You are currently viewing 29 जुलै पुण्यतिथीनिमित्त : दादासाहेब काळमेघ : दृष्टी असलेला माणूस

29 जुलै पुण्यतिथीनिमित्त : दादासाहेब काळमेघ : दृष्टी असलेला माणूस

अमरावती :

 

29 जुलै हा दादासाहेब काळमेघाचा स्मृतिदिवस. आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष क्षणाचं सोनं करणारा माणूस म्हणजे दादासाहेब काळमेघ. भारदस्त व्यक्तिमत्व प्रेमळ स्वभाव कोणते काम तात्काळ करण्याची निर्णय क्षमता बहुजनांविषयी तळमळ या सर्व गुणांचा संगम दादासाहेबांमध्ये पहायला मिळतो. अशी माणसे फार कमी होतात. यां ना त्या कारणाने मी दादासाहेबांच्या जवळ होतो आणि लेखक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्व टिपत होतो. दादासाहेबांचा अमरावतीला मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहामध्ये भव्य सत्कार घडवून आणणे. त्यांचे दादांचे अभंग हे पुस्तक प्रकाशित करणे. हे त्या काळातील अवघड काम मी करून दाखवले. दादासाहेबांच्या जीवनाची सुरुवातच डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या परिसस्पर्शाने झाली. परवा अमरावतीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेत त्यांचे सुपुत्र श्री हेमंतराव काळमेघ यांची भेट झाली असताना ते सांगत होते . मी ऐकत होतो. शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा घेऊन दादासाहेब काळमेघ अमरावतीला आले. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या बंगल्यावर गेले. भाऊसाहेब नव्हते. रात्री येणार होते. पण त्या बंगल्यावर असणारा दिग्रस चा माणूसही भाऊसाहेबांसारखा दिलदार होता. त्यांनी दादासाहेबाला थांबवून घेतले. भाऊसाहेब रात्री दोन वाजता आले. रात्री दोन वाजता या दोन महामानवांची भेट झाली आणि दादा साहेबांचे आयुष्य पंजाबराव देशमुख यांच्या परिस स्पर्शाने उजळून निघाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असताना दादासाहेब काळमेघानी घेतलेले धाडसी निर्णय आजही लोकांच्या लक्षात आहेत. त्यांची कारकीर्द ही अविस्मरणीय आहे. कुलगुरू येतात आणि जातात पण अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवूनी जाती असेच दादा साहेबांबाबत म्हणावे लागेल. दादासाहेब ज्या परिस्थितीतून आले त्याची त्यांना जाणीव होती आणि म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारा एक दृष्टी असलेला माणूस म्हणून मला दादा साहेबांचा उल्लेख करावा लागेल. कोणताही निर्णय ताबडतोब घेणे हा दादासाहेबांचा स्वभाव. मला आठवते ते श्री शिवाजी सोसायटीच्या एका महाविद्यालयमध्ये भेट द्यावयास गेले. महाविद्यालयाची पाहणी करताना ते महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत केले. तिथे काम करणारा जो प्रयोगशाळा कर्मचारी होता त्याला पाहून तिथले प्राचार्य म्हणाले सर हा मुलगा एम एस सी गणित झालेला आहे. दादासाहेबांनी ते ऐकलं आणि ते त्या मुलाला म्हणाले तू इथे काय करतो ? भंडारा जिल्ह्यात पवनी येथे आपले विज्ञान महाविद्यालय निघालेले आहे. तू तिथं गणिताचा प्राध्यापक म्हणून रुजू हो. त्या माणसाच्या आयुष्याचे कल्याण झाले. मी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगावचा आणि दादासाहेब चौसाळा या गावातील. मी नोकरीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेत नव्हतो. तरी दादासाहेबांचा माझा खूप घरोबा होता. त्यांचा सत्कार घ्यायचा म्हणजे तारेवरची कसरत. पण मी पेलली. सोबतीला प्राचार्य भा. वा. चौखंडे. प्राचार्य एकनाथ गावंडे सारखी मंडळी होती आणि आम्ही सर्वांनी या माणसाचा खऱ्या अर्थाने मनापासून गौरव केला आणि तो आजही तत्कालीन लोकांच्या स्मरणात आहे. जीवन तर सगळेच जगतात. पण दृष्टी ठेवून काम करणारे जे माणसे असतात ती आगळीवेगळी असतात. मी दादासाहेबांचा समावेश त्यामध्ये करेल. एक वेळ मी अमरावती नागपूर हा एसटी बसने प्रवास करीत होतो. तेव्हा अमरावती नागपूर हे भाडे नऊ रुपये 35 पैसे होते. कोंढाळी ला बस थांबली आणि बस मध्ये चक्क दादासाहेब आले. तेव्हा ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्याबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील मोतीराम महाराज होते. मी त्यांना पाहताच नमस्कार केला. मला म्हणाले जागा आहे का ? मी माझी जागा त्यांना दिली. नंतर चौकशी केली असताना असे कळले की त्यांची कार खराब झाली होती. नागपूर वरून दुसरी कार बोलवा. मग त्यामध्ये जा. त्यापेक्षा या माणसाने एसटी बसने जाणे कबूल केले होते. वेळेची बचत केली आणि तो वेळ बहुजन समाजाचा उत्थानासाठी लावला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असताना दादासाहेबांनी बहुजन समाजाच्या लोकांना पूर्णपणे न्याय दिला. मला आठवते सुभाष बेलसरे नावाचा माझा मित्र. तो अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा मोरे या गावचा. मूर्तीजापुरच्या श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयामध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. पुढे संस्थेने त्यांना काढले. तो डबल एम ए करण्यासाठी नागपूर विद्यापीठात आला आणि योगायोगाने दादासाहेबांची त्याची भेट झाली .दादासाहेबांनी त्याची विचारपूस केली .त्याची नोकरी गेलेली आहे हे पाहून त्यांनी ताबडतोब त्याला नागपूर विद्यापीठामध्ये लिपिक म्हणून लावून घेतले. आणि पुढे सुभाष विद्यापीठातून उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाला. तीच गोष्ट प्राचार्य रा गो चवरे यांची. ते आता प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे वडील व दादासाहेब सोबत होते. आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे मराठीच्या प्राध्यापकाची जागा निघाली. रामदास चवरे मेरिटचा विद्यार्थी. पण धामणगावला ओळखी पाळखी नव्हती. तो दादा साहेबाकडे पोहोचला. दादासाहेबांनी त्याची गुणवत्ता पाहिली आणि धामणगावच्या आदर्श महाविद्यालयामध्ये त्याच्यासाठी शब्द टाकला. दादासाहेबांनी शब्द टाकला म्हणजे ते काम व्हायचेच. इतका त्यांचा दरारा होता. भितीयुक्त आदरभाव होता. दादासाहेब जरी आमदार खासदार मंत्री झाले नाहीत तरी ते अभिमानाने सांगायचे मी लोकप्रतिनिधी झालो नाही म्हणून काय झाले. माझे कितीतरी विद्यार्थी आमदार खासदार मंत्री झालेले आहेत. आणि ते खरेच होते. दादासाहेबांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजातील मुलांना मदतीचा हात दिला. अनेकांना जीवनामध्ये उभे केले. दादासाहेब वटवृक्ष होते त्यांच्या सहवासात जे जे आले त्याचे त्यांचे सोने झाले. दादा साहेबांना भजन कीर्तनाचा छंद होता. त्यांनी त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्याबद्दल त्यांच्यावर टीका टीपणी झाली. पण श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आपले कार्यालयीन काम आटोपल्यानंतर भजन कीर्तन करतो लोकाभिमुख होतो. खरं म्हणजे हे डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची जी हातोटी हातात घेतली होती. या कीर्तनाच्या माध्यमातून दादासाहेब ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करीत होते. लोकांपर्यंत ते जात होते. त्यांच्यात मिसळत होते. त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होते. त्यामुळे खेड्यातील माणसाला बहुजन समाजातील माणसाला दादासाहेब हा आपला माणूस वाटायचे. कविवर्य सुरेश भट यांच्यासह मी एकदा दादासाहेबांच्या रुरल इन्स्टिट्यूटमधील निवासस्थानी गेलो. सुरेश भट म्हणजे अमरावतीचे भूषण. सर्व त्यांना कवीश्रेष्ठ म्हणतात. आणि ते आहेतही . दादासाहेबांची आणि सुरेश भटांची मैफल रंगली. सुरेश भटांनी दादा साहेबांना म्हटले अहो तुम्हाला सोसायटीत जायचे नाही का ? दादासाहेब म्हणाले तुम्हाला मी जो वेळ देणार आहे तो वेळ मी सोसायटीमध्ये अधिक वेळ बसून काढून घेणार आहे. तुमच्या सारखी माणसे वारंवार थोडीच येतात. माझी त्या काळात चाललेली धडपड अनेकांचा विरोध असताना त्यांचा घेतलेला भव्य सत्कार. त्यांचे छापलेले पुस्तक हे सगळे पाहून मला दादासाहेब नेहमी म्हणायचे काठोळे तुम्ही आमच्या शिवाजी सोसायटीमध्ये पाहिजे होते. मी त्यांना म्हणायचं दादा मी नोकरीसाठी जरी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये असलो तरी मनाने मी शिवाजी सोसायटीमध्येच आहे. तुमच्या बरोबरच आहे. असा हा कवी मनाच्या हळवा माणूस. या माणसाने महाराष्ट्राच्या जनमानसावर एक स्वतःचा ठसा उमटविला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचा खरा वारसा चालवणारा हा माणूस आज आपल्यात नाही. पण या माणसाने जे काम केलेले आहे ते काम आजही त्यांचे सुपुत्र श्री हेमंत काळमेघ पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. दादासाहेबांनी तयार केलेले अनेक शिष्य दादासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून फुल ना फुलाची पाकळी म्हणून बहुजन समाजासाठी कार्य करून दादासाहेब काळमेघ यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूंन जाती या न्यायाने दादासाहेबांनी खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करून आपली स्मृती कायम ठेवली आहे. त्यांच्या या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन..

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प 444602.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा