शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांचा महेश सारंग यांना टोला
सावंतवाडी
सहकारी संस्था व महेश सारंग यांचा दुरान्वये संबंध नसून, स्टंटबाजी या शब्दाचा अर्थ तरी महेश सारंग याना माहित आहे का? असा प्रश्न शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. सतिश सावंत स्टंटबाजी करतात असे म्हणणे देखील हास्यास्पद असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. सतिश सावंत यांच्यावर टीका करण्यापूर्वी महेश सारंग यांनी कोलगावच्या ज्या दुग्ध उत्पादन संस्थेवर काम करतात ती संस्था तोट्यात का जात आहे. एकेकाळी ७०० लिटर दूध संकलन करणारी संस्था यांच्या काळात २२५ लिटर वर का आली?, कोलगाव येथील दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या दूध संस्थेत दूध न घालता खाजगी दूध विक्री का करत आहेत याची माहिती करून घ्यावी आणि नंतर टीका करावी असा सल्ला तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. तसेच खरेदी विक्री संघाचे निवडणूक तिकीट मिळण्यापूर्वी सहकाराचा अभ्यास करून आपल्या दूध संस्थेतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असा जोरदार टोला लगावला आहे. महेश सारंग यांनी भाजप नेते नारायण राणे यांनी २०१६ साली जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा डेअरी ने फसवणूक केलेल्या ४५०० शेतकऱ्यांचे रक्कम परत मिळवून देण्यास प्रयत्न केल्यास ते शेतकरी आशीर्वाद देतील असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच कणकवलीतील दूध डेअरी ही खूप जुनी असून, गेली अनेक वर्ष ती बंद होती यावेळी ती सुरू करण्यासाठी नितेश राणे यांनी कोणते प्रयत्न केले हे महेश सारंग यांनी जाहीर करावे असे आवाहन देखील त्यांना रुपेश राऊळ यांनी दिले आहे. तसेच तारण घेऊन कर्ज देणे हे जिल्हा बँकेचे काम असून, वेळेत कर्जाची वसुली करणे देखील आवश्यक आहे. या वसुली पथकावर कोण्ही हस्तक्षेप करण्याचा प्रश्न येत नसल्याचे देखील त्यानी यावेळी स्पष्ट केले आहे. जिल्हा बँक निवडणूक जवळ आल्यानेच नितेश राणे व त्यांच्या कुटुंबीयांना खुश करण्यासाठी महेश सारंग स्टंटबाजी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे तिकीट मिळवण्यापूर्वी सहकाराचा अभ्यास करून आपल्या दूध संस्थेतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असा जोरदार टोला देखील त्यांनी लगावला आहे.