You are currently viewing जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या सोबत १००+ सरपंच देणार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या सोबत १००+ सरपंच देणार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक

*मळगाव येथील बैठकीत सावंतवाडी सह दोडामार्ग, वेंगुर्ला कुडाळ आदी तालुक्यातील सरपंचांना उपस्थित राहण्याचे आवाहन*

 

मळगाव (ता.सावंतवाडी) येथे शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी वीज ग्राहक संघटना सावंतवाडीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व सरपंचांसोबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी सावंतवाडीसह दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आदी तालुक्यातील १००+ गावांमधील सरपंचांनी लेखी तक्रारी घेऊन मंगळवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता कुडाळ येथील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जिल्ह्यातील समस्यांबाबत जाब विचारण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट , जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, सचिव संजय नाईक, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांतील सरपंच उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आहे की आता गावागावातून वीज ग्राहकांचा उद्रेक होऊ लागला आहे. वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातील संघटना गेली दीड दोन वर्षे सातत्याने वीज प्रश्नांवर आवाज उठवत आहे. परंतु निद्रिस्त महावितरणला जाग येत नव्हती. यावर्षीच्या पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनता आठ आठ दिवस अंधारात राहिला आणि त्याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील जनतेचा महावितरणच्या विरोधात झालेला उद्रेक. जिल्ह्यातील जागृत झालेल्या जिल्हावसियांना एकत्र आणून महावितरणच्या कारभाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी, आपला हक्क सहज मिळत नसेल तर भांडून घेण्यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठीच ग्रामपंचायतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरपंचांना एकत्र आणून महावितरण व्यवस्थेला जागेवर आणण्यासाठी जिल्हा वीज ग्राहक संघटनेने सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांसोबत संयुक्त बैठक घेत सावंतवाडी सह दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील सर्व सरपंचांसह कुडाळ येथील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता कार्यालयावर मंगळवारी धडक देण्याचे ठरले.

मळगाव येथील बैठकीत अनेक सरपंचांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. पाडलोस येथे भर पावसाळ्यात महिनाभर वायरमन नसल्याने गावात अनेक समस्या निर्माण होत असल्याचे उपसरपंच राजू शेटकर यांनी सांगितले. तसेच व्येत्ये सरपंच गुणाजी गावडे, शेर्ले सरपंच दीपक नाईक, शंकर नाईक आरोस आदींनी देखील आपल्या गावांतील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी वीज ग्राहक संघटना कार्यकारणी सदस्य समीर शिंदे रामचंद्र राऊळ, सिद्धेश तेंडुलकर, मनोज घाटकर, आरोंदा सरपंच गीतांजली वेळणेकर, सदस्या सायली साळगावकर, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, राजेंद्र परब माजी सभापती सावंतवाडी, संजय तांडेल व्यापारी, गजा सोमा राऊळ, विश्वनाथ गोसावी, स्नेहल जामदार माजी सरपंच मळगाव, लक्ष्मण निगुडकर सरपंच निगुडे आदी सरपंच, वीज ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा