*”मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन”चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतात, पण जन्मल्यानंतर एकच नातं आहे जे स्वतःला तयार करता येतं, ते म्हणजे मैत्री. मैत्रीचा हा सण पहिल्यांदा १९३५ साली साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘जागतिक मैत्री दिन’ साजरा केला जातो. या खास प्रसंगी कवींच्या रचनांना एक वेगळंच कोंदण लाभतं आणि ते विणत जातात हेच मैत्रीचे धागे अगदी घट्ट. हाच मैत्रीचा धागा गुंफताना भारतीय स्वातंत्र्यदिनाचा जागर करण्याची नामी संधी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात साधली.
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिका गौरी यशवंत पंडित ह्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांचे जयश्री हेमचंद्र चुरी यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले. त्यावेळी ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये वैभवी विनीत गावडे, नंदा कोकाटे, रामकृष्ण चिंतामण कामत, विक्रांत मारुती लाळे, सरोज सुरेश गाजरे, जयश्री हेमचंद्र चुरी, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, किशोरी शंकर पाटील, बोधीअशोक कदम, मीरा सावंत, श्रीशैल नंदकुमार सुतार, कल्पना दिलीप मापूसकर, प्रसाद यशवंत कोचरेकर, शैलेश भागोजी निवाते, रविंद्र शंकर पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाचा जागर करणार्या आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली.
मध्यंतरामध्ये चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेत असतांना मीरा सावंत यांनी मालवणी भाषेची गोडी वर्णन करणारी एक सुंदर रचना सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. तर शैलेश भागोजी निवाते यांनी “माझं अस्तित्व’ ह्या त्यांनीच लेखन, दिग्दर्शन आणि अभिनीत असलेल्या नाटकातील प्रवेश सादर केला. त्यानंतर बोधीअशोक कदम यांनी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत लिखित ”मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा” ही कविता सुंदररीत्या सादर केली आणि दुसर्या सत्रात काय असणार ह्याची चुणूकच दाखवली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी जागतिक मैत्री दिनानिमित्त एकाहून एक सुंदर रचना सादर केल्या. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी प्रशांत कुलकर्णी, प्रकाश राणे, हरिश्चंद्र भंडारे आणि शुभांगी रामकृष्ण कामत आवर्जून उपस्थित होते. त्यांनीही कार्यक्रमासाठी खूपखूप शुभेच्छा दिल्या.
संमेलनाध्यक्ष गौरी यशवंत पंडित यांनी मनोगत व्यक्त करताना अनेक कवितांचा धांडोळा मांडला. मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाची सांगता करताना ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
विद्येची देवता गणपतीचे आगमन सप्टेंबर महिन्यात होत असल्यामुळे २२ सप्टेंबर २०२४ रोजी सातवे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, नाटककार तसेच कवी शैलेश भागोजी निवाते असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर तर आभारप्रदर्शन नितीन सुखदरे यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी वैभवी गावडे, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.