*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल*
*मित्रा…!*
कामात व्यस्ततेला दे भाव खास मित्रा,
होईल दुःख अर्धे चिंता खलास मित्रा!
टिंगलटवाळखोरी आनंद हा अघोरी,
देता पिडा मनाला आत्म्यास त्रास मित्रा!
बिनधोक स्पष्ट बोला येईल राग थोडा,
व्हावे भले जगाचे हा ठेव ध्यास मित्रा!
आयुष्य हे घडीचे आहे कुठे भरोसा?
व्हावा सफल सुखाचा सारा प्रवास मित्रा!
मित्राशिवाय जगणे जगणे कसे म्हणावे?
मैत्रीत मित्र मालक अन् तोच दास मित्रा!
जयराम धोंगडे
***