You are currently viewing जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतापगड मुंबई येथे घेतली अरविंद भादिकर, संचालक (ऑपरेशन) यांची भेट

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतापगड मुंबई येथे घेतली अरविंद भादिकर, संचालक (ऑपरेशन) यांची भेट

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे दिले आश्वासन*

 

मुंबई  :

 

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतापगड बांद्रा मुंबई येथील महावितरणच्या कार्यालयास भेट देत श्री.अरविंद भादिकर, संचालक(ऑप) महावितरण यांच्यासमोर जिल्ह्यातील महावितरणचे कमकुवत असलेले इंफ्रास्ट्रक्चर, सद्ध्याची वीज वितरण बाबत ढासळलेली परिस्थिती आणि अकार्यक्षम अधिकारी, मान्सून पूर्व करणे आवश्यक असलेली कामे न केल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चार पाच दिवस वीज खंडित राहिली. संपूर्ण जिल्ह्याला अंधारात लोटण्याचे काम जिल्ह्यातील महावितरणच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी केले असून जिल्ह्यात निर्माण झालेली ही गंभीर परिस्थिती महावितरणकडे असलेली अपुरी यंत्रसामुग्री, यंत्रणा आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे उद्भवली असून लवकरात लवकर राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करत वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर व जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट उपस्थित होते.

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रतापगड वरून सर्व ती यंत्रसामग्री व यंत्रणा पुरविली जाईल यासाठी विशेष योजना तयार करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर श्री.अरविंद भादिकर संचालक(ऑप) यांनी मुख्य अभियंता(CE) रत्नागिरी आणि अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांना पुढील चार दिवसात सर्व स्थानिक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व समस्या सोडवून वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठीचे आदेश दिले. त्याचबरोबर जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी श्री.भोसले यांना जिल्ह्यात काही दिवस ठाण मांडून बसण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यातील काही अकार्यक्षम, उद्धट, उर्मट आणि कामचुकार अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना तातडीने त्यांची बदली आणि आवश्यकता भासल्यास निलंबनाची कारवाई करणार असा शब्द पदाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान १० ऑगस्ट पूर्वी राज्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री भारत पवार जिल्हा प्रशासना सोबत स्वतंत्र बैठक घेणार असून श्री.पाठक स्वतंत्र संचालक यांची देखील बैठक लवकरच जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील महावितरणच्या वीज पुरवठ्याची सत्य परिस्थिती मुंबई येथील मुख्य कार्यालय असलेल्या प्रतापगड मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडणे आवश्यक होते. यासाठी गेले बरेच महिने वीज ग्राहक संघटना पदाधिकारी प्रयत्नात होते. आज अखेर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खास.नारायण राणे साहेबांच्या मदतीने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आणि जिल्ह्यातील वीज वितरणची गंभीर परिस्थिती सुधारण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा