You are currently viewing “अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तरी दीपक केसरकर यांच्या विरोधात लढणारच”

“अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तरी दीपक केसरकर यांच्या विरोधात लढणारच”

राजन तेली यांनी फुंकले रणशिंग…

केसरकरांचा सज्जनपणाचा बुरखा फाडणार

 

सावंतवाडी मतदारसंघात मागील तीन निवडणुकांमध्ये एकतर्फी निवडून येत हॅट्रिक करणाऱ्या नाम.दीपक केसरकर यांच्या विरोधात मागील दोन विधानसभेच्या निवडणुका विधानपरिषदेचे मा.आमदार राजन तेली यांनी लढविल्या. परंतु दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार म्हणून असो किंवा जनतेचा केसरकर यांच्यावरील विश्वास, त्यांना जनतेने नाकारले आणि नाम.दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. यावेळी त्यांनी आपण सावंतवाडी मतदारसंघातील असल्याचा दावा करताना सावंतवाडी शहरात आपले नवे निवासस्थान बांधून सावंतवाडी वासिय होण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही वेळचा अनुभव असताना आणि जनतेने नाकारले तरी त्यामागील कारणे कोणती याचा विचार न करता राजन तेली यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नाही तरी तिसऱ्यांदा सावंतवाडी मतदारसंघातून नाम.केसरकर यांच्या विरोधात लढणार असे सांगत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राजन तेली आणि परशुराम उपरकर ही जोडी अनेकवर्षे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे डावे उजवे हात म्हणून ओळखले जात होते. परंतु बदलत्या राजकारणात दोघेही राणेंपासून दुरावले. राणे भाजपावासी झाल्यावर मागील काही वर्षात राजन तेली पुन्हा एकदा राणेंच्या जवळ आलेत. परंतु यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली ते म्हणजे राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे नाम.दीपक केसरकर व राणेंचे संबंध सुधारले आणि केसरकर हे देखील राणेंच्या जवळ आले, एवढेच नव्हे तर राणेंच्या खासदारकीच्या प्रचाराची धुरा देखील केसरकरांनी सांभाळली आणि राणेंच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे राजन तेली विधानसभेच्या निवडणुकीत केसरकरांच्या विरोधात अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राणे कोणाचे समर्थन करणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल. आजपर्यंत राणेंचे कट्टर समर्थक कधीही राणेंच्या शब्दाबाहेर न गेल्याने राणेंनी महायुतीच्या धर्माचे पालन करून केसरकरांचे समर्थन केल्यास राजन तेली यांना ही निवडणूक सहज सोपी जाणार नाही.

पुणे येथे काल झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना “मागे हटू नका, बिनधास्त लढा..फक्त हिट विकेट होऊ नका” असा संदेश दिल्याने त्यातून प्रेरणा घेत राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अपक्ष का होईना लढणार अशी दर्पोक्ती तर केली नाही ना..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सावंतवाडी मतदारसंघाचा विचार केला असता राजन तेलींना आतापर्यंत आलेले अपयश हे का आले..? याचा विचार होणे आवश्यक आहे. सावंतवाडी मतदारसंघात तेली हे कणकवलीचे उमेदवार म्हणून पराभूत झाले का? असा प्रश्न कोणालाही विचारला असता त्याचे उत्तर “नाही” असेच येईल. कारण शिवराम दळवी हे मुंबईतून येऊन सावंतवाडी मतदारसंघात तब्बल एक दशक आमदार राहिलेले आहेत. सावंतवाडी हा सुसंस्कृत आणि विचारवंतांचा पगडा राहिलेला मतदारसंघ आहे. मा.आम.कै.जयानंदजी मठकर, हिज.हाय.कै.शिवरामराजे भोसले अशा समाजमान्य विचारवंतांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर, प्रवीण भोसले, शिवराम दळवी असो किंवा दीपक केसरकर तिन्ही संयमी, मितभाषी, शांतताप्रिय व्यक्ती. त्यामुळे जनतेने मागील विचारवंत लोकप्रतिनिधींचा प्रभाव दिसेल अशा विचारांशी समतोल व्यक्तींना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मागचे दीड दशक नाम.केसरकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून ते दोन वेळा मंत्री झाले. आताचे शिंदेंचे सरकार येण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सरकार स्थापन होण्यासाठी बरेच कष्ट घेतले. त्यामुळे ते शिंदेंचेच जवळचे नव्हे तर फडणवीस यांच्याही मर्जीतले मानले जातात. केसरकरांचा मागील काही वर्षातील राज्याच्या राजकारणातील वावर पाहिला असता वरिष्ठ पातळीवरून त्यांना पोषक वातावरण आहे. सध्याच्या घडीला मुंबई शहराचे पालकमंत्री असल्याने त्यांची राजकीय ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे केसरकरांनी आव्हान देणे वाटते तितके सोपे नाही, कारण शेवटी चेंडू जनता टोलावणार असते.

राजन तेली यांच्या उमेदवारीला केवळ नाम.केसरकर हेच आव्हान आहेत असे नसून भाजपाचे जिल्हा प्रवक्ते सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू उर्फ सच्चिदानंद परब आणि भाजपचे युवा नेते विशाल प्रभाकर परब हे दोघेही मैदानात उतरण्याची जय्यत तयारी करून राहिले आहेत. विशाल परब यांनी गावागावात मदतकार्य सुरू करून मैदानात केव्हाच स्टंप ठोकले आहेत. संजू परब यांनी आपल्याच पक्षाचे नेते असतानाही राजन तेली यांच्यावर बाहेरून आलेली व्यक्ती अशी टिपण्णी करत आपण पुढील भाजपचा उमेदवार असणार आहे असे जाहीर करून सावंतवाडी मतदारसंघावर दावा केला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाकडून शिवसेना(उबाठा) ने सावंतवाडी आपला हक्काचा मतदारसंघ म्हटले असतानाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने अर्चना घारे परब यांची उमेदवारी जाहीर करून सावंतवाडी मतदारसंघात चुरशीचा सामना रंगणार असल्याची झलक दाखवली आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातून कितीजण उभे राहणार की सर्वच उभे राहून कोणाचे नशीब बलवत्तर हे पाहणार..? अशी चर्चा रंगत आहे.

या सर्व घडामोडी पाहिल्या असता नाम.केसरकर यांनी लोकप्रियता या सर्वांच्या तुलनेत अधिक आहे. जनतेच्या मनात शांत, संयमी, हुशार, बुद्धिमान म्हणून ओळख आहे. राज्याच्या राजकारणात बुद्धिवंत म्हणून अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर दिलेल्या पहायला मिळत असल्याने त्यांचे महत्त्व वाढलेले आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे केसरकर यांना आव्हान द्यायचे असेल तर राजकीय पक्षाच्या घरच्या मैदानात उतरून भागणार नसून मतदारसंघातील जनतेच्या मनातील हृदयमंदिरात बसून ध्यानधारणा करावी लागेल. विचार स्वातंत्र्य असलं तरी वैचारिक संघर्ष करावा लागेल. सामाजिक भान ठेऊन विचारांची लढाई विचारांनी लढावी लागेल..

प्रतिक्रिया व्यक्त करा