आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील पोलिस दल रविवारी एका अत्यंत भावनिक क्षणाचे साक्षीदार ठरले. आंध्र प्रदेशच्या पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका पित्याने जेव्हा आपल्या पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) झालेल्या लेकीला सर्वांच्या समक्ष सँल्युट ठोकला, तेव्हा त्या दोघांसह या भावनिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्वच पोलिसांचे डोळे पाणवले. या भावनिक क्षणाचा फोटो आंध्र प्रदेश पोलिस विभागाकडून ट्विटद्वारे शेअर करण्यात आला आहे.
मंडळ निरीक्षक वाय श्याम सुंदर यांच्यासाठी तो अत्यंत अभिमानाच क्षण होता, जेव्हा त्यांनी आपली मुलगी येंदलुरु जेसी प्रसनती हिला सँल्युट केला. जी आता गुंटूर जिल्ह्याची पोलिस उपअधीक्षक म्हणून रूजू झालेली आहे. ते दोघेजण ४ ते ७ जानेवारी दरम्यान होत असलेल्या आंध्र प्रदेश पोलिस दलाच्या एका मेळाव्याप्रसंगी तिरुपती येथे आलेले आहेत. गुंटूरच्या डीएसपी जेसी म्हणतात, ती पहिली वेळ होती जेव्हा आम्ही दोघे ड्यूटीवर असताना समोरसमोर आलो होतो. जेव्हा त्यांनी मला सँल्युट केला तेव्हा मला कसतरी वाटत होते, शेवटी ते माझे वडील आहेत. मला सँल्युट करू नका असं मी त्यांना म्हणाले देखील, परंतु त्यांनी सँल्युट केला. मग मी देखील त्यांना सँल्युट केला.
जेसी या २०१८ च्या तुकडीतील डीएसपी आहे. पोलीस दलात रुजू झाल्यापासून ड्युटीवर असताना पहिल्यांदाच ते दोघे समोरासमोर आले होते. माझे वडील हे माझे मोठे प्रेरणास्थान आहे. अथकपणे जनतेची सेवा करताना मी त्यांना कायम पाहिले आहे. हे पाहतच मी मोठी झाली आहे. त्यांनी मिळेल त्या सर्व मार्गाने लोकांची मदत केली आहे. त्यामुळेच मी पोलीस दलाची निवड केली. पोलीस विभागाकडे पाहण्याचा माझा अत्यंत सकारत्मक दृष्टीकोन आहे. असे डीएसपी जेसी यांनी सांगितले आहे.