*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री कल्पना मापूसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रानभूल*
डोंगराच्या कड्याआड
कुणी लाविली हो वात
दिवा पेटला भास्कर
चराचर उजेडात
जागं झालं चराचर
लाल,पीत,सोन नभ
काळ्या-तांबड्या मातीने
पांघरले हेम रभ
उंच डेरेदार वृक्ष
झाडे, झुडूप, वेली
आच्छादलं दऱ्या, रान
हिर्वी तृण मखमली
रानफुल वेलबुट्टी
नेत्री रंगीत विसावा
चितारला निसर्गाने
रम्य, सुरेख देखावा
किलबिल, चिवचिव
कुहूंकुहूं गोड तान
कोकिळेने कंठातून
उधळलं स्वर दानं
संथ नागमोडी नदी
वारा पिऊन धावली
क्षितीजाच्या पाठीवर
निळ्या सागरा भाळली
झाड-वेलींच्या सावल्या
भर उन्हात सांडल्या…?
पावसाचा सारीपाट
कुणी..? कसा..? हो मांडला
नभ काळोखले आता
ओठी सौदामिनी वाणी
रान बैसले ऐटीत
ओली ऐकत कहाणी
मऊ कापूस धुक्यात
न्हाते ओलेती पहाट
सूर्य ढगात लपून
उभा शृंगार चाखत
ऊन-सरीत गुंतला
दव श्रावण कोवळा
इंद्रधनुष्याची चिरी
शुभ्र गगनच्या भाळा
कल्पना दिलीप मापूसकर
मीरा रोड