‘हर घर तिरंगा‘ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी,
‘हर घर तिरंगा’ हे अभियान आता लोक चळवळ बनली आहे. गेली दोन वर्ष ज्या उत्साहाने हे अभियान यशस्वी केले त्याच पध्दतीने याही वर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यात ‘घरोघरी तिरंगा” हे अभियान साजरे केले जात आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. ९ ऑगस्ट रोजी या अभियानाची राज्यस्तरावरुन सुरूवात होणार आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.
या अभियानादरम्यान तिरंगा यात्रा, तिरंगा रॅलीज, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येक घरावर दिनाकं १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ध्वज फडकविण्यात येणार आहे. याही वेळी प्रत्येकाला आपली तिरंगा सोबत काढलेली सेल्फी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ https://www.harghartiranga.com वर अपलोड करावयाची आहे. प्रत्येक गाव शहरामध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्याबाबत ग्राम विकास विभाग व नगर विकास विभाग यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्व प्रकारची शासकीय / निमशासकीय कार्यालय, आस्थापना प्रतिष्ठाने यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.