You are currently viewing पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारतीय स्टार मनू भाकर आणि सरबजोत सिंग पुन्हा पदकाच्या शर्यतीमध्ये

पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारतीय स्टार मनू भाकर आणि सरबजोत सिंग पुन्हा पदकाच्या शर्यतीमध्ये

*मनिकाने रचला इतिहास, लक्ष्य सेनचा विजय, अर्जुन बाहेर तर बोपण्णाची निवृत्ती*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जर्मनीचा खेळाडू मार्क लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुरुष दुहेरी गट क गटातील सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय जोडी सोमवारी लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जर्मन जोडीविरुद्ध सामना खेळणार होती, बीडब्ल्यूएफने सांगितले की, जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली त्यामुळे भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक आणि चिराग यांनी शनिवारी लुकास कॉर्वी आणि रोनन लाबर या फ्रेंच जोडीवर २१-१७, २१-१४ असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सात्विक-चिराग या भारतीय जोडीचा मंगळवारी गटातील अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी सामना होईल. या दोघांमधील विजेता गट क मधील अव्वल जोडी निश्चित करेल.

 

बॅडमिंटन महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या जोडीला ग्रुप स्टेजमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना जपानच्या नमी मात्सुयामा आणि चिहारा शिदा या चौथ्या मानांकित जोडीने २१-११ आणि २१-१२ ने पराभूत केले. तत्पूर्वी, पोनप्पा-क्रास्तो जोडीला दक्षिण कोरियाच्या यंग सो किम आणि योंग ही काँग यांनी २१-१८, २१-१० असे पराभूत केले होते. आता भारतीय जोडीसाठी पुढील वाटचाल खूपच अवघड आहे. पुढील सामना जिंकण्याबरोबरच त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

 

लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या लढतीत ज्युलियन कारागीचा पराभव करत चमकदार कामगिरी सुरू ठेवली. सेनने ४३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात २१-१९, २१-१४ असा विजय मिळवला.

 

शूटिंग स्पर्धेमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांचा भारताचा मिश्र संघ १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदकासाठी लढणार आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत चार संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. अव्वल दोन संघ सुवर्ण आणि रौप्यपदकासाठी, तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ कांस्य पदकासाठी लढतील. कांस्य पदकासाठी मनू आणि सरबजोत यांच्यासमोर ओ ये जिन आणि ली वोंहो ही दक्षिण कोरियाची जोडी असेल. ओ ये जिनने रविवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. सेवल इलायडा आणि युसूफ डिकेच ही तुर्की जोडी अव्वल स्थानावर आहे. दोघांनी ५८२ गुण मिळवले. त्याचवेळी सर्बियाची झोराना अरुनोविक आणि दामिर माइकेक ही जोडी ५८१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. या दोन संघांमध्ये सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. पराभूत संघ रौप्यपदक जिंकेल. त्याचवेळी भारताच्या मनू भाकर आणि सरबजोत या जोडीने ५८० गुण मिळवले आणि तिसरे स्थान पटकावले. ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियन जोडीने ५७९ गुणांसह चौथे स्थान पटकावले. भारत आणि कोरिया यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होणार आहे. हा सामना मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून खेळवला जाईल. या स्पर्धेत रिदम सांगवान आणि अर्जुन चीमा या आणखी एका भारतीय जोडीने ५७६ गुणांसह १०वे स्थान पटकावले.

 

महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रमिता जिंदालने सातवे स्थान पटकावले आणि पदकाच्या शर्यती मधून बाहेर पडली. रमिताने चांगली सुरुवात केली होती, पण दुसऱ्या मालिकेत ती मागे पडली आणि त्यानंतर तिला पुनरागमन करता आले नाही. रमिताने १०.२ च्या शॉटने सुरुवात केली होती ज्यामुळे ती संयुक्त पाचव्या स्थानावर होती आणि एलिमिनेशनच्या ०.२ गुणांनी पुढे होती. यानंतर तिने पुन्हा १०.२ चा शॉट खेळला ज्यामुळे रमिता संयुक्तपणे सहाव्या स्थानावर घसरली. त्यानंतर रमिताने शूटऑफमध्ये १०.५ गुण मिळवले, परंतु रमिताची प्रतिस्पर्धी मुलरने १०.८ गुण मिळवून स्पर्धेत स्वत:ला कायम राखले. अशाप्रकारे रमिताचा प्रवास सातव्या स्थानावर संपला.

 

भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबौता पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पदक जिंकू शकला नाही. १६व्या शॉटपर्यंत तो पहिल्या तीनमध्ये होता. कधी दुसरा तर कधी तिसरा आला, पण पदक जिंकू शकला नाही. एकेकाळी तो पहिल्या स्थानावर होता आणि त्यामुळे शेंगच्या ०.१ गुणांनी मागे होता. यानंतर त्याचा फॉर्म बिघडला आणि १६व्या शॉटनंतर तो चौथ्या स्थानावर घसरला. चौथ्या स्थानावर पोहोचत त्याने १७व्या आणि १८व्या शॉट्समध्ये एलिमिनेशन गाठले. तो मारिचित मीरासमोर होता. १७व्या शॉटमध्ये बाबौताने १०.३, तर मीरानने १०.६ शॉट मारला. १८व्या शॉटमध्ये मीरानने पुन्हा १०.६, तर बाबौताने ९.९ शॉट मारले. यासह बाबौता २३० च्या एकूण धावसंख्येसह बाद झाला. त्याचवेळी, चीनच्या शेंग लिहाओने २५२.२ च्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तर स्वीडनच्या व्हिक्टर लिंडग्रेनने २५१.४ गुणांसह रौप्यपदक जिंकले. क्रोएशियाच्या मॅरिसिच मिरानने २३० गुणांसह कांस्यपदक जिंकले. तर अर्जुनचा अंतिम स्कोअर २०८.४ होता.

 

पुरुषांच्या पात्रता स्पर्धेत पृथ्वीराज तोंडैमनने निराशाजनक कामगिरी करत ३०वे स्थान गाठले.

 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील पूल ब हॉकी सामना अंतिम शिटीपर्यंत १-१ असा बरोबरीत संपला. अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली आणि भारतीय संघ बराच वेळ बरोबरी मिळविण्यासाठी झगडत होता. अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला बरोबरी साधून दिली.

 

धनुर्विद्या स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक उपांत्यपूर्व फेरीमध्ये तुर्की संघाने तृतीय मानांकित भारतीय पुरुष तिरंदाजी संघाचा (तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव) पराभव करून प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तुर्की संघाने चौथा सेट ५८-५४ अशा फरकाने जिंकला. तुर्की संघाने पहिले दोन सेट जिंकले होते, मात्र भारतीय तिरंदाजी संघाने दमदार पुनरागमन करत तिसरा सेट जिंकला. मात्र, धीरज, प्रवीण आणि तरुणदीप या त्रिकुटाला चौथ्या सेटमध्ये गती राखता आली नाही आणि सेट गमावला. चौथ्या सेटमध्ये भारताने ९, १०, ९, ९, १०, ७ गुण मिळवले. दुसरीकडे, तुर्की संघाने १०, १०, ९, १०, ९, १० असे गुण मिळवून विजय मिळवला.

 

टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने फ्रान्सच्या प्रितिका पावडेचा पराभव करत महिला एकेरीच्या १६व्या फेरीत स्थान निश्चित केले. पहिल्या गेममध्ये मनिकाचा बचाव उत्कृष्ट होता, मात्र दुसऱ्या गेममध्ये तिने पूर्ण नियंत्रण राखले. तिसऱ्या गेममध्येही तिने चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि १२व्या मानांकित प्रितिकाविरुद्ध विजयाची नोंद केली. मनिकाने हा सामना ४-० ने जिंकला. आता तिचा सामना १६च्या फेरीत मिऊ हिरानो किंवा चेंगझू झु यांच्याशी होईल.

 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरी टेनिसच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताचा दिग्गज खेळाडू रोहन बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. रविवारी झालेल्या सामन्यात गेल मॉनफिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन या फ्रेंच जोडीने ७-५,६-२ ने पराभूत केले. यासह भारतीय जोडी स्पर्धेतून बाहेर पडली.बया सामन्यातील पराभवानंतर बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. तो म्हणाला, “देशासाठी निश्चितपणे ही माझी शेवटची स्पर्धा असेल. मी कुठे आहे आणि आता हे मला पूर्णपणे समजले आहे, यापुढे मी टेनिस सर्किटचा आनंद घेत राहीन. मी जिथे आहे तिथे राहण्याची ही एक उत्तम संधी आहे. हा माझ्यासाठी मोठा बोनस आहे. २२ वर्ष मी भारताचे प्रतिनिधित्व करेन, असे मला कधीच वाटले नव्हते. मला याचा खूप अभिमान आहे.”

 

बोपण्णा आणि बालाजी यांच्या पराभवामुळे १९९६ पासून टेनिसमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ कायम राहिला. बोपण्णा हा दुष्काळ २०१६ मध्ये संपवण्याच्या जवळ आला होता पण त्याची आणि सानिया मिर्झाची जोडी मिश्र स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिली. बोपण्णा २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे.  त्याने आधीच डेव्हिस कपमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा