ग्रंथ चळवळ अधिक वृद्धिंगत करू, हिच प्रा. खान सरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कोमसाप सावंतवाडी शाखेने वाहिली अल्ताफ खान यांना आदरांजली.
सावंतवाडी :
प्राचार्य अल्ताफ खान हे ग्रंथ चळवळीचे आदर्श पुरस्कर्ते होते. त्यांच्या या चळवळीला अधिक वृद्धिंगत करून त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया, असा सूर कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित केलेल्या शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केला.
आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेतर्फे दिवंगत प्राचार्य अल्ताफ खान सर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे, सदस्य प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.
यावेळी शोकसभेत मनोगत व्यक्त करताना अभिमन्यू लोंढे म्हणाले, अल्ताफ खान सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांची उणीव पुढील काळात निश्चितच भासणार आहे.
सहसचिव राजू तावडे म्हणाले अल्ताफ खान सरांना सर्व समाजाची जाण होती. छत्रपती शिवरायांवर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या शिवचरित्र व्याख्यानातून त्यांनी खऱ्या अर्थाने शिवविचारांचा जागर केला.
कवी दीपक पटेकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात जशी खान सरांनी कामगिरी केली तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अनेक जणांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून घडविले.
प्रा. रुपेश पाटील म्हणाले, अल्ताफ खान सर हे खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतिबिंब असलेले व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि सर्वधर्म सहिष्णुता जोपासून सच्चा भारतीय असल्याचे दाखवून दिले . कोमसापचे सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲड. संतोष सावंत म्हणाले, प्राचार्य अल्ताफ खान सरांचे ग्रंथांवर विशेष प्रेम होते. त्यांची ग्रंथसंपदा प्रचंड होती. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांच्या ग्रंथ चळवळीला अधिक वृद्धिंगत करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करूया. भरत गावडे यांनीही मनोगत व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक अल्ताफ खान सरांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले. जेव्हा अडचणी आल्या तेव्हा खान सरांनी त्या सोडविण्यासाठी आपल्याला मदतीचा हात दिला.
शोक सभेचे सूत्रसंचालन विनायक गावस यांनी केले . विनायक गावस यांनीही आपल्या श्रद्धांजलीपर भावना यावेळी खान सरांना वाहिल्या.