वैभववाडी बसस्थानकाची आम.नितेश राणें कडून पाहणी…
वैभववाडी
आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बसस्थानकला भेट देत पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांनी बसस्थानकातील अडचणींचा पाढा वाचला.
बस स्थानकात दोन वाहतूक नियंत्रकांची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. फोंडा व तरेळे या ठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक आहेत. वैभववाडीत देखील दोन अधिकारी हवेत असे नागरिकांनी सांगितले. बैठक व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालय सुविधा नाही, असे नागरिकांनी सांगितले. बेसिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
या ठिकाणी तात्काळ बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. काम मंजूर होऊन देखील बसस्थानक परिसर डांबरीकरण झाले नसल्याचे यावेळी नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित ठेकेदाराला सदर काम तात्काळ चालू करण्यात यावे अशा सूचना दिल्या. यावेळी या कामाचा शुभारंभ देखील आमदार नितेश राणे यांनी केला.
मानव विकास एसटी गाड्यांचा फायदा हा तालुक्यातील विद्यार्थ्यांना होत नसून सदर गाड्या इतर तालुक्यात फिरवल्या जात असल्याचे भालचंद्र साठे यांनी सांगितले. तरेळे – वैभववाडी एसटी फेरी गेली अनेक वर्ष बंद करण्यात आली आहे. भारमान चांगले असताना देखील सदर गाडी बंद केली असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची वैभववाडीत लवकरच बैठक बोलावली जाईल. व प्रलंबित विषय मार्गी लावले जातील असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी भाजपा पदाधिकारी तसेच एसटी प्रशासनाचे आगार व्यवस्थापक गायकवाड, उपअभियंता श्री केंकरे, वाहतूक नियंत्रक गुरखे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.