You are currently viewing चातुर्मास….(नवे अन्वयार्थ)

चातुर्मास….(नवे अन्वयार्थ)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*चातुर्मास….(नवे अन्वयार्थ)*

 

भारतीय समाजाला काही अध्यात्मिक व काही

सामाजिक परंपरा आहेत. तशा त्या प्रत्येक समाजाला असतात व ते ते समाज त्या परंपरांना चिकटून असतात. ह्या परंपरा अंगी

इतक्या मुरलेल्या असतात की कालानुसार त्यांचे अर्थ बदलले तरी त्यात बदल करण्याचे

धारिष्ट्य पापभिरू समाज करत नाही इतका

जबरदस्त पगडा त्या परंपरांचा समाजावर असतो. मग अशा परंपरा बदलण्यासाठी समाजधुरीणांना कठोर पावले उचलावी लागतात जशी सतीच्या भयंकर क्रूर प्रथे विरूद्ध अनेक समाज सुधारकांना उचलावी

लागली. त्यात प्रामुख्याने होते राजाराम मोहन

रॅाय. किती भयंकर अमानुष प्रथा होती ही. तरीही समाज हिररीने पुढाकार घेत (क्रूर, विकृत समाधान मानत ) चालू ठेवत होता. आज विचार केला तर अशा समाजाची घृणा वाटावी तेवढी कमीच आहे. आणखी उदा. स्री शिक्षण, विधवा विवाह, केशवपन, बालविवाह इ.

 

माझे म्हणणे एवढेच आहे की, परंपरा ज्या चांगल्या आहेत त्या जतन कराव्यात व कालबाह्य आहेत त्यांना मूठमाती द्यावी. परंपरांचे विकृतीकरण होऊ नये जे आज आपल्याला समाजात सर्रासपणे दिसते आहे.

आपला चातुर्मास ही खूप चांगली परंपरा आहेच. त्यात अध्यात्मा बरोबरच आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक अनेक संस्कार, आरोग्यविचार व विज्ञान दृष्टीही त्यात जोडलेली आहे यात मुळीच शंका नाही.

 

भर पावसाळ्यात चातुर्मास सुरू होतो.जेव्हा आपल्या आतड्यांची पचन क्षमता कमी झालेली असते.म्हणून उपवास करायचे. उपवास म्हणजे परमेश्वराच्या अधिक जवळ

जाणे. त्याचे चिंतन नामस्मरण करणे ज्या योगे

आत्मशुद्धी होऊन माणूस अंतर्मुख होऊन स्वत:चा शोध घेऊ लागतो. अंतर्मनात डोकावतो. विचार करतो. त्यातून त्याला बऱ्याच

गोष्टींचा शोध लागतो. आपण नक्की कुठे आहोत हे कळते. एक प्रकारे आत्मचिंतनातून हा स्वत:चाच शोध असतो जो घेणे खरोखर गरजेचे असते. म्हणून खूप भाविक चातुर्मासात

मंदिरात देवासन्निद्ध राहून भजनपूजन आत्मचिंतनात वेळ घालवतात. काही काळ का

होईना प्रपंचातून मुक्ती मिळून मन:शांतीचा अनुभव या काळात मिळतो जो प्रापंचिकाला

अत्यंत गरजेचा असतो. कारण प्रपंच तर कुणाला सुटत नाही व तो सोडायचाही नसतो. कारण परमेश्वराने नेमून दिलेले ते काम आहे.

ते करायचेच आहे, त्यापासून पळ काढायचा नाही हे कृष्णदेवांनीच सांगितले आहे.”नियतं

कुरू कर्म त्वं”… फक्त हे करतांना माझे नामस्मरण करा, कर्म मला अर्पण करा.. मी

तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे, त्याची

चिंता करू नका.

 

मग हे प्रापंचिक काही काळ देवाजवळ मंदिरातच ठाण मांडतात किंवा नामस्मरण करत पायी वारीला जात पंढरपुरी त्याच्या

पायांवर नतमस्तक होण्यासाठी शारिरीक कष्ट

ही झेलतात, त्यातूनही त्यांना आत्मिक समाधानच मिळते.एक प्रकारे काही दिवस का

होईना प्रपंचाची आसक्ती सोडायची ( जे अत्यंत अवघड काम आहे) व एक नवी उर्जा व

समाधान घेऊन परतायचे जे पुढील वारीपर्यंत

त्याला पुरते. बघा या चातुर्मासात केवढा अर्थ

दडलेला आहे, या भावनेनेच आपण या कडे बघितले पाहिजे.

 

आता उपवास म्हणाल तर ते प्रकृतीला अत्यंत

उपकारक असतात. म्हणून आपल्याकडे गुरूवार, सोमवार, चतुर्थी व सणवार आहेतच.

आपण ते करतो, मनापासून करतो व करायला

हवेतच हे ही खरे आहे. त्यातून आत्मिक समाधान तर मिळतेच पण प्रकृतीही नियंत्रणात

राहते. पूर्वी शेतात कष्ट करण्यात आयुष्य जात

असे व शिवाय हे उपवास त्यामुळे वजन नियंत्रणासाठी जी यातायात आपण आज करतो ती करावी लागत नसे.

 

पण आपण आज इतके भरकटलो की, उपवास

म्हणजे फराळाची चंगळ, साबुदाणा खिचडी,

बटाटा पॅटीस, वेफर्स, भगर आमटी, तळलेला

साबुदाणा चिवडा व कोणतेच शारिरीक कष्ट

नाहीत जे पूर्वी होते. मग जायचे जिमला. खायचे दाबून. म्हणायचे, एवढे करून वजन कमी होत नाही.म्हणजे चातुर्मासाचे जे उत्तम फलित आमच्या पूर्वजांनी घालून दिलेले आहे

त्यापासून आपण कोसो दूर जात आहोत.

तिच गोष्ट सणवारांची. त्यांना तर बाजारू स्वरूप येऊन त्यांचे आम्ही पूर्ण विकृतीकरण

करून टाकले आहे.हे होता कामा नये. प्रत्येकच

गोष्ट सवंग व्हायला लागली तर दिवसेंदिवस

या उत्तम प्रथांचे पावित्र्यच नष्ट होईल. म्हणून

या जुन्या प्रथांचे नीट विचारपूर्वक व नव्या विचारधारांनी पालन होणे गरजेचे आहे.जे

ज्ञत्तम होते, आजही फायद्याचे आहे ते आपण

अधिक डोळसपणे का करू नये?

 

आम्ही चातुर्मास जरूर करावा पण नवा अन्वयार्थ घेऊन. मनन चिंतन ध्यानधारणा योगासने व्यायाम सत्कर्म पूजाअर्चना नामस्मरण इ. ध्यानी धरत आपल्या भागवत

धर्मातील महान ग्रंथांचे रामायण महाभारत दासबोध तुकारामांची गाथा ज्याला जे जे आवडेल ते ते अवश्य वाचावे. त्यातून आत्मिक

समाधान तर मिळेलच पण प्रत्येक वेळी त्या

ग्रंथातून नवनवे अन्वयार्थ दृष्टीस पडतील. तो

ग्रंथ अधिक अधिक पचनी पडत जाऊन आपल्या नित्याच्या जीवनातही खूप सकारात्मक फरक आपल्याला जाणवेल.लोकमान्य टिळकांनी १९१५ साली

लिहिलेले” गीतारहस्य” मी वाचायचे ठरवले.

एक वेळ ठरवून घेतली. कारण त्या शिवाय अशी मोठी कामे होत नाही. दुपारी तीन ते साडेतीन अशी वेळ ठरवून घेऊन मी नेमाने तो

ग्रंथ वाचला. गीतेवर इतके सोपे विवेचन टिळकां सारखा विलक्षण बुद्धिमान माणूसच करू शकतो याची प्रचिती त्या तीन महिन्यात मला आली. हो, फक्त अर्धातास असा तीन महिन्यात अखंडपणे वाचून मी तो पूर्ण केला. तो मला पूर्ण समजला असा दावा मी कधीच करणार नाही. पण माझ्या अल्पमतीत थोडी भर पडली हे मी खात्रीने सांगू शकते.टिळकांनी

त्यात जी गणिते मांडली आहेत ती अतिशय

विलक्षण आहेत. ती वाचून तर मी भांबावलेच.

किती महान माणसे होती ही, ज्यांनी मंडालेच्या

अतिशय बिकट परिस्थितीत अशी महान कलाकृती घडवली. तो वारसा आपण जपला पाहिजे. खरे तर त्यांच्या पुढे आपण अगदी कुचकामाचे आहोत हे ग्रंथ वाचल्यावर चांगलेच समजते.

 

तर मंडळी, चातुर्मासाचा नवनवा अर्थ शोधत

आपण तो अंगिकारावा असे मला वाटते. तुम्हीही नक्की या माझ्या मताशी सहमत व्हाल

याची मला खात्री आहे. तुमच्या मनात अधिक

अजून काही नवे असेल तर तसे मला कळवा,

मला ते अधिक आवडेल.

 

धन्यवाद…

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा