You are currently viewing सूर्या-गंभीर युगाची विजयी सुरुवात

सूर्या-गंभीर युगाची विजयी सुरुवात

*भारताचा श्रीलंकेवर ४३ धावांनी विजय*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

कर्णधार सूर्यकुमार यादव (५८) याच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघाने शनिवारी येथे पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार आणि आघाडीच्या फलंदाजांच्या बळावर भारताने सात गडी गमावून २१३ धावांची मोठी मजल मारली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र, संघ १९.२ षटकांत १७० धावांवरच गारद झाला. संघासाठी सलामीवीर पथुम निसांकाने ४८ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७९ धावा झळकावल्या. पण त्या व्यर्थ ठरल्या.

 

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाच्या वतीने निसांका आणि कुसल मेंडिस (४५ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या विकेटसाठी कुसल परेरासोबत ५६ धावांची भागीदारी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण षटके खेळू दिले नाही. भारताला पहिले यश अर्शदीप सिंगने (२४ धावांत २ विकेट) नवव्या षटकात मेंडिसला बाद करून मिळवले. यानंतर अक्षर पटेलने ३८ धावा देत निसांका आणि परेराचे (२० धावा) बळी घेतले. सामन्यात एका टप्प्यावर श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर १४० धावा होती आणि पुढच्या ३० धावा करताना श्रीलंकेने उरलेल्या ९ विकेट गमावल्या. कामिंडू मेंडिस १२ धावा करून बाद झाला. कर्णधार चरिथ असालंका आणि दासून शनाका यांना खातेही उघडता आले नाही. वानिंदू हसरंगा आणि महिष तिक्षिना प्रत्येकी २ धावा करून बाद झाले. मथिशा पाथिराना ६ धावा करू शकला. रियान परागने १.२ षटकात अवघ्या ५ धावा देत ३ बळी घेतले, तर रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

तत्पूर्वी, भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४० धावा) आणि शुभमन गिल (३४ धावा) यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर सूर्यकुमार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (४९ धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर, सूर्यकुमारने आपल्या पहिल्या सामन्यात २६ चेंडूत ५८ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकार ठोकले. यादरम्यान त्याने आपले २० वे अर्धशतक झळकावले. पंतला सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याने ३३ चेंडूंत ६ चौकार तसेच १ षटकार मारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर जैस्वाल आणि शुभमन गिल (१६ चेंडू, ६ चौकार, एक षटकार) यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करून चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. जैस्वालने झटपट धावा काढण्यावर लक्ष केंद्रित केले, तर गिलने कलात्मक फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या चेंडूंवर मात केली.

 

नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली गिलने बचावात्मक खेळ केला नाही. जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर दिलशान मदुशंकाला चौकार मारला आणि त्याच्या पाठोपाठ गिलनेही या षटकात सलग दोन चौकारांसह १३ धावा जोडल्या. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने तिसऱ्याच षटकात महिश तिक्षिना याला गोलंदाजी करायला लावली, ज्याचे जैस्वालने लाँग ऑफवर एक षटकार आणि चौकार मारून स्वागत केले. गिलने असिथा फर्नांडोच्या चेंडूवर यष्टिरक्षकाच्या मागे चौकार मारला आणि नंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर चौकार मारला. जैस्वालने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे अर्धशतक चार षटकांत पूर्ण केले. जैस्वाल आणि गिल अर्धशतकी भागीदारी करून चांगल्या फॉर्ममध्ये होते, पण श्रीलंकेने दोघांनाही ७४ धावांवर बाद करून भारताला दुहेरी धक्का दिला. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर गिल बाद झाला. मिडऑनला दिलशान मदुशंकाला गोलंदाजीवर असिथा फर्नांडोकडे झेल देऊन तो तंबूमध्ये परतला.

 

वानिंदू हसरंगा आपले पहिले षटक टाकण्यासाठी आला आणि जैस्वाल त्याच्या गुगलीवर यष्टीचीत झाला. दोन गडी बाद ७४ धावा झाल्या. त्यानंतर सूर्यकुमारने आपले पारंपरिक फटके खेळत धावगती वाढवली. भारताने ८.४ षटकात १०० धावा पूर्ण केल्या आणि यादरम्यान कर्णधाराने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. मात्र, पंत खेळपट्टीवर थोडा संघर्ष करताना दिसला. सूर्यकुमारला त्याच्या यॉर्करवर पाथीरानाने पायचीत बाद केले. यानंतर पंतने मोकळेपणाने खेळत असिथाला हेलिकॉप्टर शॉट मारला आणि नंतर चौकार मारला. पण अर्धशतकापूर्वी तो पाथीरानाच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन बाद झाला. हार्दिक पांड्या (९), रियान पराग (७) आणि रिंकू सिंग (१) यांनी झटपट विकेट गमावल्या.

 

श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने ४, तर मधुशंका, असिथा फर्नांडो आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. संथ खेळपट्टीवर श्रीलंकेच्या हसरंगाने (४ षटकांत २८ धावांत एक विकेट) चमकदार कामगिरी केली. पथिरानाने अचूक यॉर्कर टाकत ४० धावांत ४ बळी घेतले.

 

सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला दुसरा सामना रविवार २८ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

 

महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका असा रविवार दुपारी ३ वाजता होणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये बांगलादेश संघाचा पराभव करून सलग ९व्या वेळी अंतिम फेरी गाठली आहे तर श्रीलंका संघाने उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव करून ६व्या वेळेस अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघ यंदाच्या पूर्ण स्पर्धेमध्ये एकदाही पराभूत झालेले नाहीत. असे असले तरीसुद्धा भारतीय संघ चषक उंचावण्याची संधी जास्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा