मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महिला आशिया टी२० चषक २०२४ चा अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंका संघ यांच्यात खेळला गेला. श्रीलंकेने भारताचा 8 गडी राखून पराभव करत प्रथमच आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना भारताने १६५ धावा केल्या. श्रीलंकेने दोन गडी गमावून १६७ धावा करून सामना जिंकला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. स्मृती मानधनाने सर्वाधिक पण संथगतीने ६० धावा केल्या. जेमिमाने २९ धावांचे योगदान दिले. शेवटी ऋचा घोषने १४ चेंडूत ३० धावांची जलद खेळी केली. श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने पहिली विकेट लवकर गमावली. विश्मी गुणरत्ने १ धावा करून धावबाद झाली. मात्र, कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमाने सावध खेळ करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी झाली. कर्णधार अटापट्टूने ६१ धावांची खेळी केली. तर समरविक्रमाने नाबाद राहून ६९ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने एक विकेट घेतली.
भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेतील ९वा अंतिम सामना खेळत होता. प्रत्येकाला वाटत होते की भारतीय संघ आपले ८वे विजेतेपद सहज जिंकेल, पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखली. याआधी भारताने एकही सामना गमावला नव्हता. श्रीलंकेने प्रथमच महिला आशिया चषकावर कब्जा केला.
हर्षिता समरविक्रमा हिला सामनावीर तर चमारी अटापट्टू हिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.