मालवणात ऑफलाईन पद्धतीने रेशन धान्य वितरण करण्यात यावे – श्रीकृष्ण तळवडेकर
काँग्रेसची तहसीलदा्रांकडे मागणी..
मालवण
मालवण शहर व तालुक्यातील रेशन धान्य दुकानांवरील ई पॉस मशीन द्वारे होणाऱ्या धान्य वितरणाच्या ऑनलाइन पद्धतीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे ऑफलाईन धान्य देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर व राष्ट्रीय काँग्रेस मालवणतर्फे मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सेवादल काँग्रेस व मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार वर्षा झाल्टे यांची भेट घेऊन रेशन धान्य वितरणात निर्माण झालेल्या समस्येबाबत चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, युवक काँग्रेसचे देवानंद लुडबे, सौ. पल्लवी खानोलकर, काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष सरदार ताजर, काँग्रेस शहराध्यक्ष लक्ष्मीकांत परुळेकर, लक्ष्मीकांत तळवडेकर, भाई चव्हण, सुरेश वस्त, चंदन पांगे, मेघश्याम लुडबे, दिलीप तळगावकर आदी उपस्थित होते.
मालवण शहरासह तालुक्यातील अन्य गावामध्ये रेशन दुकानावर ऑनलाईन पद्धती मध्ये बिघाड झालेला आहे. रेशनधारकांना रेशन दुकानावरील ई पॉस मशीन सर्व्हर डाऊन मुळे चालत नसल्याने मशीनवर अंगठा लागत नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. गेले आठ ते दहा दिवस अशीच स्थिती निर्माण झालेली असून ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. आज जुलैची २९ तारीख असून महिना संपायला दोन दिवस बाकी आहेत, ही स्थिती अशीच राहिल्यास या महिन्याचे रेशन ग्राहकांना मिळणार नाही. त्यामुळे ऑफ लाईन रेशन देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी सेवादल काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान, या समस्येबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत असून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी सांगितले.