या आकड्यापासून होते. कुठेतरी एक सुजाण प्रेक्षक, खेळाडू, खेळाचा आनंद घेणारे सगळेच ह्यांनी आपला फोकस बदलण्याची गरज आहे. खो-खो सारखा खेळ ऑलम्पिक मध्ये नसला म्हणून काय झालं? जपान चा सुमो कुस्ती तरी कुठे आहे? पण आज जपान आपल्या मातीतील खेळाला आपलस करून आहे. आम्ही मात्र गोऱ्या लोकांच्या सभ्य खेळाला आमचा धंदा बनवून बसलो आहोत.
सारीका काळेचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच तो वेदना देणारा पण आहे. सारीका काळे सारखे कितीतरी खेळाडू आज इतिहासाच्या पानात कधी आले, कधी गेले कळले पण नाहीत. जिकडे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही तिकडे खेळाचा दर्जा तरी कसा उंचावणार आहे? नक्कीच आपण कुठेतरी आपल्या आत मध्ये झाकून बघण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात जर एक खेळाडू एक वेळ जेवून देशाचा तिरंगा सातासमुद्रापार फडकावू शकते तर जेव्हा त्या खेळाडूला योग्य ती साधन मिळतील तेव्हा खेळाचा दर्जा किती उंचावेल. आज अर्जुन पुरस्कार मिळाल्यावर ही माझा महाराष्ट्र आणि मी मराठी करणाऱ्या किती मिडीया नी ही बातमी दाखवली? महाराष्ट्राची अस्मिता आपल्याच उरावर घेऊन सोशल मीडियावर लढणाऱ्या किती मावळ्यांना सारीका काळे माहीत आहे? कुठेतरी आपण सगळेच चुकत आहोत.
दहा वर्ष एक वेळच जेवण खाऊन महाराष्ट्राच्या एका मराठी मुलीने देशाचा मोठा खेळ पुरस्कार मिळवला आहे त्यासाठी तिचं मनापासून अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. तिच्या ह्या यशात खारीचा वाटा उचलणारे तिचे कोच डॉ. चंद्रजीत जाधव ह्यांचही विशेष अभिनंदन.